![]() |
| म.टा. आठवणीतील गाव |
Monday, 25 April 2022
Saturday, 9 April 2022
हजार धागे सुखाचे - लेखक किरण सोनार
सुख दुःखाची हळवी वीण - हजार धागे सुखाचे
लेखक किरण सोनार
आयुष्यात सुख आणि दु:खाचा खेळ ऊन-सावल्या सारखा असतो. याचं प्रतिबिंब आपल्या आयुष्याच्या आरश्यात सतत झाकोळत असतेच. मात्र दुःखाची सल सतत सोबत असली तरी आपण जगायचं सोडत नाहीत आयुष्यात दुसर्याच्या चेहर्यांवरील हसू फुलवण्याची ताकद जर आपल्या व्यक्तीमत्वात असेल तर याहून मोठे सुख कोणते, हेच जीवनाचं गुपीत सांगणारा हा कथासंग्रह 'हजार धागे सुखाचे' आहे असे मला वाटते. मनोरंजना बरोबरच आपल्याला वेगळ्या जगण्याचा अनुभव देणाऱ्या या कथासंग्रहातील कथा आहेत. आजकाल अनेक कथालेखक कथा लिहित आहेत. कथा म्हणजे चला घडलं काहीतरी आज चला लिहून काढू म्हटल्याने व ते लिहिल्याने ती कथा होत नाही. कथेत पात्र, संवाद, घटना, प्रसंग तसेच विरोधाभास व नाट्य हवे. कथेत वेगळेपणा हवा, म्हणजे आपला अनुभव कदाचित तोच असेल मात्र ती अनुभवाची कलात्मक साहित्यिक मांडणी ही आपली ओळख वाटायला हवी. तरच तुमच्या नावाने तुमच्या कथा ओळखल्या जातील. अगदी तंतोतंत कथा या साहित्य प्रकारात आपली ओळख निर्माण करण्यात लेखक किरण सोनार यशस्वी झाले आहेत असे मला वाटते.
लाॅकडाऊनच्या या काळात माझ्या हाती म्हणण्यापेक्षा, या कथासंग्रहाचे शीर्षक 'हजार धागे सुखाचे' वाचून मीच विकत घेतला चपराक प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केलेला. लेखक किरण सोनार यांचा हा नवा कोरा, छोटे खानी कथांचा पहिलाच लघुकथासंग्रह वाचताना जेष्ठ साहित्यिका विजया वाड यांचे उत्कंठावर्धक असे प्रास्ताविक मनाला भावते व पुढे लेखकाचे मनोगत वाचताना लेखनाचा ध्यास, व्यासंग व आंतरीक आवाजातून उभारलेले भावविश्व म्हणजे हा कथासंग्रह आहे हे जाणवते. तर चपराकचे संपादक घनश्यामल पाटील यांनी या कथासंग्रहाची पाठराखण केली आहे. उत्कृष्ट असे रेखीव साजेसं मुखपृष्ठ संतोष धोंगडे या अनुभवी मुखपृष्ठकारानी रेखाटले आहे. त्यामुळे हा कथासंग्रह अजूनच देखणा झाला आहे.
पत्रकार, सामाजिक कार्यकता असलेला हा लेखक आपल्याला आलेले अनुभवकथन करण्यासाठी धडपड करतोय व त्यासाठी निवडलेले हे कथांचे माध्यम या कथालेखनाची नस लेखक किरण सोनार यांनी अचूक पकडली आहे. खरंतर सुरवातीला लेखकाने मनोगतात सामाजिक अंगाने जाणारे हे पुस्तक आहे असे म्हटल्यावर आपल्याला हा कथासंग्रह म्हणजे दुष्काळ, स्त्रीसमस्या, अत्याचार यावर आधारीत असे लेखन आहे असे वाटेलही परंतु असे नाहीये. तेच ते पारंपारिक सामाजिक विषय व प्रश्न न हाताळता समकालीन विषय व वातावरण समोर ठेवून जाणिवा-नेणिवाचं भान राखून लेखकाने या कथासंग्रहातील कथाविश्व त्याच त्या प्रश्नांना बगल देऊन आपल्यासमोर अगदी सहजपणे उभे केले आहे.
ओघवती निवेदन शैली व भाषेचा वापर लेखकाने या कथासंग्रहातील लिहिताना केला आहे. कथासंग्रहातील कथा वाचताना सुरवातीला मन हळवे, भावूक व संवेदनशील होते परंतु साध्या, सरळ व सुटसुटीत अंगाने जाणाऱ्या या कथा वाचण्यात आपण जेव्हा मग्न होतो तेव्हा कथा वाचताना आपण भवताल विसरून त्या कथांमधे पुढे काय होणार हा विचार करत रहातो. आटोपशीर संवाद, नेटकी पात्र व प्रसंग उभारणी केल्यामुळे कथा आटोपशीर झाल्या आहेत. आकर्षक सुरवात, मध्य व उत्कंठावर्धक शेवट यामुळे कथा वाचताना कथा क्लिष्ट वाटत नाही व मागचं काय आणि आता काय असे विस्मरण होत नाही. कथेतून तोचतोच पणा जाणवत नाही. प्रत्येक कथेचा रंगभाव वेगळा उमटवण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
खरंतर पारंपारिक कथालेखनाला फाटा देऊन कथेचं स्वतःचं वेगळं भावविश्व उभारून स्वतःचं वेगळेपण मांडण्यात लेखक इथे यशस्वी झाला आहे. या कथासंग्रहात एकूण आठ कथा आहेत, पहिली कथा 'पोरका बाप' या कथासंग्रहातील पोरका बाप मधील हळवा बाप आपल्या कायम लक्षात रहातो. पर्यावरण रक्षक व निसर्ग प्रेमी अण्णा झाडांना पोटच्या मुलाप्रमाणे झाडं जपतात. एके दिवशी मुलाप्रमाणे जपलेल्या झाडांना एक वेडगळ माणूस चापटा मारतो व शिव्या देतो, तेव्हा अण्णा विरोध करतात तर तो त्यांनाही जुमानत नाही, नाईलाजास्तव हे प्रकरण पोलिसापर्यंत जाते, परंतु याच झाडाशी टक्कर होऊन त्या माणसाच्या तरुण मुलाचा मृत्यू होतो. त्याची करुण कहाणी ऐकत शेवटी त्याच्या वेडसर वागण्यामागचे कारण ऐकून आण्णा माघार घेतात. तेव्हा वाचक ही हळवा होतो.
दुसरी हृदयस्पर्शी कथा अनमोल श्वास या कथेत स्वामी हा इयत्ता चौथीत शिकणारा संवेदनशील लहान बालक आपल्या आई वडिलांकडे वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून कुत्र्याचं पिल्लू हवंय असा हट्ट करतो. ते सर्वजण त्याच्या हट्टाखातर कुत्र्याचे पिल्लू घ्यायला पेट शाॅप मधे जातात. दुकानदार योगेश त्यांना अनेक कुत्र्याची पिल्लं दाखवतो. परंतु ती महाग असतात. तरीही तो कुत्र्याच्या पिल्लासाठी हटून बसतो. स्वामीला पाहून योगश त्याला एक अपंग कुत्रा तसाच घेऊन जा म्हणतो. तो खूप आनंदी होतो. योगेश आश्चर्यचकित होतो परंतु यावर स्वामी प्रतिक्रिया आपणास थक्क करणारी आहे. स्वामी व त्याचे आईवडील योगेशला पैसे घ्यायला भाग पडतात. त्या पपीचं मोल समजावून सांगताना स्वामी आपल्या पायातले बूट व साॅक्स योगेशला काढून दाखवतो हे चित्र मन हेलावून सोडणारं आहे.
नजरेतून शिक्षा मधील मजूर कामगार पांडुरंग, त्याची बायको मंजुळा व दोन मुलं गणेश व महेश यांची कथा. कामगार व गावचं राजकारण यात निष्पाप पांडुरंगचा नाहक जाणारा बळी व यातून विस्कटलेले मंजुळेचे आयुष्य अन् गणेशचं जाधवसाहेबाच्या समाधी समोर चपला सोडणं व आपल्या वडिलांच्या समाधीवर रोज नित्यनेमाने फुलं वहाणं कथेतील हळवा शेवट मनाला चटका लावतो. 'अनपेक्षित पाऊलवाटा' या कथेत इंजिनिअरींगची पदवी मिळविलेला मयूर नोकरी मिळत नाही म्हणून निराश न होता मिळेल ते काम करून अनपेक्षित वाटणारी स्वतःची पाऊलवाट तो स्वतः निर्माण करतो. त्याची ध्येयपूर्ती व मेहनत नक्की आजच्या नवयुवकांना प्रेरणा ही कथा युवापिढीला प्रेरणा देणारी आहे.
'इरपाची लढाई' या कथेतील लढा हा नैतिकतेचा आहे. ही कथा सरकारी यंत्रणा आणि नक्षलवादी या दुहींच्या कैचीत सापडलेलं गाव आणि त्या गावातील सुशिक्षित इरपा यांच्यावर बेतली आहे. गावातील अठरा विश्वे दारिद्र्य पाहून इरपाला गावासाठी काहीतरी करावेसे वाटते, परंतु सरकारी अधिकारी व नक्षली यांची दहशत त्याच्यासाठी अडचणीची ठरते. तरीही इरपा गावासाठी असे काम करतो, जे आजपर्यंत कोणीच केलेले नसते, या कथेतून लेखकाने सामाजिक संदेश दिला आहे.
शाळेची खिचडी ही कथा गरीब घरातील गणेशच्या जीवनावर चितारली आहे. गणेश हा बालक त्याचं पितृहृद्य व मातृदायी मन कारुण्यपणे लेखकाने या कथातून रेखाटले आहे. इयत्ता चौथीत शिकणारा गणेश शिक्षकांना चोर वाटतो, परंतु तो रोज शाळेत मिळणारी खिचडी संपूर्ण न खाता काही घास आपल्या चारपाच वर्षासाठी राखून ठेवतो. घरी जाऊन भरवतो. शाळेतले पाटील सर त्याचा पाठलाग करतात. मात्र वस्तुस्थिती जाणताच पाटीलसरांना अपराध्यासारखे वाटते. हा शेवट वाचताना वाचकही नकळत भावनाविभोर होतो. कधी कधी परिस्थितीवरून मत बनवणं कसं फोल असतं हे या कथेत लेखकाने छान प्रत्ययास आणून दिले आहे.
स्कार्फवाली बाई ही कथा नवरा बायकोच्या घरगुती वादावर गुंफली आहे. विनाकारण बायकांची नवऱ्याबद्दलची संशयी वृत्ती किती निरर्थक असते हे या कथेतून लेखकाने खूपच रंजक पणे लिहिले आहे. भांडणाचे कारण जाणताच वाचकही स्तंभित होतो.
हजार धागे सुखाचे ही शीर्ष कथा आहे. ही कथा नोकरी गमावलेल्या रणजीतच्या जीवनावर आधारित आहे. आधुनिक लाइफस्टाइल जगत असलेल्या रणजीतला नोकरी शोधूनही मिळत नाही, तेव्हा त्याला खूप नैराश्य येते. परंतु या नैराश्यमय काळातही मनाला उभारी देणारी एक घटना घडते, व रणजीतला जगण्याची एक सकारात्मकता निर्माण करते. या कथेतून लेखकाला दुःखातही सुख पेरलेले असते हे सांगायचे आहे.
या सात कथा व शेवटची शीर्षक कथा हजार धागे सुखाचे लेखकाच्या भाषेतच सांगायचे झाले तर आपल्या जीवनात एक धागा दुःखाचा आहे पण हजारो धागे सुखाचे सोबत आहेत व हेच सुखाचे क्षण, हीच उर्मी जगण्याला प्रोत्साहित करते. जीवनाचं मर्म व कर्म यावर संवेदनशील संवादातून कथात्मक अंगाने भाष्य करणारा आशयगर्भ असा हा कथासंग्रह आपल्याला अंर्तमुख करतो. या कथासंग्रहातील भावविश्व जरी सामाजिक अंगाने जात असले तरी या कथात भावनिक उमाळा व कौटुंबिक जिव्हाळा आहे. कथासंग्रह वाचनीय झाला आहे.
कथासंग्रह - किरण सोनार (नाशिक)
(पत्रकार-लेखक)
प्रकाशन-२६ जून २०२०
चपराक प्रकाशन- पुणे
पृष्ठसंख्या-१८०
मुखपृष्ठ - संतोष धोंगडे
मूल्य-१०१/-
पुस्तक परिचय- सौ. तनुजा उल्हास ढेरे ( एम.ए)
Friday, 8 April 2022
भेटीगाठी- श्याम पेंढारी
भेटीगाठी - ललित लेखसंग्रह - श्याम पेंढारी
कुसुमाकर मासिकाचे संपादक श्याम पेंढारी यांचे 'भेटीगाठी' हे पुस्तक अलीकडेच वाचनात आले. जे.के. मिडिया प्रकाशन संस्थेच्या ज्योती कपिले यांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक. चित्रकार सतीश भावसार यांचं उत्कृष्ट मुखपृष्ठ. खरंतर या पुस्तकाची अर्पणपत्रिका व प्रास्ताविक वाचले आणि मनात कुतूहल निर्माण झाले. या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य असे की लेखकाने चक्क मनीमाऊशी संवाद साधला आहे. आपल्याला भेटलेली माणसे, आलेले अनुभव व मनातल्या गोष्टी लेखकाने अतिशय सहृदयभावनेने हळुवारपणे या आपल्या आवडत्या मनीमाऊजवळ व्यक्त केल्या आहेत. लेखकाचे गावच्या कौलारू घरावर, घरात पाळलेल्या मांजरींवर व कुत्र्यावर असलेले प्रेम व याचबरोबर लेखक- कवी म्हणून अनुभवलेल्या विविध साहित्यिक घडामोडी, तसेच भेटलेले कवी-लेखक त्यांच्या आवडलेल्या गोष्टी यांना खुल्या मनाने लेखकाने दिलेली दाद भावते. तसेच मनातील खंतही अतीशय संयत शब्दात लेखकाने मांडले आहे. एकशे बारा पानाच्या या छोटेखानी पुस्तकात तीस लेख आहेत व हे लेख नुसते माहितीवजा नाहीत तर या लेखांमधे लेखकाने अतीशय सूक्ष्मपणे प्रत्यक्षात भेटलेल्या व मनात वसलेल्या ठिकाणांचे सूक्ष्मपणे भावचित्रण केले आहे. जसे की 'गिरगाव', 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इ. तसेच लेखकाने वाचलेलं व भावलेलं एखादं मासिक, वर्तमानपत्राच्या रविवारच्या विविध पुरवण्या, कविसंमेलन व कविसंमेलनात भेटलेले कवी व आयुष्यात भेटलेले मित्र व त्यांचे अनुभव या मनीमाऊशी लेखकाने अतीशय सहज आपण एखाद्या मैत्रणिंशी गप्पा माराव्या अगदी तसाच संवाद लेखकाने साधला आहे. आणखिन एक गोष्ट केवळ आठवणी वजा लेखन न करता लेखकाने महागाई, बेरोजगारी, राजकारण, समाजकारण याविषयावरही या पुस्तकातून संवाद साधला आहे. यावरून एक लेखक म्हणून लेखकाची वर्तमानाविषयी जागरूकता व भविष्याविषयी असलेली मनातील काळजी दिसून येते. त्याचबरोबर आठवणींची सुंगधी कुपी आपल्या मनीमाऊ समोर उघडली आहे. प्रसन्न,ओजस्वी व ओघवती भाषा, प्रसंगी कवितेच्या व गीतांच्या ओळी यामुळे हे लेख वाचनीय झाले आहेत. प्राजक्त, मातीचे घर, मैत्रीचा गाव हे कवितासंग्रह, वळणावरती कादंबरी व कंदील हा लेखसंग्रह ही अन्य पुस्तके देखिल लेखकाची वाचनीय आहेत.
@ तनुजा ढेरे
#भेटीगाठी
#श्याम पेंढारी
आलोक - कथासंग्रह परिचय
आलोक - आसाराम लोमटे कथासंग्रह
आ लो क - आसाराम लोमटे
![]() |
| आलोक आसाराम लोमटे |
लेखक-पत्रकार-परभणी) यांचा हा कथासंग्रह, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त (२०१६), मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमात समावेश असलेला हा कथासंग्रह विद्यार्थांना वास्तववादी दृष्टीकोनातून जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तर देतोच परंतु त्याचबरोबर साहित्यिक अंगाने कथानका मार्फत कथा लेखनाकडे पाहताना कसं पहावं हेही हा कथासंग्रहाद्वारे शेवटी लेखक सांगतो. मुंबईच्या शब्द पब्लिकेशन जानेवारी २०१० मधे हा कथासंग्रह प्रकाशित केला. 'इडा पिडा टळो' हा कथासंग्रह व 'धूळपेर' लेखसंग्रह अशी आणखी दोन पुस्तकं लेखकाची प्रकाशित आहेत. 'चिरेबंद', 'ओझं', 'खुंदळन', 'कुंभाड', 'जीत' व 'वळण' अशा एकूण सहा दीर्घ कथा या कथासंग्रहात आहेत.
कथासंग्रहाच्या सुरवातीला अर्पणपत्रिकेत लेखक म्हणतो, 'अशांना, ज्यांची मुळं अजूनही मातीत आहेत.' त्यांना समर्पित. इथेच लेखकाच्या प्रतिभेची चुणूक दिसून येते. अचूक प्रतिमा, प्रतीके व निवेदनशैलीचा वापर करून आपल्या कथाविश्वाला पोषक पायाभरणी करूनच कथाकार आसाराम लोमटे आपल्या कथेतील मूळ गाभ्याला हात घालतात.
'चिरेबंद' या कथेची सुरवातच पाह्यली तर जाणवते, 'दोन-चार दिवसांपासून चालू असलेली पावसाची झड. आभळातून कणी-कोंडा गळत राहावा तशी पावसाची भुरभुर सुरूच.' अगदी अचूक निसर्ग प्रतिमा वापरून कथानकाला लेखक हात घालतो या कथेतून लेखकाने ओघवत्या शैलीत आत्मनिवेदन पध्दतीने, प्रसाद या वीस- बावीस वर्षाच्या तरुण नायक पात्राच्या सहाय्याने कथा उभारली आहे. त्याची आजी, आजोबा व चिरेबंदी वाडा यांच्याशी जोडलेली त्याची नाळ व ओळख, नव्या व जुन्या नातेसंबंधातील वीण, पावसाच्या संततधार लयी सारख्या उलगडत त्यातून निर्माण झालेल्या अस्वस्थ वर्तमानाचे जीवंत चित्र या कथेतून उभे केले आहे.
तशीच 'ओझं' ही कथा, या कथेचं पहिलं वाक्य, डरपोक माणसासारखा पाऊस पळून गेलेला. एखाद्या भित्र्यागत दडी मारून लपून बसलेला त्याच्यात धाडसच नाही धाड धाड आवाज करीत यायचं. एखाद्या धिप्पाड माणसानंही बुळ्यासारखं असावं तसं आभाळाचं येणंही वांझ वाटायलेलं.' दोन भावांची ही कथा एक प्राध्यापक व एक शेतकरी दोघांच्या मनामधील अंतर मांडणारी. कथेची सुरवात, मध्य व शेवट कथेचा घाट बांधून, पात्र, प्रसंग व वातावरण निर्मिती करून पात्रापात्रातील संबध त्यातून वातावरणनिर्मिती करत तसेच त्या व्यक्तीच्या वैयक्तिक पातळीवर/ सामुहिक पातळीवर त्या पात्राच्या मनोभूमिकेत शिरून त्यांच्या मनातील अंतर्गत संघर्षांतून प्रसंगानुरूप निवेदन करत कथांची उभारणी केली आहे.
'खुंदळन' ही कथा ग्रामीण भागातील राजकारणावर आधारीत असून, ठसठशीत अशा भाषेचा प्रयोग लेखकाने या कथेत केला आहे. उदा : ' आडरानात अब्रू लुटलेल्या बाईसाहेब पोरकेपण भवती दाटून आलं.' ही कथा 'दत्ताराव' या व्यक्तीरेखेभोवती गुंफलेली आहे. ग्रामीण भागातील गटबाजीय राजकारण, त्या राजकारणात सहभागी व्यक्ती, त्याचा कुटूंबातील सर्व सदस्यावर त्याचा होणारा परिणाम अधोरेखीत केला आहे. 'जीत' ही कथाही ग्रामीण परिसरातील राजकीय जीवनावर भाष्य करते, ग्रामीण जगण्यातले बारीकसारीक संघर्ष अनुभवाच्या पातळीवर साकारले आहेत. प्रथमपुरूषी व तृतीयपुरूषी निवेदनातून पुढे आलेल्या या कथा घटना, प्रसंग व प्रतिमांच्या सुयोग्य वापराने व बोलीभाषेच्या वापरामुळे अजूनच उठावदार झाल्या आहेत.
'कुभांड' या कथेतून गावातल्या राजकारणात परस्परांचा काटा काढण्यासाठी सामान्य माणसाचा वापर कसा होतो याचे दर्शन होते. तशीच 'वळण’ ही कथा, मनाचा तळठाव गाठणारी ! शेळ्या राखणाऱ्या व त्यावर गुजराण करणाऱ्या शेती राख्याची लाडकी मुलगी प्रयाग उर्फ पगन. आठव्या इयत्तेत शिकणारी, सातवीला स्कॉलरशिप मिळवळलेली शाळेतील एकमेव मुलगी. तिला शिक्षणाची आवड आहे. आईबापालाही वाटतं की आपल्या मुलीने शिकावे मोठे व्हावे. त्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. ‘प्रयाग’ रोज वाडीवरून गावातील शाळेत चालत जाते. एक दिवस प्रयाग एकटीच जात असताना वाटेवर कोणाच्यातरी चिरकण्याचा आवाज ऐकू येते, ती मागे वळून पहाते तर डगरीवर तिला एक माणूस दिसतो. तिथे खून झालेला असतो. नंतर पोलीस तिची चौकशी करतात. प्रयागच्या शिक्षणाचं काय होतं हे पूर्ण कथा वाचल्यावर समजतं. या कथेत गरिबांची होणारी ससेहोलपट, त्यांना जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, मुलांना शिक्षणासाठी करावी लागणारी पायपीट, ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलांच्या गळतीची कारणं, हातावर पोट असणाऱ्यांचा आयुष्यातील एक कोडं सुटताच दुसऱ्या कोड्यात अडकावं ही अवस्था वाचकाला अस्वस्थ करते.
लेखक आसाराम लोमटे आपली लेखनासाठी भूमिका मांडताना म्हणतात, "सगळ्यांच्या घड्याळात एकाच वेळी विशिष्ट ठिकाणीच काटे असतील पण सगळ्यांच्या वाटेला आलेला काय सारखाच नसतो." आपल्याला तो वेगळा काळ, ती गोष्ट, तो क्षण पकडता आला पाहिजे. ग्रामीण परिसरातील माणसाच्या जगण्यावर प्रकाश टाकणारा हा कथासंग्रह आहे. ग्रामीण कथा म्हणजे इरसाल गोष्टी व किस्से या जातकुळीत बसणारी त्यांची कथा नाही. असे लेखक स्पष्टपणे कथासंग्रहात शेवटी लिहिण्यामागची 'भूमि'का या भागात आपली भूमिका मांडताना ठामपणे सांगतात. माझी कथा ही ग्रामीण कथा नसून या कथांचा लिहिण्याचा परिसर जरी ग्रामीण असला तरी या कथा माणसांच्या आणि त्याच्या जगण्याच्या आहेत. तळागाळातील माणसाचा शब्द गुदमरु नये त्याला वाचा मिळावी या अंतरिक प्रेरणेतून मी लिहितो आहे.
ग्रामीण जीवनातील जीवन जगत असताना नैसर्गिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवस्थेला, अडचणींना तोंड देताना, ग्रामीण माणसांच्या मनाची तगमग, अहाय्यता व शोषण त्याबरोबर आनंद व दुःखाचे क्षण या कथासंग्रहातील कथातून संवेदनशील रित्या लेखकाने मांडले आहेत. केवळ शेत, शेतकरी, दुष्काळ इथपर्यंत न थांबता शेतमजूर, कामगार, दलित, स्त्रिया यांच्या दैनंदिन जगण्यातील संघर्ष अतिशय तळमळीने अंतरिक उर्मीने कथातून आला आहे. माणसाच्या मनाचा तळ शोध घेताना, मनाचा तळ गाठला यायला हवा व तो आपल्याला त्या कथेच्या वा पात्राच्या अनुषंगाने आपल्या कथेत त्या कथेचा पात्र प्रसंग व निवेदनानुसार कथानकाच्या भाषेतूनच मांडता यायला हवा.
खरंतर आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असताना आपल्यासमोर अनेक अडीअडचणी असतात. वैयक्तिक व सामूहिक पातळीवर सर्व स्तरावर अनेक प्रश्न उभे असतात परंतु आपण स्वतःच्या कोषात एवढे अडकलेले असतो की सभोवताली काय चाललंय तेच आपल्याला कळत नाही. आपल्या जाणिवा बोथट होत जातात. आपण काळानुसार समुहा बरोबर न चालता वैयक्तिक आपले जीवन जगण्यात मशगूल झाले आहोत. आणि नेमका हाच धागा लेखक आसाराम लोमटे यांनी आपल्या या कथासंग्रहात पकडला आहे. काळानुसार बदलणारे प्रश्न व बदलती संवेदना यांचे सामुहिक जीवन जगताना अनुभवाच्या पातळीवर होणारी मनाची घुसमट व अस्वस्थता त्यांनी आपल्या कथांतून मांडली आहे. त्यांची कथा ही समूहाची कथा आहे.
तसे पाह्यले तर विसाव्या शतकाचा प्रवास चालु आहे. ग्रामीण भागात आता बरेच बदल होत आहेत, या अनुषंगाने ग्रामीण भाग नागर होत चालला आहे. आलोक मधील कथा या निमशहरी ग्रामीण जीवनाच्या वर्तमानावर भाष्य करणाऱ्या आहेत. शेतकरी हे ग्रामीण जीवनाचं मुख्य अंग आहे. शेती हा परंपरागत व्यवसाय व अनुषंगानेच येणारे प्रश्न, निसर्गाचा प्रकोप, दुष्काळ, अज्ञान, गावातलं राजकारण अशा अनेक विषयांना हात घालत ग्रामीण जगण्यातील ज्वलंत व जिवंत अनुभव आपल्यासमोर वास्तव जगण्याच्या पातळीवर लेखकाने उभे केले आहेत. वास्तविक दृष्टिकोनातून ग्रामीण माणसाच्या जगण्यावर प्रकाश टाकणाऱ्या या कथा साहित्यिक मुल्यांच्या पातळीवर सर्वांगाने उतरल्या आहेत.
ग्रामीण जगणं जगत असताना काळ्या मातीशी नाळ जोडलेल्या व त्या मातीतूनच उभारीने उभं राहून उगवलेल्या प्रत्येक नव्या दिवसाच्या चांगल्या बऱ्या वाईट अनुभवाना तोंड देत चार उन्हाळे-पावसाळे पाहिलेली, समोर उभ्या परिस्थितीशी जुळवून घेताना होत असणारा प्रासंगिक संघर्ष, मनातील अस्वस्थता व त्याच बरोबर त्या पात्र व्यक्तिरेखेबाबतचा जिव्हाळा ओलावा याची करूण छटा लेखकाने आपल्या कथानकातून हुबेहुब जीवंत चित्रित केली आहेत. त्यांच्या निवेदनातून व बोली संवादात्मक शैलीतून त्या घटना ती पात्रे आपल्याशी जीवंत बोलत आहेत असे वाटते. वास्तववादी दृष्टिकोनातून कथा मांडताना कथेला कलात्मकतेची जोड देत व्यापक आशयअंगाने पुढे येत वाचकाच्या मनाचा तळ गाठतात व वाचकास समकालीन कालखंडाच्या चाकोरीतून समोरच्या वास्तवाकडे उघड्या डोळ्याने पाहण्याची नवी दृष्टी देतात हे या कथासंग्रहाचे यश आहे.
कथासंग्रह- आलोक
लेखक - आसाराम लोमटे
प्रकाशन - शब्द पब्लिकेशन मुंबई
पृष्ठसंख्या
मूल्य -२५० रुपये
पुस्तक परिचय- सौ.तनुजा उल्हास ढेरे ( एम.ए- मराठी)
#आलोक
#आसाराम लोमटे
नेट- सेट स्पर्धा परिक्षांना सामोरे जाताना
नेट- सेट परिक्षेला सामोरे जाताना
सेट- नेट या दोन्हीं परिक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. अगदी सहा ते सात टक्के रिझल्ट लागला. त्यातही नेट परिक्षेत वयोमर्यादा व मेरीटप्रमाणे जेआरएफ मिळते. खरंतर ही परिक्षा आजच्या युवापिढीसाठी त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी एक उत्तम अशी संधी आहे. परिक्षाभिमुख अभ्यास केला तर यश तुमच्यासमोर उभे आहे. या परिक्षांचा अभ्यास करताना मला जाणवलेली गोष्ट म्हणजे इतिहास, इंग्रजी, संस्कृत, हिंदी या भाषा विषयाच्या तुलनेत मराठी हा विषय घेऊन परिक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच मराठी विषयाचा कटऑफही कमी आहे. नेट- सेट या परिक्षांचा मागील तीन- चार वर्षाचा निकाल जर पाहिला तर ४८ ते ५० % सरासरी मराठीचा कट ऑफ लागतो खुल्या प्रवर्गासाठी आणि इतर गटासाठी ४४ ते ४८ % कटऑफ लागतो. यावर्षी नेटमधे मराठी विषय घेऊन २५२५ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी १७१ विद्यार्थी असिस्टंट प्रोफेसर यापदासाठी क्वालीफाय झाले तर २३ विद्यार्थ्यांना जेआरएफ मिळाली. सेट परिक्षेत साधारण ४७०० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २८२ विद्यार्थीच क्वालीफाय झाले. मराठी विषयात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एवढी कमी का ? ते कुठे कमी पडतात ? याचं कारण काय ? या परिक्षा देताना मुलांना काय अडचणी येतात ? याचा थोडा अभ्यास केला असता जाणवलेली गोष्ट कोणती तर परिक्षांच्या अभ्यासक्रमाची पुरेशी माहिती नसणे. अभ्यासक्रमास असलेले घटक, उपघटक कोणते ? त्या घटकातील मुद्दे-उपमुद्दे संकल्पना यांचा आकलनात्मक अभ्यास करून वस्तुनिष्ठपध्दतीने कसा प्रश्न येऊ शकतो हा विचार इथे महत्वाचा आहे असे वाटते. पेपर पहिला हा अध्यापन अभियोग्यता चाचणीपर दहा घटक ५० प्रश्न १०० गुण व दुसरा पेपर मुख्य विषय दहा घटक १०० प्रश्न २०० गुण अशी एकूण ३०० गुणांची ही परिक्षा. पास होण्यासाठी सरासरी ४० ते ३५ % गुण हवे. त्यातही मेरीटप्रमाणे सहा टक्के विद्यार्थी क्वालिफाय होतात.
मुलांमुलींना यातील घटक - उपघटक यांची अपुरी माहिती असते. यु.जी.सी. नेट- सेट यांनी ठरवून दिलेला अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध आहे. तो आपल्याला माहितच असायला हवा. नव्हे सतत डोळ्यासमोर असायला हवा.
या अभ्यासक्रमानुसार आवश्यक असणारे संदर्भ ग्रंथ आपण वाचायला हवे. प्रत्येक घटकांचे उपघटकांचे वर्गीकरण करून माहिती संकलीत करून वर्गवारी करायला हवी. सूक्ष्म अभ्यास करून नोटस काढायला हव्या. केवळ भारंभार नोटस गोळा करून पुस्तकांची थप्पी लावण्याच्या मागे न लागता. विश्वासाहार्य व दर्जेदार अभ्यासक्रमास पूरक असे साहित्य वाचावे. नाहीतर नुसती ती पुस्तके पाहुनच घाबरायला होतं, आता कधी वाचू, कसं होईल ? हा विचार करत बसण्यापेक्षा हातात आहे ते उत्तमरित्या अभ्यासणे महत्वाचे आहे. बाजारात अनेक वस्तुनिष्ठ प्रश्नसंच व माहितीचे विषयानुसार संच मिळतात. अर्थात ते कधी उपयोगी पडतात जेव्हा तुम्ही मूळविषयाचे संदर्भ ग्रंथ वाचले असतील तरच त्या प्रश्नाचें तुम्हीं आकलन करू शकता. नाहीतर नुसतेच वाचलेले डोक्यावरून जाईल. आपल्याकडे जे काही साहित्य आहे त्यापासून सुरूवात करून अभ्यासाचे नियोजन करावे. आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेच्या मर्यादा विचारात घेऊन त्यानुसार वाचन करणे, नोटस काढणे, प्रश्नपत्रिका सोडवणे याचा सतत सराव करायला हवा.
आपण आपले ध्येय बी.ए. व एम.ए ला असताना ठरवलेले असले तर याचा खूप फायदा होतो. कारण तुमचा पाया मजबूत असेल तर या परिक्षाचं आव्हान पेलणं कठीण नाही. महाविद्यालयात शिकत असतानाच अभ्यासक्रमास असलेले ग्रंथ व संदर्भ ग्रंथ यांचे वाचन केलेले असेल तर बऱ्याच संकल्पना स्पष्ट होतात. तुमचा परिक्षेच्या दृष्टीकोनातून पाया तयार होतो. ही परिक्षा तुमच्या बौध्दिक क्षमतेवर आधारीत आहे. मराठी विषयाचा विद्यार्थी हा प्रतिभेच्या व कल्पनेच्या अंगाने जास्त विचार करतो. इथे तर्कबुध्दी, आकलणक्षमता व निर्णयक्षमता खूप महत्वाची. ही वाढवण्यासाठी आपले वाचन वाढायला हवे, त्यावर आधारीत संकल्पना स्पष्ट हव्या, प्रश्न व उत्तर यांचा अभ्यास हवा. एक प्रश्न व त्याचे चार पर्याय, एक उत्तर व इतर तीन पर्याय त्याचे तीन प्रश्न तयार होतात, त्यांच्या उत्तराचा शोध घ्यावा.
स्वतःच्या मर्यादा कुठल्या आहेत. कोणते घटक कच्चे आहेत ? कोणते घटक पक्के आहेत ? प्रश्नपत्रिकेची, अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी कशी आहे, हे विचारात घेणे गरजेचे आहे. जे घटक आपले कच्चे आहेत ते पक्के करणे, पहिल्या वाचनात नाही कळाले तर परत वाचन करणे गरजेचे आहे. आपल्या मित्रमैत्रणिंशी संकल्पनात्मक वा त्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणे. सर्वांनी मिळून संदर्भ ग्रंथ वाचन करणे. नोटस काढणे. रोज एक विषय ठरवून त्यासंदर्भात वाचन व चर्चा केल्याने व घटक वाटून घेतल्यास अभ्यास जलद व सर्वांगीण होण्यास मदत होते. वेळ वाचतो. एकत्र मिळून प्रश्नपत्रिका सोडवणे. प्रश्नांच्या उत्तरापर्यत पोहचण्यासाठी कोण कशा पध्दतीने विचार करत आहे हे पहाणे. आपण कशा पध्दतीने विचार करतो हे पहाणे. आपणच आपले अवलोकन करून आपल्या अभ्यास क्षमता वाढवल्या पाहिजेत. वाचन, आकलन, मूल्यमापन व अर्थनिर्णयन या प्रक्रियांचा विकास आपल्या अभ्यास प्रकियेत समतोलपणे केला पाहिजे.
रोज दोन तास तरी सातत्याने अभ्यास करायला हवा. मग तो वाचन स्वरूपात, ऐकण्याच्या स्वरूपात, चर्चात्मक अथवा नोटस काढणे असो. आताच्या या युगात तर आपल्या हातात इतका प्रचंड माहितीचा खजिना आहे याचा योग्य वापर करायला हवा. विश्वकोश, विकिपिडिया यासारखे माहितीस्तोत्र उपलब्ध आहेत. ई माध्यामातून विकिपिडिया, विश्वकोश, ब्लाॅग यावरील अभ्यासक्रमानुसार विषयाशी निगडीत माहिती वाचन करणे. वेळ मिळेल तसे युटयूब वरील उपलब्ध विषयासंदर्भातील उपलब्ध मार्गदर्शकांचे विचार ऐकणे. या गोष्टींचा खूप फायदा होतो. सोशलमिडिया वा अवांतर मनोरंजनात्मक गोष्टीसाठी कमी वेळ देऊन, या साधनांचा सकारात्मक योग्य वापर करायला हवा.
पेपर १ मधील घटकांचा अभ्यास करताना मनावर दडपण न ठेवता. मला जमेल का नाही. माझे कसे होईल या गोष्टींचा विचार न करता. अभ्यासाला लागा. संकल्पना समजून घ्या त्या अनुषंगाने नोटस काढून. नविन संकल्पनांची ओळख करून घ्या. राज्यस्तरीय सेट परिक्षा देताना मराठी व इंग्रजी ही दोन्ही भाषा माध्यमे आपल्याला उपलब्ध आहेत मात्र नेट परिक्षा देताना भाषाविषयक अडचण निर्माण होते. राष्ट्रीय स्तरावरची ही परिक्षा पेपर एकचे माध्यम हे हिंदी व इंग्रजी व त्याची काठिण्यपातळी वरची थोडी जास्त आहे. त्यामुळे इथे मराठी विषयातील विद्यार्थ्याना मेहनत घ्यावी लागते.
नेट सेट परिक्षे बाबत माझा अनुभव सांगायचा झाला तर, पुण्यात काॅलेजमधे असतानाच मी एम.पी.एस.सी व यु.पी.एस.सी या स्पर्धापरिक्षांचा अभ्यास केला होता मात्र वैयक्तिक कारणाने परिक्षा दयायचे राहुन गेले. मात्र आता संधी सोडायची नाही ही जिद्द बाळगळूनच पूर्वी बी.ए.इंग्रजी व एम.ए.राज्याशास्त्रातून झालं होतं. परंतु मराठी विषयाची रूची २०२०-२१मधे मी मुंबई विद्यापीठ आयडाॅल मधून एम.ए प्रथम श्रेणीत पूर्ण केलं एम.ए चा अभ्यास करत करतच सेट परिक्षा दिली. ही परिक्षा दिल्यानंतर आत्मविश्वास वाढला व पुढे दोन महिन्यातच नेट ही परिक्षा होती. सेट परिक्षेचा अनुभव पाठिशी, परत राहिलेल्या विषयांची उजळणी केली. पेपर एकचा अभ्यास कमी पडतोय असं वाटले ती बाजू पक्की करण्याचा प्रयत्न केला. नुसतंच वाचत न जाता मन लावून स्मरणात राहील असा अभ्यास केला. स्वतः प्रश्नसंच बनवले व सोडवले. पहिल्याच प्रयत्नात नेट परिक्षेत यश मिळवेन ही मनाशी खूणगाठ बांधली व सातत्याने अभ्यास केला. एम.ए करताना रोज दोन-तीन तास अभ्यास करायचे तिच सवय पुढे सलग दोन वर्ष जोपासली व अभ्यासात ऐनकेन प्रकारे सातत्य ठेवले. माझे पक्के व कच्चे विषय कुठले. आपण कुठे कमी पडतोय याचं स्वतःच परिक्षण केलं. स्वतःशीच आपली स्पर्धा ठेवली. जास्तीत जास्त बेस्ट दयायला हवं या दृष्टीकोनातून शांत डोक्याने जास्त विचार न करता. परिक्षा केंद्रात फक्त पेपर प्रश्न आणि मी बाकी सगळं विसरून, उगाच कुठलातरी पर्याय टिक करायचाय म्हणून टिकमार्क न करता. जास्तीत जास्त चांगला प्रयत्न उत्तरापर्यंत पोहचण्याचा केला.
अभ्यास करताना इंग्रजी-हिंदी शब्दांच्या अर्थासाठी डिक्शनरी सोबत ठेवली. मराठी व्याकरण वर्ग केले. तसेच मो.रा.वाळींबे व्याकरण दोन तीन वेळा उजळणी केली. प्रदक्षिणा खंड १ व २, साठोत्तरी साहित्य प्रवाह शरणकुमार लिंबाळे, लोकसाहित्याचे स्वरूप डाॅ. प्रभाकार मांडे, ग्रामीण साहित्यप्रवाह स्वरूप आणि समस्या आनंद यादव, वर्णनात्मक व ऐताहासिक भाषाविज्ञान संपादित स.गं.मालशे, ईनामदार, अंजली सोमण असे प्रत्येक घटकानुसार एक तरी मूळ संदर्भग्रंथ वाचने आवश्यक आहे. मुख्यत्वे करून मुंबई, पुणे, शिवाजी, नाशिक मुक्त विद्यापिठाच्या पुस्तकांचा वापर अभ्यासासाठी केला. पेपर एक साठी शशिकांत अन्नदाते यांचे 'अध्यापन व संशोधन अभियोग्यता संपूर्ण मार्गदर्शक' हे पुस्तक, धानय्या कवठगीमठ यांचे पेपर १ अध्यापन व संशोधन अभियोग्यता' हे पुस्तकही अभ्यासले तसेच नेट परिक्षेसाठी विशेष हरप्रीत कौर यांचे नेट/सेट/जेआरएफ हे इंग्रजीतील पुस्तक अभ्यासले. हा पेपर एकचा अभ्यास प्रत्येकाने करायलाच हवा. बुध्दीमत्ता चाचणी, उताऱ्यावरचे प्रश्न यांचा सरावही करायला हवा. कारण या परिक्षांची काठिण्यपातळी जास्त आहे.
नेट परिक्षेची तयारी करताना प्रश्नपत्रिका वाचन केले. पेपर एक हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून प्रश्नांचे स्वरूप कसे आहे हे आकलन करून घेतले. तसेच मराठी विषयाचा अभ्यास करताना मराठी विषयाचा आवाका खूप मोठा आहे तेव्हा मराठीच्या उत्तपत्तीपासून, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक मराठी वाडःमय, साठोत्तरी साहित्यप्रवाह त्यातही मग स्वातंत्र्यपूर्व- स्वातंत्र्योत्तर, साठोत्तरी, नव्वदोत्तरी असा वाडःमयीन कालखंडानुसार, साहित्यप्रकाराच्या उद्गम, विकास असा अभ्यास केला. वृषाली विनायक यांचे नेट-सेट मार्गदर्शन शिबीरात सहभागी झाले. याशिबारामुळे मला मराठी विषयाच्या अनुषंगाने अभ्यासाची योग्य दिशा व बैठक मिळाली. याच कालावधीत परिक्षेदरम्यान ऑनलाईन-पध्दतीने अनेक मोफत नेट-सेट मार्गदर्शन वर्ग घेतले जायचे ते केले. प्रा.डाॅ. राहुल पाटील हे नेट सेट परिक्षेबाबत एक टेलीग्राम चॅनल चालवतात त्यावर ते दर रविवारी सरावपरिक्षा घेत त्याचा उपयोग झाला. तसेच प्रा.डाॅ. महादेव जगताप, प्रा.डाॅ चौधरी, डाॅ. राहुल पाटील सरांच्या या युटयुब चॅनलचे रोज घरकाम करताना परिक्षेसंदर्भात व्हिडीओ ऐकले याचा फायदा झाला. खरंतर ईच्छा तिथे मार्ग म्हणतात ना त्याप्रमाणे ईच्छा असेल तर वेळ निघतोच. आणि या दिवसात मलाही याचा अनुभव आला तुम्हालाही येईल फक्त तुमचं ध्येय मात्र निश्चित असायला हवं व ते प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक कष्ट घेण्याची तयारी हवी.
तनुजा ढेरे.
एम.ए. मराठी सेट-नेट
ठाणे.
#नेट
#सेट
Net
Set




