"गणपत्ती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर "या अशा गजरात अनंत चतुर्थीला गणपती चे विसर्जन भरल्या डोळ्यानी होत नाही तोच, भाद्रपद महिना पितृ पंधरवाडा म्हाळाचे दिवस संपत आले की आईची घरात एकच घाई चालू व्हायची. नवरात्र उत्सव येणार. देवीची आरास करायचीय, पाठोपाठ दसरा. घरातली साफसफाई आई एक ना एक भांडे, डबे, कपडे सगळं घर धुवून काढायची. तिची लगबग तिचा उत्साह आईला कशाचेच भान राहयचे नाही ती उत्साहाने घरातली सगळी कामं करायची. अश्विन महिन्यात शुध्द प्रतिपदेला घटस्थापना व्हायची.
आदिमाया अंबाबाई, सार्या दुनियेची आई
तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई
उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई
हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई.
आईच्या नावाचा जागर. गल्लो गल्लीत नाक्यावर देवीच्या आगमनाची तयारी केली जायची. विविध नवरात्र उत्सव मंडळांची जोशात तयारी चालु असायची. आई घटस्थापनेच्या आदल्या दिवशी रात्रीच सगळं पुजेचं सामान आणुन तयारी करुन ठेवायची. दुस-या दिवशी सकाळी लवकर उठून सोवळ्यातच घटस्थापना करायची.देव-हारया च्या बाजुला चौरंगावर लाल कपडा ठेवुन त्यावर बाजारातून आणलेली नवीन वेताची दुरडी त्यात लाल नाहीतर काळी माती भरुन सात प्रकाराची धान्य बाजरी, सातु, मुग , उडीद हरभरे, ज्वारी, तीळ, जवस, पेरायची माती खालीवर करुन दुरडीत मातीचं सुगड ठेवून त्यात सव्वा रुपया ठेवायची. पाच पानं खायची (नागवेलीच्या वेलीची ) विडयाची कडेनी मांडून, त्यात उभा नारळ खोवायची. त्या कलशाला अकरा विडयाच्या पानांची माळ घालायची. हळदी कुंकू फुलं वाहुन पुजा करायची. रोज थोडं पाणी सोडायचं. नऊ दिवसात घट हिरवाकंच फुलोरा उगवून यायचा. नऊ दिवस दिवा सतत रात्र दिंवस तेवत ठेवायचा, नऊ दिवस नऊ माळा रोज एका फुलाची ,पानाची मखमली, तुळशीमाळ, फुलांच्या माळा घालायची, शेंगदाणा, गुळ, खिचडी, फळं, उपवासाचा नैवेद्य दाखवायचा आईनं नव रात्रात कधीच देवपुजा करायची नाही. आई सांगायची देवी गादीवर बसलेली आहे म्हणून ती उठत नाही. सगळ्या देवासमोर म्हणून मग देव ही उठत नाही.फक्त फुलं व हळद कुंकू वाहून देवांची पुजा करायची.
नऊ दिवस पायात आई चप्पल घालायची नाही,खाटेवर बसायची नाही, गादीवर झोपायची नाही कारण आई खाटेवर गादीवर बसलेली असते असं आई सांगायची.सकाळी सकाळी लवकर उठुन ती घरातली पुजाअर्चा झाली की,रोज पहाटे एका देवीच्या दर्शनाला जायची. आईची खणा नारळाने ओटी भरायची. दिवसभर फळं आणि फराळाचं खाऊन आई नऊ दिवस उपवास करायची. आई सतत घरातला घटासमोरचा दिवा विझु नये म्हणुन काळजी घ्यायची. चार दिवस झाले की पाचव्या दिवशी आई नवरात्रात देवीला मैदा, रवा, पिठी साखर, तुप गरम घालून त्याचं पीठ मळून पातळ खुसखुशीत कडकणी करायची. देवीला घटाला पाच सात कडकण्याची माळ बांधायची. पातळ खुसखुसशीत कडकणी आम्हा सर्वांना खूप आवडायची. आई दारात जोगवा मागायला आलेल्या वा मंदिराबाहेरील बसलेल्या बायकांच्या परडया भरायची, पीठ मीठ तेलानं पाच किंवा सात अशाप्रकारे.
आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटाची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीची नऊ दिवस उपासना केली जाते आणि दहाव्या दिवशी म्हणजेच, दस-याच्या दिवशी गावातील पुरुष मंडळी गावातील देवीच्या मंदिरात शिलिंगण खेळायला जातात. डोक्यावर टोपी घालुन त्यात घटातील धान्यांचे तुरे खोवून आपटयाची पानं देवी समोर ठेवून नारळ फोडतात. आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी म्हणुन ही साजरा करण्यात येतो.आई सांगायची. महाराष्ट्रात दसर्याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून शमी व आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन, शमी पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची, तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापार्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा आहे आई सांगायची. यादिवशी रामाने रावणाचा वध केला. पाच पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले. हे ही महत्व आहे या दिवसाला.
नवरात्र नऊ दिवस नऊ रात्री जागरण दांडीया गरबा आम्ही मुलं खेळायचो. रूपा भवानी हे सोलापुरचं प्रसिध्द देवीचं मंदीर. या देवीबरोबरच इथे राहयला आल्यानंतर विविध चौकातील व नाक्यावरील नवरात्र मंडळ व देखावे हे पाहण्यासाठी भाविकांचा उत्साह हा ओंसाडून वाहतो. सोलापूरात नवरात्र उत्सव हा ..मोठया उत्साहाने व आनंदाने हा सण साजरा केला जातो...सोलापूरातील जनसमुह या बरोबरच तळजापुरची आई कुलस्वामिनी अंबाबाई ला खूप मानतो. आईची मनापासुन आराधना करतात.नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी पायी पायी जातातच....पण त्या ही पेक्षा चैत्र पुनवेला जेंव्हा आई गादीवरून उठते...तो दिवस चैत्र पौर्णिमेचा अगदी देवीच्या मंदिराची आरास आणि एकुनच भाविकाची भक्ताची गर्दी डोळे दिपवुन टाकणारा एक अनुभव असतो.
|| सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरन्ये त्रयम्बिके गौरी नारायणी नमोस्तुते ||
------ सौ.तनुजा ढेरे
