Saturday, 12 September 2020

वेली फुलांच्या

पहाटेचा मंद प्रस्न्नगारवा हिरवी रानं आनंदाने डोलणारी. दाट धुक्यात न्हालेली  ओलसर पाऊलवाट.पानावर फुलावर नाजूक टपोरं दवं पहुडलेलं. सगळीकडे शुभ्र निळाई दाटलेली. काटेरी हिरव्या वेलीवर गणेशवेलीची लाल-चुटूक चांदणं फुलं. गोकर्णाची पांढरी शुभ्र जांभळी फुलं खुललेली पाहता पाहता मन बांधावरली गवतफुले पाहण्यात गुंग झालं. आईने आवाज दिला, अगं यमे, चल चुलीत लाकडं कधी पासून जळतायेत. पाण्याला आदण आलंय. चुलीवर पाणी तापवण्यासाठी घडगीवर ठेवलेली तवली माती लावून तापलेल्या पाण्याच्या वाफा बाहेर पडत होत्या. चुलीत फुललेला लालबुंद केशरी निखारा. धुक्यात भिजलेली ओली लाकडं चुलीत पेटत घेत असताना ओल्या लाकडांचा धूरकट निघणारा वास, ओल्या फांदीत असलेला चिकाचा जळतानाचा चर चर असा फसफसताना आवाज. पाण्याला कडक आधण आलेले. मधेच एखादया वाळलेल्या ओल्या फांदीत रुजलेलं बी फटाकडी ऊडावी तसं फट फट आवाज यायचा. अन् यमीनं मुद्दाम खूप मजा आली नं म्हणून मग हरभऱ्यांच्या पोत्याला वेज पाडून हळूच मुठभर हरभरे पोतं फाडून आईच्या नकळत चुलीत टाकताच तड तड आवाज करीत फुटलेले चणे, चुलीबाहेर आलेले अर्ध फुटाणे. आई स्वंयपाकघरातून बाहेर आली. एक फुकारीचा टोला मला व यमीला बसला. पोत्यातून बाहेर आलेले हरभरे पाहून बाबांचा ओरडा बसला. आई कान पकडून यमीला वळला न्हाणी घरात घेऊन गेली. करुंदाचा चौकनी दगडावर बसवून. कडक आदण आलेल्या पाण्याने न्हाऊमाखू घालायची. यमीचं अन् माझं हसणं, ओरडणं चालूच असायचं. " किती मळ साचलाय अंगावर दिवसभर म्हणून दगडाने मान, हात, पाय, पाठ घासून घासून आई अंघोळ घालायची. आजीच्या मऊ नऊवारी पदराच्या जुन्या साडीनं अंग पुसायची. साडीच्या पदरात केस गुंडाळायची. तो आजीचा पदर, चंदन शिकाकाईचा वास, कडक आदण आलेलं पाणी, मन सुखावलेलं पापण्यात ग्लानी, आजूनही ती माया तो धुरकट ओला वास आठवला की तो सुंगध आजही मनात दरवळतो आणि अंगावर साठलेलं मळभ क्षणात दूर होतं.

            मला आठवतंय कोटयात एका बाजूला आप्पा आजोबा बाजेवर बसलेले अभंग हरिपाठ गात. बाजेच्या एका पायाला कोकरु बांधलेलं. गोठयातच बाजूला दावणीला बांधलेली गाय. वासराचं हबरणं. इमानीराखणदार चंद्रया कुत्रा काळा कुळकुळीत तो कपाळावर चंद्रकोर म्हणून दादा नं नाव ठेवलेलं. काकू आजी पोपडं निघालेलं परवर पांढऱ्या मातीनं लिपतेय व वर शेणानं कानाकोपरा सारवतेय. हिरवा नऊवारी पदर कमरेला खोवलेला. कपाळावर रुपाया एवढं कुंकू गोल गरगरीत मेणावर हिरव्या गोदंणात लावलेलं, केसाचा सैल अंबाडा बांधलेला. काकूच्या साडीचा पदर निसटला की आजी म्हणायची बाबे ," माझं हात बघ, शेणानं बरबटलेत पदर जरा नीट खोव गं. "अप्पाचं आजीला पाहात पाहात परत मोठ मोठ्यानं हात वर करत तर कधी हात जोडत टाळ्या वाजवत ," सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनीया हात " म्हणणं. काकू आजीचं हसणं. काकू आजी हात धुऊन, कोपऱ्यात मांडलेली चुलं आडणी, तवा लाकडाची काटवट, रवी पोळपाट लाटणं फुकारी चिमटा अन उलतणं जर्मनची पातेली एक दोन डबे लाकडाच्या फळीवर दोन तीन ताट वाट्या अन तांबे. चुलीच्या बाजूला खोवलेलं ऊखळं अन थोडं बाजूला दगडाचं जातं रोवलेलं. ज्वारी गव्हाच्या एक दोन कणग्या एवढाच संसार, पण किती सुंदर आनंदी सुवास होता या संसाराला.

काकू आजीनं शिक्यावरचं दह्याचं गाडगं काढून, लाकडी रवीने ते दही घुसळून ताक बनवलं. समोरच्या सरीतली मी मोठाली काळ्यापाठीची वांगी काढून आणली. काकू आजीने चुलीत तेल लावून आरावर दोन तीन वांगी कांदे टाकले. काटवटीत पीठ मिळून गरमागरम भाकरी चुलीतल्या आरावर तोडाशीं, तव्यावर तेलात ती भिजलेली वांगी कांदा सोलून मीठ काळा इसूर टाकला व झाकण ठेवले. भुईमुगाच्या शेंगा मुठभर फोडून लगेच ऊखळात कांडलेलं कूट त्या वांग्याच्या भरीत मधे टाकून, काकूंनी आप्पाना व मला गरमागरम ताट वाढलं. आप्पांचा जेवण झाल्यावर घरासमोरच्या निबोंणीच्या पारावर पान खायचा बेत रंगायचा. आम्ही मुलं आजुबाजूला काकू आजी,जनाई, आप्पा आम्हां मुलांना देवदेवतांच्या गोष्टी सांगायचे कधी कधी रंभा उर्वशी तर कधी कधी आवडती नावडतीच्या गोष्टही सांगायचे. आप्पा मला नेहमी म्हणायचे तू माझी आवडती अन् फुला नावडती. मग काकू आजी नाक फुरगटून लटकेच रूसायची. आप्पा म्हणायचे, " वेलीत वेल काकडीची अन् फुला माझी नवसाची ." आम्ही मुलं अन आजुबाजू खुरपायला आलेल्या बायका तोंडाला पदर लावून फिदीफिदी हसायचो. गप्पांचा फड रंगायचा आम्हा मुलाचं आजूबाजू खेळणं चालूच असायचं.

             कमली कडेवर तिचं बारीक पोर काळं कुळकुळीत शेबंड दिसभर खेळून झोपलेलं. तिनं झाडाला कंबरेला बांधलेला फाटका इरलेला पदर सोडून झोळी बांधली डोक्यावर कापडी चुबंळ खाली ठेवून, भल्या मोठया दुरडीत भाकरीचे गाठोडं दह्याचं मडकं, ताकाचं भाडं कांदा मिरच्या हिरवी मेथी भरलेलं, चुबंळ खाली टेकली, तोच कमले कमले करीत विठूने हातातला खोऱ्या, पाटी, नांगर खाली टेकत हात धुतलेले, कमलीने त्या फाटक्या चिरगुटातच विठोबा ला कांदा भाकरी चटणी दही दिलेलं कमले तू बी खा की गं मग कमलीने लाजतच तोंडाला पदर लावत तीनं स्वत:ला वाढून घेतलं एका हाताने झोळी हलवत हसत बोलत ती आनंदाने जेवली. आप्पां व काकूचं जेवण झाल्यावर यमीची नेहमीची सवय कायतर खोडी करायची, तिनं गायीच्या गळ्यात बांधायचा कासरा सोडला अन् लाकूड बांधून कोटयात लाकडाच्या आडाला झोका बांधला. कासरा कुचका अन् ती मेढ रोवलेली झोका घेता हलायची. पण यमीला खुमखुमी एक झोका असा घेतला की यमीच्या डोक्यावर कोटयाचं छप्पर ती मेढ रोवलेली पायावर कासरा तुटलेला यमी दणकन खाली आदळलेली. पारावर बसलेले सगळे जेवण करुन आम्ही वाचलो. मी फिदीफिदी हसतेय तर यमी काकू आप्पा करत रडणारी-काकूंनी एवढं होऊनही यमीला पदरात घेतलेलं--आप्पाची बाज सुखरुप पाराखाली आली. विठूंन दिवस मावळता सावरलेलं ते छोटसं झोपडं अजूनही डोळयासमोरून जात नाहीत त्या आठवणी. यमीचा तो निरागस अवखळपणा.

भरदूपार रणरणती पाऊलवाट धुळींनी माखलेली, हिरवी गार झाडे उन्हात अंग चोरून उभी. पक्ष्यांची घरटयात ये-जा, खारुताईचं शेपूट झुबकेदार खालीवर करत तुरूतुरू चपळ पळणं. चिमण्यांची चीवचीव दाणे टिपत अंगणातलं चिवचिवणं. काकडी कलिगंडाच्या हिरव्यागार वेली सरीवर फुले पिवळी खेळती अंगावर भुईमुगाच्या वेली रानभर पसरलेल्या पाटात पानी वाहते झुळझुळ खेळते. भिजलेली माती, वाफाळलेली भुई, फुललेली हिरवं रानं, विठोबा सरी मोडत होता कमली वाढलेलं हिरवं तन खुरपणारी, बांधावर लिंबोणीच्या झाडाला झिरमिरी फाटलेल्या झोळीत पोर झोपलेलं. पानांपानातून डोकवणाऱ्या ऊन्हाच्या झळाया, झोळीत बाळाची हालचाल झाली की कमलीचा जीव कासावीस व्हायचा. पळतच बाळाला मांडीवर घेऊन पदराआड बाळाला घेऊन दुधपाजून शांत करणारी कमली, कपाळावर घामाचे ओघळलेले थेंब. कपाळावर लावलेलं कुंकू ओघळ नाकावर एकसारखं करत, कमले कमले विठूचा आवाज ऐकताच कमली ऊठली. ऊन्हे डोईवर आलेली पानी खेळतं विठूच्या एका हातात खोऱ्या कुदळनं सरी भरलेल्या बांधाच्या कडंची शेवटची सर विठूने मोडली. बांधावर भलंमोठं नागाचं वारूळ मी अन यमी दोंघी पाटात पाणी खळ खळ वाहणारं एकमेंकीच्या अंगावर उडवतोय गाणं ओठावर हिरवं.

हिरव्या हिरव्या रानी माझं मन धावतं
फुलं लाल पिवळी पाहुनी ऊन हसतं
भुई हिरव्या वेली देह मन पाघरतं
पाखरं इवली इवली मन चिवचिवतं
झुळझुळ वाहताना पाटात पानी खेळतं
मन दुडूदुडू धावताना थुईथुई नाचतं...

कोपऱ्यात एका बाजूला भरदूपारी सावल्या अंगी बांधावर विहिरीतल्या हिरव्यागार पाण्यात गावातील पोरं पोहणारी, दणादण उडया विहिरीवरुन मारणारी पाणी ऊसळतं हिरवं विहिरीवर, पक्ष्यांची गोड चिव चिव विहिरीवरील झाडांच्या घरट्यातील अचानक कर्कश्य आवाज़ वाढला. भुईमूगाच्या हिरव्या गार पाल्यात सरीतलं गार पाणी शिरताच तो हिरवागार अंगावर सोनेरी कात सळसळ पाटातील वाहत्या पाण्याबरोबर यमीच्या जवळ येताना पाहताच माझी घाबरगुंडी ऊडालेली. विठूकाका कमलकाकू जोरजोरात ओरडताच पळतच विठू हातातला खोऱ्या कुदळ तिथेच टाकून धावत आला. कमली घाबरलेली. विहिरीतली पोरं ओल्या चड्डीवर तशीच पळत आली. बाबे यमे काय झालं बोंबलाया. तसं मी रस्त्यावर पळत सुटले.यमी मांझ्या मागं मागं आता काहीच सुचेना. बांधावर दावणीला बांधलेल्या मोठया जनावरांची एकच घुसमट त्या वळवळत्या विषारी जनावराला पाहून विठू कधीच नागाला जिवंत मारायचा नाही. विठूनं त्या नागाला अर्धमेला मारता तो साप निसटलेला कुठे ग़ायब झाला कळलं नाही. सळसळ करणारी हिरवी रानं, बैलं, शांत पाटात वाहणारं पाणी सगळं पुर्ववत मी मात्र काकू आजीच्या पदरात लपून बसलेली, यमी हसत हसत घाबरट कुठली मला म्हणत होती. विठोबानं मायेनं डोक्यावर हात फिरवत होता. पोरे घाबरु नगस समदं ठिक हाय काही नाही करणार. मुक जनावर ते आपण त्याला डिवचलं नाही, मारलं नाही तर तोही आपल्याला काही करणार नाही. मी मान डोलावली, पण त्यादिवशीनंतर मी आईच्या कुशीतच झोपू लागले, आईचा पदर मी कधीच सोडला नाही. डोळ्यासमोरचां तो सोनहिरवा सळसळ करत येणारा जाईनाच, तेव्हा आई मला झोपताना देवांचें नाव घे म्हणायची. मी थकलेली आईच्या मांडीवर अंगणात चांदोबा, आईची अंगाई, वारा मंद लहरणारा कधी झोप  लागायची समजायचं देखील नाही.

तनुजा ढेरे 

No comments: