Friday, 25 March 2022

माझा लेखन प्रवास

साहित्य निर्मिती प्रक्रिया आणि माझे लेखन 
/ साहित्यनिर्मितीचे सृजनभान


साहित्य निर्मितीचा क्षण खरंतर हा विषय तसं म्हटलं तर खूप गंभीर म्हटलं तर सहज, सुलभ व तितकाच चुटकीसरशी सुटणारा आहे. आपण आपल्या साहित्य निर्मितीचा क्षण कसा अनुभवतो यावर बरंच आपलं साहित्य अवलंबून असतं. साहित्य निर्मिती हे जबाबदारीचं काम आहे. साहित्य ही समाजाशी निगडीत अशी कलाकृती आहे. समाजाच्या विविध अंगाचे दर्शन या साहित्यिक निर्मितीतून होते तेव्हा त्या कलाकृतीला वेगळेच महत्व प्राप्त होते. मात्र तेच जर आपण ती साहित्य निर्मिती स्वःच्या पातळीवर पुढे आणली तर ती स्वःअनुभवाच्या पातळीवर मर्यादीत स्वरूपात वाचकांच्या समोर येते. एका विशिष्ट पातळीवर, विशिष्ट विषय, आशयाला धरून एकच आशय पुढे येतो त्यावेळी त्या निर्मितीची व्यापकता स्थिरावते. मात्र सामाजिक अंगाने मी व स्वःची प्रतीमा सोडून आपण समाजाचा एक घटक या नात्याने लेखन केले तर त्या लेखनाचा पट  वैश्विक पातळीवर मोठा होतो व आपसूकच व्यापकता वाढते. कविता, ललित, कादंबरी, कथा व अनुवाद असे विविध साहित्यप्रकार हाताळताना माझा लेखनअनुभव अधिक समृध्द होत गेला. जाणिवा प्रगल्भ झाल्या व कसदार लेखन म्हणजे काय ? साहित्यनिर्मितीचे भान म्हणजे काय? आपण लिहितो म्हणजे नेमकं काय करतो ? वाचकाची भूक लक्षात घेतो का ? हे प्रश्न मनात उभे राहात असतानाच यांची उत्तरे शोधण्याची धडपड मला माझ्या लेखन प्रवासाच्या वाटेवर परत परत आणून सोडत होती.

साहित्य निर्मिती हा जितका किलिष्ट व अवघड विषय आहे तितकाच गंमतीशीर व सोपाही कारण कधी काय सुचेल लिहायला हे आपण सांगू शकत नाही. कधी कधी लिहायला बसल्यावर महिनोंमहिने काहीच सुचत नाही. नुसतंच मन भरकटत राहतं तर कधी कधी एकदा लेखनी उचलली की शेवटपर्यंत आपण लिहितच जातो व आपली साहित्य निर्मिती कधी पूर्णविरामापर्यंत पोहचते हे आपल्याला कळतही नाही.

खरंतर वाचन व आपल्या आजुबाजूचं वातावारण हे आपल्या साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका पार पाडत असतं. जितके आपले वाचन व जीवनअनुभव समृध्द तितकं आपलं लेखनही समृध्द व आशयघन होतं. आपल्या लेखन कक्षांचा विस्तार अधिक होतो. लेखन करताना मर्यादा येत नाहीत. वाचन हा लेखनाचा मुलभूत स्तोत्र आहे, दिशादर्शक असा मार्ग आहे. विविध विषयावरील लेखन करताना आधारभूत असे संदर्भ घेऊन आपण लेखनपूर्व अभ्यास केला तर आपले लेखन अधिक सदोष होते मात्र लेखन करताना आपली अभिव्यक्ती व लेखनशैली आपल्याला कायम पकडून ठेवता आली पाहिजे. तशीच्या तशी अभिव्यक्ती आपण वाचलेल्या लेखकांच्या प्रतीमा उचलून आपल्या लेखनातून उतरवणे योग्य नाही. एखाद्या लेखकाचे अनुकरण करणे म्हणजे त्याचे तसेच्या तसे लेखन उतरवून आपले लेखन आहे असे सांगणे नव्हे हे चूक आहे. तर त्या लेखकाची शैली, लिहिण्याचे तंत्र समजून घेऊन आपण आपल्या अनुभूतीनुसार लेखन करणे.

कविता:- आयुष्य हे सहजसुंदर जगणं आहे ! मात्र ते जगता यायला हवं. आणि हे जगणं उत्कट, संवेदनशील असेल तर आपोआपच मनात भाव फुलतात. खरंतर प्रत्येक कलाकृतीचा अर्थ लावायचा नसतो असं मला वाटतं, अर्थ शोधणं काही गैर ही नाही. पण त्याचबरोबर काही कलाकृतीतून मिळणारा आनंद हा आत्मिक असतो तो घेता आला पाहिजे. काही कलाकृतीचा अर्थ लावता येत नाही तंतोतंत, त्यातून विशेष काही वैचारिक मंथन होते असेही नाही. मात्र त्या कला निर्मितीतून व कला आस्वादातून जो आनंद मिळत असतो आपल्याला तो निरामय असतो. अगदी सहज, उत्कट, तरल अनुभूती हे त्या कलाकृतीचं वैशिष्टयै असतं. निसर्गाची रचना व त्या अनुषंगाने येणारी अनुभूती मला अशीच तरल, उत्कट व संवेदनशील प्रत्येक मानवी मनाला स्पर्शून जाणारी कलाकृती वाटते.

इंग्रजीतील प्रसिद्ध कवी वर्डस्वर्थ यांनी "भावनांचा उत्कट, सहजस्फुर्त आविष्कार म्हणजे कविता" अशी कवितेची व्याख्या केली आहे. अर्थात कवितेतच नव्हे; तर एकूणच साहित्य व कलेत भावना महत्त्वाच्या असतात हे अगदी खरे आहे. मात्र या भावनांना अभ्यासाची जोड जर मिळाली तर श्रेष्ठ कविता, श्रेष्ठ कलाकृती जन्माला आल्याशिवाय राहत नाही. कविता ही तंत्र मंत्र शिकून, विचार करून, अभ्यास करुन लिहिता येत नाही तर कविता ही सहज उत्सफुर्तपणे सुचली पाहिजे. कवितेच्या सर्जनशिलतेला जेव्हा तंत्र आणि मंत्राची जोड मिळते तेव्हा उत्तम काव्य निर्मितीचा आपल्याला आनंद घेता येतो. खरंतर आपल्याला एखादा, प्रसंग, घटना, भाव मनाला स्पर्शून जातो. एखादी व्यक्ती, तिचा स्वभाव मनात ठसतो तेव्हा मनात विचाराचं मंथन चालू होतं. जेव्हा आपली कल्पनाशक्ती सर्जनशिलतेचा तळ गाठते तेव्हा आपोआपच आरस्पानी कविता शब्दरुपाने कागदावर प्रतिंबिंबित होते. कविता ही कधी कागदावर केव्हा उतरेल हे मात्र सांगतां येत नाही. किती वेळात कविता लिहून होईल हेही सांगतां येत नाही. तसेच कधी सुचेल हे कुठलाही कवी सांगू शकत नाही. कधी कधी एखादी कविता अगदी दहा ते पंधरा मिनिटात लिहून होईल तर कधी कधी सहा सहा महिने कवितेतील ओळ पुढे सरकत नाही. 

आपली प्रत्येक कविता विषयानुरूप एका विशिष्ट भूमिकेतून, प्रतिमेतून, विषयातून आशयगर्भतेला स्पर्शून अवतरली पाहिजे. निसर्ग हा माझ्या कवितेचा प्रमुख स्तोत्र आहे. त्याअनुषंगाने माझ्या अलीकडील कवितासंग्रहातील प्रत्येक कवितेला एक वेगळी पार्श्वभूमी, भाव, आशय व गंध आहे. भावनांचे, प्रहराचे पदर उलगडत असताना कवितां ऋतूंचं बोट धरून पुढे पुढे सरकत जाते, कधी अजाण बालकासारखी तर कधी तारूण्युलभ भावनाने, आनंदाने प्रवास करत राहते. प्रत्येक ऋतूच्या गळ्यात गळा घालून पुढे जाताना ऋतूगंध मनात भरून कविता उत्तरोत्तर अधिकच फुलते. निसर्गाची अद्भुत किमया शब्दांतून कवितेत रंग भरते. कवितेत प्रेम, विरह, सुख, दु:ख, हे सगळे भाव निसर्गाच्या विविध छटांतून व्यक्त होताना, लिहिताना इतके तादात्म पावतात. प्रहराचे विविध पदर आणि मनातले आपले हळवे भाव, जसे जसे समोरच्या दृश्याशी एकरूप होत जातात तसं तसं मनऋतू मिलनाचा भाव शब्दांना फुटत जातो, तेव्हा ऋतूंचा पानाफुलांचा, झाडावेलींचा आगळावेगळा श्रृंगार बहरून येतो. मनझुल्यावर झुलताना मन पाखरू बनून आकाशात उडू लागतं. आभाळ निळं जांभळं गुलाबी रंगलेलं जेव्हा रंग घरभर पसरू लागतात तेव्हा आपोआपच एक एक रंग गडद होत जाताना संधीप्रकाशातून अंधाराकडे झुकणारी रात्र मनात घर करायला लागते. काळोखात उगवणाऱ्या चांदण्यां बोलू लागतात मनातलं तेव्हा चांदण्यांशी संवाद साधताना आपोआपच भावविभोर होऊन कागदावर टपोरं चांदणं होऊन उतरतात.

ऋतूचे स्वभाव जसे  बदलतात तसे आजुबाजूचे वातावरण ही बदलते. मी कविता लिहीत असताना निसर्गाशी एक अनोखं नातं जुळलं. प्रेमभाव, विरह, आठवणी, वेदना शब्दाशब्दातून व्यक्त होताना निसर्गाचं व मनाचं एक वेगळचं नातं शब्दांतून गुंफले जात होते व यातूनच अनेक प्रसंग डोळ्यांसमोर असताना मनात  भाव निर्माण होताना काव्यचित्र शब्दाद्वारे साकारत होते. केवळ निसर्गच नव्हे तर असे किती तरी आशय विषय सतत मनात रेंगाळत असताना भावतरंग जसं जसे फुलत गेले तसं तसे कविता अंतरंगात फुलत गेली आणि कविता हे जगणं कधी झालं कळले नाही. 

ललित :- माझी लेखनाला सुरवात कवितेतून झाली. सुरवातीला मी मनातल्या मनात अव्यक्त आठवणींचा गोफ विणायला लागले होते. सुरवातीला लिहायला आवडायचं म्हणून लिहीत होते. परंतु जेव्हा मी पद्य लेखनाकडून गद्यलेखनाकडे वळले आपसूकच मला माझी नवी वाट गवसली.  कवितेतून जसा निसर्ग झरत होता. तसेच या गद्यलेखनातून निसर्गाच्या छटा मी रेखाटू लागले. अगदी छोटेखानी, तरल, सौंदर्यपूर्ण असे लेखन लेखनीतून बहरू लागले. त्या लेखनाला एक लय आहे व ते सुंदर ललित आहे असे अनेकांनी सांगितले व तू उत्तम ललित लिहू शकते असा विश्वास दिला तेव्हा मी अधिक जोमाने या प्रकारातल्या लेखनाकडे वळले. ललितलेखन म्हणजे काय? ललितलेखनाची वैशिष्टयै काय हे जाणून घेतले.

तसं पाह्यला गेलं तर गद्य व पद्य यांतील धूसर रेषा म्हणजे ललितलेखन होय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता आपण ललित लेखनाची वैशिष्टयै पाहू, रंग गंधासह सजीव चित्र उभा करणं, अवतीभवतीचा परिसर, माणसं यांचं बारकाईने निरिक्षण करून आपल्या दृष्टीकोनातून तो अनुभव समृध्द करून सहज सोप्या, भाषेत लिहिताना, गोड रसाळ, मधुरभाषा, सौंदर्यपूर्ण, उपमा, अलंकार यांचा वापर करून भाषासौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न ललितलेखनात केला जातो. लेखनाचा छोटा आलेख पण आशय गहन असा आकृतीबंध असतो. आणि तो पूर्णपणे आपल्या अनुभवाच्या पातळींवर उतरलेला लेख असतो. त्याला वास्तवाची जोड असते. ललित लेखनाची भाषा ही लालित्यपूर्ण चटकदार खुसखुशीत असते. नर्म विनोदी प्रसंग वापरून तर कधी नेमकीच विधाने वापरून, आटोपशीर लेखनपध्दती ललितलेखनात अवलंबता येते, ललितात्मक लेख वाचताना त्यात आपल्याला लय, नाद, माधुर्य, काव्यात्मक स्पर्श  त्या लेखनाला जाणवतो. व्यवस्थित, नीटनेटकेपणा, अभिनव आशयाबरोबरच मांडणीचे नवनवीन प्रयोग करायला ललितबंधामधे वाव असतो. विविध विषय हाताळायला हा उत्तम गद्य प्रकार आहे.

खरंतर जेव्हा सुरुवातीला मी  लिहीत असताना मी ललित लिहित आहे हे माहित नव्हतं. मी सहज सुचेल ते लिहित होते. लिहित असताना कधी कधी आजोळच्या अंगणातला पिंपळ मनात सळसळायचा. कधी वाड्यातला झोपाळा खुणवायचा. पार्वतीआजीचं कपाळावरलं हिरव्या मेणात कोरून लावलेलं रुपायाएवढं कुंकू, दादाच्या खांद्यावरचं उपरणं, ताईआजीचं तिन्हीसांजेला ढाळजात पांढऱ्याशुभ्र कापसाच्या वाती वळणं, कबईने मायेने हातावर ठेवलेला लोण्याचा गोळा, कधी वडिलांच्या वडिलोपार्जित गावातला वाड्याचा फिरकीचा दरवाजा, गावातलं मारुतीचं मंदिर, काकूआजीच्या हातचा शेळीच्या दुधाचा कोरा करकरीत चहा, आप्पाआजोबांच्या बटव्यातला रुपया, धान्यानं भरलेल्या कणगी, उतरंडी मनात भरून राहिलेल्या. अशा मनात रूंजी घालणाऱ्या अनेक आठवणी कागदावर रित्या होताना एक वेगळाच आनंद देत होत्या.

जेव्हा जेव्हा एकांती कधी पहाटेला लिहायला बसायचे तेव्हा आजोळच्या वाड्यातला, गोठ्यातल्या गाई बैलांच्या गळ्यातला घुंगुरमाळांचा खुळखुळ आवाज मला ऐकू यायचा. तो नाद कानात रुणझुणत असताना शब्द कागदावर झरझर उतरायचे. कधी कधी भरदुपारचा एकांत अस्वस्थ करायचा.  अंगणातल्या सावल्या विसावताना मन बालपणीच्या आठवणींत रमायचं नि मनाचा हा विरंगुळा व त्या आठवणी कागदावर टिपाव्या असं वाटायचं. सांजवेळी सांजनिळाई मनगाभाऱ्यात दाटून यायची. आईची एखादी आठवण किंवा आजीचे शब्द आठवायचे.  तेव्हा मन आपसूकच भरून यायचं. शब्दांच्या पागोळ्या कागदावर टपटप टपटपायच्या. या पागोळ्या सर सर ओळींच्या नाजूक भावधाग्यात ओवायच्या. तेव्हा याच्या दर्वळानं मनगंध फुलायचा आणि खूप प्रसन्न, आनंदी वाटायचं.

एका छोट्याशा गावातून नवीनच लग्न होऊन मी आलेली. कोणाचीही ओळख नाही, काही नाही. सगळे नातेवाईक दूर राहणारे. निसर्गात रमणारं माझं मन. डोंगर वनराईत वसलेलं माझं माहेर एक छोटंसं गाव. माहेरच्या अंगणातला प्राजक्त, गुलमोहर, अबोली, गुलबाक्षी, हजारी मोगरा, जाई-जुई, चमेलीच्या वेलींशी असलेलं नातं. यांना सोडून मी मोठ्या शहरात राहायला आले. माहीत नव्हतं, की कसं असणार ते शहर, हे नवीन जग. नव्या नवलाईचे, प्रीतीचे अन् सासरच्या कौतुकाचे ते दिवस. तसं मुंबईत राहायला आले याचं आकर्षण होतंच.  पण या ब्लाॅक सिस्टिमच्या सिमेंटच्या संस्कृतीत घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या  माणसांमध्ये मन रमणं तसं मुश्किल होतं. पण एक गोष्ट अतिशय सुखावणारी होती. वर्षातला घामाघूम करणारा कडक उन्हाळा आणि ऑक्टोबरचं कडक ऊन सोडलं तर हिवाळा अन् पावसाळा. सतत चार महिने पडणाऱ्या या पावसानं मन मात्र जिंकलं. कारण खरा पाऊस अनुभवला म्हणण्यापेक्षा मनात भरला तो इथेच.
                   
अंगण नसलं तरी माझ्या दिवसाची सुरुवातच खिडकीत चिवचिवणाऱ्या पाखरांनी होऊ लागली. सातव्या माळ्यावरून किचनच्या खिडकीतून दिसणारं ते निळं आभाळ अन् उंच आकाशात भिरभिरणारे पाखरांचे थवे एकसारखे पाहण्यात मन गुंग होऊ लागलं. दूर रस्त्यावर उभी स्तब्ध हिरवी झाडं. खिडकीतून डोकावलं की दिसणारी कौलारू घरं व त्यावरील कबुतरं, साळुंक्यांची लगबग, रस्त्याच्या कडेने बहरलेली सोनगुलमोहरांची पिवळीधम्मक फुलं. हिरव्या अंगावर भरगच्च भरलेली झाडं ग्रीष्मात, भर उन्हातही मनाला गारवा देऊ लागली. रस्त्याच्या कडेने दुतर्फा फुललेली गुलमोहराची लालतांबडी केशरी फुलं मनाला सुखावू लागली. अन् मी एकटक पाहात राहू लागले ती झाडं फुलण्यापासून पानगळ होईपर्यंत बदलणारे झाडांचे, ढगांचे भाव. आभाळाचे निळे, जांभळे, गुलाबी बदलते रंग अन् त्यांच्या पसरणाऱ्या छटा. कधी काळोख, कधी पहाटेचं धुकं, तर भर दुपार रणरणती. कधी पहाटेचा सूर्योदय तर कधी सांज मावळतीच्या बदलणाऱ्या छटा, रात्रीचा चंद्र अन् चांदण्या लुकलुकणाऱ्या. अन् या खिडकीतल्या आकाशाशी मी मनातलं गुज बोलू लागले.

पहाट झाली अन् गार वारा वाहू लागला, की खिडकीतून मला दिसतात राघू मैनेच्या कवायती, आभाळाच्या अंगणात रंगलेल्या. राघूचं ते गोडगोड बोलणं, पंख पसरून सतत चिवचिवत घिरक्या घेणं, खिडकीतून डोकावणं. असं वाटायचं, की सकाळी सकाळी आपल्याशी गप्पा मारायलाच येऊन बसतात हे राघू. अन् पाहता पाहता राघू पाखरांची शाळाच भरायची. भास्कर गुरुजी कवायती शिकवणारे शिक्षक आणि हे राघू विद्यार्थी विविध कवायती करणारे पाहताना मोठी गंमत वाटायची. घराबाहेर बाजूलाच जांभळीची, आंब्याची झाडं. त्या झाडांवर पिकवलेली जांभळं अन् आंब्याचे पाड खायला गर्दी करणारी ही राघू पाखरं पाहिली, की मन आनंदाने चिवचिवायचं. येऊरची दूरवर पसरलेली डोंगररांग पावसाळ्यात व हिवाळ्यात दाट धुक्यात बुडालेली. नंतर पाऊस, धुकं जसजसं कमी होत जाई तसे भुरकट सोनेरी होत गेलेले डोंगर, वसंत ऋतूतली पानगळ, आंब्याला फुललेला सोनपिवळा मोहर, कोकिळचं कुहू ऽ कुहू ऽ कुहू ऽ कुहू ऽ गुंजन इथेच मनात ठसलं. पण कघी कधी चोवीस तास कोकिळेचा तोच तोच सूर नकोसा वाटायचा. तसं कधी कधी त्रास व्हायचा. पण कधी कोकिळ नाही गायला तर मी त्याला खिडकीतून शोधत राहायचे कुठे दिसतो का. कान टवकारून ऐकत राहायचे, एकटक पाहात राहायचे. 

दूर डोंगराच्या पाऊल वाटेवरचं वैशाखातल्या पळसाचं फुलणं अन् घरासमोरच्या वाटेवरच्या पिंपळाची शिशिरातली पानगळ.  ही सगळी निसर्गचित्र इथंच मनात घर करू लागली. चैत्र-वसंतात पिंपळाच्या अंगावर तांबूस पालवी फुटलेली मोहक. ती मनात सळसळू लागली. या पिंपळाच्या अंगाखांद्यावर खेळणारी चिऊपाखरं पाहिली, की आजोळच्या वाड्यातला पिंपळ आठवायचा आणि मनपावलं आजोळची वाट चालू लागायची कळायचंही नाही कधी  आजोळचं गाव फिरून यायची. आषाढातले ढग पाण्याने भरलेले अन् पौर्णिमेचं चांदणं यांचं अद्भुत दृश्य. आकाशात फुललेलं गुलाबी चांदणं मी इथेच अनुभवलं. बाल्कनीतल्या  छोट्याशा बागेत फुललेली फुलं. जास्वंद, मोगरा, बोन्सायची एक दोन झाडं. कबुतरांची गुटर्गु तर आजुबाजूला सतत असायची. या कबुतरांचं घरातल्या माळ्यावर येऊन बसणं, तर कधी बाल्कनीतल्या कुंड्यांमागे घरटं बांधणं तसं त्रासदायक पण छानही वाटायचं. मग एकच उद्योग. घरट्यातली कबुतरांची छोटी छोटी अंडी अन्  पिल्लांचं  उडेपर्यंत निरीक्षण करणे. पिल्लांच्या मानेवर चढलेले ते मोरपिशी  पिंगट रंग पाहायचं  कुतूहल असायचं. अजूनही आहे. कबुतराचं गुटर्गू करता करता मान लचकवत चालणं पाहायला खूप आवडायचं. टेरेसखालच्या माळ्यावर सोसायटीत फिरणाऱ्या मांजरीची गोड चार पाच पिल्लं पाहिली, की एक आगळाच आनंद  व्हायचा. कधी कधी  बिल्डिंगच्या खिडकीत येऊन बसलेल्या घुबडाचं पहाटेला एकसारखं आवाज करणं हा एक वेगळाच अनुभव होता माझ्यासाठी. सोसायटीच्या  आवारात मागच्या बगीच्यातला चाफा, प्राजक्त, मोगरा, गोकर्णीची वेल, सदाफुली, स्वस्तिक, गुलाब  व रातराणीची फुलं या सगळ्याशी एक जगावेगळंच नातं जुळलं व हळुहळू माझं मन रमायला लागलं.

अन् सोबत हा लिहिण्याचा छंद बहरला . निसर्गरम्य वातावरण. एक वेगळाच रंग, आनंद मिळाला. खिडकीतून दिसणारा सूर्योदय व  सूर्यास्त. हिरवी पोपटी मखमल पांघरलेला तो डोंगर, गर्द दाट धुक्याची मलमली चादर पांघरलेला. वाहते ढग. सांजसावल्यांचा अन् ऊनपावसाचा श्रावणातला खेळ. जवळच कधी फेरफटका मारण्यासाठी उपवनचा तलाव. रिमझिम पाऊस अन् उसळणाऱ्या लाटा, निसर्गरम्य येऊरचा परिसर व हिरवाई. बोरिवली राष्ट्रीय उद्यानाची रांग. या सर्व वातावरणात राहण्याचा आनंद काही औरच. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या इथला धबधबा. आजुबाजूचे बगीचे. हळुहळू मन रमायला लागलं इथल्या निसर्गात व हे सर्व अनुभवताना जुन्या आठवणी आणि समोरचा निसर्ग यांची सरमिसळ होत असताना, एक वेगळाच भावरंग चढायचा अंतरंगातल्या शब्दचित्रांना. अन् मग जुन्या आठवणी व डोळ्यांसमोर दिसणारा हा निसर्ग यांचं भाववर्णन आपसूकच कागदावर उतरलं.

ललित निबंध कसा सुचतो व फुलतो ? याला उत्तर दयायचं तर ती एक सौंदर्यपूर्ण सुंदर अनुभूती आहे. अलीकडील काळात बरेचसे लेखक ललितलेखनाकडे परत वळताना दिसत आहेत, खरंतर सुरूवातीला कविता लिहून झाल्यावर काही लेखक ललितलेखनाची वाट सहज पकडतात कारण ती अनुभवावर आधारीत म्हटलं तर सहज व सोपी अशी निर्मितीक्षम वाट आहे ज्यांचा विस्तार मर्यादीत व आलेखही उंच आहे जो वाचता क्षणी मनात ठसणारा असतो. परंतु जर का लेखकाने काही खोट्या लकबी व्यक्तित्वाच्या व अभिव्यक्तीच्या आपल्या लेखनात मांडल्या तर तो ललितलेखनाचा त्याचा प्रयत्न हस्यास्पद होऊन, फसू शकतो, म्हणून आजघडीचा वाचक हा अधिक सजग आहे हे लेखकाने ध्यानात ठेवले पाहिजे.  

ललितबंधात्मक असं लेखन  हे माझ्याकडून उत्सुफूर्तपणे घडलं. व आपण केलेलं हे आठवण पर, व्यक्तीनिष्ठ, निसर्गपर ललितलेखन हे पुस्तक रूपाने पुढं आलं पाहिजे हा विचार आला कारण आपलं सण, परंपरा, उत्सव साजरा करणं खूप कमी झालंय. जुन्या गोष्टी, वस्तू  नामशेष होत चालल्यायेत, जुनी मायेची माणसं ही खूप कमी झाली आहेत. हे सर्व जीवनभान जीवंत राह्यला हवं असं वाटलं आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहचायला हवं. यातून या ललितलेखांच्या संग्रहाची निर्मिती होईल या अनुषंगाने वाटचाल सुरू केली व लवकरच हा लेखसंग्रह 'मंतरलेली उन्हे' या नावारुपाला येत आहे.


कथा:- माझी कथा लेखनाची सुरवात व एकंदर प्रवास मजेदारच म्हणावा लागेल, कारण मुळचा कविता लेखनाचा पाया, ललितलेखनाची वाट व या अनुषंगाने दुसऱ्या बाजुने कळत-नकळत दीड दोन वर्ष होत गेलेलं कादंबरीचं लेखन हा माझ्यासाठी एक आनंददायी अनुभव होता. दोन-तीन वर्षाच्या कालावधीत  सातत्याने लेखन करत असताना  माझ्या अवतीभवतीचा परिसर व जुन्या आठवणींचा परीघ सोडायला तयारच नव्हते. कधी कधी अनावधानाने तर कधी कधी जाणिवपूर्वक लेखन करतानाही तोच तोचपणा लेखनात येत होता. तो टाळण्यासाठी मी थोड्यादिवस लेखणीला पूर्णविराम देण्याचे ठरवले व वाचनाला प्रारंभ केला. दरम्यानच्या काळात कथा वाचन-लेखन चालुच होतं. विविध कथाप्रकारांचा अभ्यास करताना नवनविन जाणिवा प्रगल्भ होत होत्या. मार्ग सापडत होता. कथाविश्वाचा अवकाश, त्याची व्याप्ती व प्रकार कळत होते. आपल्याच अनुभवाकडे त्रयस्थ वृत्तीने कसं पाहवं हे मी शिकत होते. एकच गोष्ट दहा पध्दतीने कशी सांगता येईल हे विविध कथालेखकांच्या कथा वाचताना ध्यानात येत होते. मात्र स्वःत्वाचा कोष तोडून बाह्य जगाकडे डोळसपणे पाहण्याची, स्विकारण्याची व तेच कथारुपाने कागदावर उतरवण्याचे कसब मात्र अजून गवसत नव्हते. कित्येक वेळा ठरवून लिहायला बसल्यावरही लिहायला जमत नव्हतं. तासनतास विचार करत राह्यचे. कधी कधी सगळं विसरायला व्हायचं. काय लिहावं काय लिहू नये कळायचं नाही. पण रोज थोडं थोडं जे सुचेल ते लिहित राह्यचे. कधी कथेचं शीर्षक तर कधी एखादं पात्र सापडायचं. कधी एखादा प्रसंग तर कधी कथेची सुरवात, शेवट आणि  असंच  लिहिता लिहिता या कथा संग्रहातील कथाबीजं मनात रूजली व अनुषंगाने या कथासंग्रहातील विविध पात्र गवसली. त्यांची जगण्याची दिशा, अनुभव, भाषा, प्रदेश, स्वभाव यांची सांगड घालताना. याचं जगणं कळू लागलं. आपलं जगणं कळू लागलं. कधी या पात्रांचा निरागसपणा तर कधी कठीण प्रसंगाच्या कचाट्यात  सापडलेली स्वतःची असाहय्यता, विवशता, त्यांच्या यश-अपयशाची व हरवलेलं जग गवसल्यावर चेहऱ्यावर उमटणाऱ्या विविध भाव भावनांची सुखद व दुःखद या दोंन्ही रंगानी ही भावचित्रे मी या कथाद्वारे शब्दचित्रीत करण्याचा प्रयत्न केला.
कथा का लिहावी वाटते. लिहिण्यामागची भूमिका खूप महत्वाची कथालेखनाचं तंत्र आपल्याला समजलंय आता चला कथा लिहुया म्हटल्याने कथा लिहिता येत नाही. कथा सुचण्याची प्रक्रिया खूप महत्वाची असते. अस्वस्थेतून येणारं कथा बीज हे नेहमी काहीतरी वेगळं मांडण्याचा प्रयत्न करतं. कथा लेखक हा संवेदनशील असायला हवा. कथा निर्मितीच्या प्रसव वेदना त्याला सहन कराव्या लागतात तेव्हाच त्याच्या काळजातून उत्कृष्ट कथेचा जन्म होतो. अवतीभवतीची माणसं, परिसर, त्यांचे प्रश्न, समस्या,  वाचता आले पाहिजे. कथा लेखक म्हणून निरीक्षण क्षमता व नजर चौकस असायला हवी. म्हणजे कथालेखकाला बारीकसारीक हालचालीसह सूक्ष्मतेच्या पातळीवर कथेत बारकावे मांडता येतात.तसं पाह्यलं तर कथा सुचणे व प्रत्यक्ष कागदावर उतरणे ही प्रक्रिया म्हटलं तर कठिण म्हटलं तर खूप सोपी आहे. कधी कधी एका बैठकीत कथा लिहून होते तर कधी कधी एखाद्या ठिकाणी कथा अडकली तर तीन चार महिने आपण त्यात अडकून पडतो. येथे कथालेखकाचा कसच लागतो. ती कथा पूर्ण होण्यासाठी संयम लागतो. कथा लेखनासाठी आवश्यक अशी बैठक लेखकाकडे हवीच. तरच त्या कथेचं विश्व तो उभारू शकतो. व त्याचे कथालेखन अनुभवातून प्रगल्भतेकडे वळतेकथा म्हणजे कुठल्याही घडलेल्या घटनेचा, आपण पाह्यलेल्या वा अनुभवलेल्या गोष्टींचा वृत्तांत नसतो. तर तो आपल्या मनात खोल रूजलेल्या कथा बीजाचा परिपाक असतो. खरीकथा अंतर्मुख करायला लावते. कथाअनुभव हा जीवनाशी भिडता असा पाहिजे

कादंबरी :- माझा कादंबरी लेखनाचा प्रवास व अनुभव माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट होती. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण आनंदाने करायची ठरवतो तेव्हा त्या गोष्टीचं ओझं वाटत नाही अथवा ती गोष्ट रटाळ व कंटाळवाणी वाटत नाही. खरंतर माझी 'गोष्ट एका वळणावरची' ही कादंबरी येणं हा योगायोगच आहे. मी सुरवातीला अगदी छोट्या छोट्या कथेच्या स्वरूपात फेसबुकवर क्रमशः एक सदर लिहित होते. अन् हे सदर पाहूनच मला दैं. संचार मधून कादंबरी नावाचं सदर क्रमशः लेखनासाठी मिळाले साधारणतः दिड एक वर्ष हे सदर मी लिहिलं माझे जवळ जवळ अठ्ठावीस ते तीस प्रकरणं लिहून झाली होती. साहजिकच वर्तमानपत्रात एखादी कादंबरी हे सदर लावायचं म्हटलं की अवघडच कारण एकतर एकसलगता व क्रमशः लिहायचे व त्यात शब्दमर्यादा यासर्व अटी तरी मी लिहित गेले. सुरवातीलाच कादंबरीचा पट मी अखलेला होता. नव्वदचा काळ होता. तरूण मुलगा व मुलगी, दोन कुटूंब, काॅलेज, गाव, परिसर, वातावरण सर्व आखणी मनात ठरवून विषयही अगदी मनात बिंबवला होता मैत्र व प्रेम हा आशय केंद्रबिंदू ठरवून या आशयाच्या आजुबाजूलाच मी ही कादंबरी लिहायची ठरवली होती. अगदी बालपणापासून असलेली निखळ मैत्री, त्यातील अल्लडभाव, निष्पाप मनं अन् त्यातून सहज उमलणारी मैत्री व फुलणारं प्रेम मग हो ना यात गुरफटणं व विरह, ओढ इ.भाव गुंफताना मनाचो अस्वस्थता टिपत पुढे जाणे. 

खरंतर हा माझा पहिलाच प्रयत्न होता. मी मला जमेल त्यापध्दतीने विषय आशय प्रसंग व पात्र यांच्या संघर्षाद्वारे कादंबरी लेखन करत होते. अगदी सहज मनात कुठलाही हेतू न ठेवता जसं सुचेल तसं मी लिहिलं. एक नवोदित लेखक म्हणून मला हे सर्व नवीन होते. कोणाचेही मार्गदर्शन वगैरे नव्हते. पण बरंचसं कळत होतं. निसर्गाची गोडी मुळातच असल्याने मी विषय, काल, प्रसंग व पात्राच्या भावानुरूप त्यात निसर्गभावाचे वर्णन जोडत गेले, म्हणण्यापेक्षा गुंफत गेले. निसर्ग हा माझ्या लेखनाचा मुख्य प्रेरणास्त्रोत व स्थायीभाव असल्याने सहजतेने ते भाव गुंफत गेले.  पात्र, घटना व संघर्ष पुढे सरकत होता. तसेतसे कादंबरी लेखन पुढे सरकत होते. कादंबरी लेखनाचा आवाका मोठा असल्याने लिहिताना विषय व्यापक व सामाजिक कसा होईल व सर्व स्तरातील व वयोगटातील वर्ग समोर ठेवून लेखन केले यात त्यानुसार वैविध्य ठेवून, संवादत्मकता, नाट्यता, सौंदर्यअनुभव, तसेच विविध प्रसंग उभे करताना त्यात कल्पकतेने विनोद तर कधी करूण प्रेमळ भावरंग भरत गेले. पात्रांचे स्वभाव ठरवून न घडवता ठळक न दाखवता त्यांच्या भावमुद्रेतून ते उभे केले.

हे सदर लिहिताना या लेखाचं पुस्तक वगैरे करायचंय असा विचारही माझ्या डोक्यात नव्हता. मी लिहित गेले. नंतर मला आम्ही या कादंबरी लेखनाचं पुस्तकरूपाने पुस्तक काढु ईच्छितो असा एक फोन मला आला. स्वतःहून आपलं पुस्तकं कोणीतरी काढतंय म्हटल्यांवर मग मीही तयार झाले अन् मग चालु झाला माझा खरा प्रवास. कादंबरी म्हणजे काय ? कादंबरी लेखन कसे करावे ? कादंबरी कशी लिहावी. आतापर्यंत अनेक साहित्यिकानी कसे कादंबरी लेखन केले आहे ? कादंबरी लेखनात भाषाशैली? निवेदनशैली ? नेमकं स्वरूप कसं असतं कादंबरीचं व कादंबरीचा घाट कसा असतो आणि लघुकादंबरी, दीर्घकादंबरी यातील फरक काय ? असे अनेक प्रश्न उभे राहीले मात्र जसे जसे संदर्भ वाचत गेले तसे तसे प्रश्नांची उत्तरं आपोआपच मिळाली. यासाठी पहिलं काही संदर्भ ग्रंथ व माहिती शोधली. तसं शाळा काॅलेजात असल्या पासूनच वाचनाची आवड असल्या कारणाने मी बऱ्याच कादंबऱ्याचं वाचन केलं होतं. मात्र आता परत बऱ्याच वर्षाच्या अंतराने लेखनाकडे वळल्याने परत एकदा वाचाव्याशा वाटणाऱ्या कादंबऱ्या वाचल्या. प्रत्येक कादंबरी पुन्हा नव्याने वाचताना नवीन धागे त्यात मिळत गेले व अनेक बारीकसारीक दुवे मला उमगले. खरंतर वाचन हाच तुमचं लेखन समृध्द करतो व तुम्हाला तुमची वाट दाखवतो. तुम्हाला आजुबाजूच्या परिस्थितीचं, जीवनाचं सजगभान हवंच पण त्याबरोबर तुम्हाला माणूस म्हणून जसे संवेदनशील मनाने समोरच्याचे भाव टिपता आले पाहिजेत तसेच तुम्हाला सजग दृष्टीने पुस्तक देखील वाचता आले पाहिजे. खरंतर एक वाचक रसिक म्हणून मीही पहिलं कादंबरी कथासंग्रह वाचायचे व नंतर पुढे अजून वाचायचे पण तेव्हा फक्त आनंद व विरंगुळा म्हणून वाचन करायचे मात्र अनुभवाने मला डोळसपणे पुस्तक वाचायची दृष्टी दिली. कुठल्या लेखकाने कसे पात्र, प्रसंग उभे केले आहे. कसा संघर्ष मांडला आहे. कुठल्या प्रकारात व कुठल्या विशिष्ट आशयाला अनुरूप लेखन केले आहे. ती राजकीय, सामाजिक, पौराणिक, ऐताहासिक वा इतर अंगानी जाणारी कादंबरी आहे. एकदंरच आढावा घेताना अभ्यासू वृत्ती व जिज्ञासा निर्माण झाली. मात्र जसा जसा अभ्यास व वाचन करत गेले. मागचं सपाट पुढचं पाठ अशी अवस्था झाली. निवेदन, भाषा, काळ, सुरवात, मध्य, शेवट अन् संघर्ष, गुंतागुंत अपरिहार्य शेवट यासगळ्या गोष्टी पुढे काय ? काहीच माहिती नसल्याने काय लिहिवं हे कित्येक महिने तर समजतच नव्हते. मग थोडावेळ जाऊ दिला. विचार केला. एक विशिष्ट असा शेवट करायचा ठरवला. त्या अनुषंगाने लेखन करत गेले व माझा कादंबरी लेखनाचा प्रवास पूर्ण झाला.

समारोप :- आपण ज्या परिस्थितीत वातावरणात वाढलो त्या संस्कृतीची विचारांची व निसर्गाची पाळमुळं खोल मनात रूजलेली आपल्या  साहित्यात आपल्याला त्याची प्रतिबिंब आढळतात. खरंतर अती सुखाचा क्षण व अतीव दुःखाचा क्षण हा आपल्या निर्मितीच्या पाठी असतो. प्रत्येकाची सृजनशीलता ही त्याच्या स्वभावावर व प्रकृतीवर अवलंबून असते. साहित्यनिर्मितीची प्रक्रिया कधी कधी सुखदायक तर कधी कधी मनाला थकवा आणणारी असते. मात्र आपल्या मनाप्रमाणे झालेल्या साहित्य कलाकृती निर्मितीचे समाधान हे सांगता न येणारे असतो. तो आत्मिक आनंद, ती अनुभूती मनाला प्रेरक व अतीशय प्रेरणादायी असते. त्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटते व सकारात्मक विचार करण्याची शक्ती मिळते. याउलट एखादी साहित्यनिर्मिती ही मनाजोगी झाली नाही तर मनाची अस्वस्थता व अस्थिरता वाढते व आपण नकारात्मकतेकडे झुकू शकतो. मात्र अशी नकारात्मक उर्जा आपल्या लेखनाला बाधक ठरू शकते. असे आपल्याला कधी वाटल्यास आपण आपले मन विचलीत होऊ न देता. आपण कुठे कमी पडत आहोत ते पाहून परत एकदा प्रयत्न केला तर नक्कीच अजून छान लिहू शकतो. त्यासाठी विषय, आशय व प्रकारानुसार पूरक वाचन केले तर मनातील गोंधळ बराच दूर होऊन आपण एक विशिष्ट वैचारिक बैठक तयार झाल्यामुळे अजून ताकदीचे लेखन करू शकतो. खरंतर एकिकडे उत्तम साहित्यनिर्मितीचा आनंद ही खूप समाधानाची बाब आहे मात्र हेच समाधान जेव्हा आता झालं एकदाचं या उदिष्टापर्यंत पोहचलं की मात्र हीच समाधानाची भूमिका आपल्या उद्दिष्टापासून व ध्येयापासून आपल्याला परावृत्त करण्याची शक्यता असते. म्हणून समाधानी राहवे पण अजून काही तरी या पेक्षा उत्तम करावे अजून शिकावे व लिहावे ही मनोभूमिका मात्र कायम आपल्या मनात  घोळत असावी म्हणजे ही अस्वस्थता आपल्याला साहित्यनिर्मितीच्या यशस्वी पायऱ्या चढण्यासाठी नेहमी प्रेरीत करते.

तनुजा ढेरे


No comments: