सुख दुःखाची हळवी वीण - हजार धागे सुखाचे
लेखक किरण सोनार
आयुष्यात सुख आणि दु:खाचा खेळ ऊन-सावल्या सारखा असतो. याचं प्रतिबिंब आपल्या आयुष्याच्या आरश्यात सतत झाकोळत असतेच. मात्र दुःखाची सल सतत सोबत असली तरी आपण जगायचं सोडत नाहीत आयुष्यात दुसर्याच्या चेहर्यांवरील हसू फुलवण्याची ताकद जर आपल्या व्यक्तीमत्वात असेल तर याहून मोठे सुख कोणते, हेच जीवनाचं गुपीत सांगणारा हा कथासंग्रह 'हजार धागे सुखाचे' आहे असे मला वाटते. मनोरंजना बरोबरच आपल्याला वेगळ्या जगण्याचा अनुभव देणाऱ्या या कथासंग्रहातील कथा आहेत. आजकाल अनेक कथालेखक कथा लिहित आहेत. कथा म्हणजे चला घडलं काहीतरी आज चला लिहून काढू म्हटल्याने व ते लिहिल्याने ती कथा होत नाही. कथेत पात्र, संवाद, घटना, प्रसंग तसेच विरोधाभास व नाट्य हवे. कथेत वेगळेपणा हवा, म्हणजे आपला अनुभव कदाचित तोच असेल मात्र ती अनुभवाची कलात्मक साहित्यिक मांडणी ही आपली ओळख वाटायला हवी. तरच तुमच्या नावाने तुमच्या कथा ओळखल्या जातील. अगदी तंतोतंत कथा या साहित्य प्रकारात आपली ओळख निर्माण करण्यात लेखक किरण सोनार यशस्वी झाले आहेत असे मला वाटते.
लाॅकडाऊनच्या या काळात माझ्या हाती म्हणण्यापेक्षा, या कथासंग्रहाचे शीर्षक 'हजार धागे सुखाचे' वाचून मीच विकत घेतला चपराक प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केलेला. लेखक किरण सोनार यांचा हा नवा कोरा, छोटे खानी कथांचा पहिलाच लघुकथासंग्रह वाचताना जेष्ठ साहित्यिका विजया वाड यांचे उत्कंठावर्धक असे प्रास्ताविक मनाला भावते व पुढे लेखकाचे मनोगत वाचताना लेखनाचा ध्यास, व्यासंग व आंतरीक आवाजातून उभारलेले भावविश्व म्हणजे हा कथासंग्रह आहे हे जाणवते. तर चपराकचे संपादक घनश्यामल पाटील यांनी या कथासंग्रहाची पाठराखण केली आहे. उत्कृष्ट असे रेखीव साजेसं मुखपृष्ठ संतोष धोंगडे या अनुभवी मुखपृष्ठकारानी रेखाटले आहे. त्यामुळे हा कथासंग्रह अजूनच देखणा झाला आहे.
पत्रकार, सामाजिक कार्यकता असलेला हा लेखक आपल्याला आलेले अनुभवकथन करण्यासाठी धडपड करतोय व त्यासाठी निवडलेले हे कथांचे माध्यम या कथालेखनाची नस लेखक किरण सोनार यांनी अचूक पकडली आहे. खरंतर सुरवातीला लेखकाने मनोगतात सामाजिक अंगाने जाणारे हे पुस्तक आहे असे म्हटल्यावर आपल्याला हा कथासंग्रह म्हणजे दुष्काळ, स्त्रीसमस्या, अत्याचार यावर आधारीत असे लेखन आहे असे वाटेलही परंतु असे नाहीये. तेच ते पारंपारिक सामाजिक विषय व प्रश्न न हाताळता समकालीन विषय व वातावरण समोर ठेवून जाणिवा-नेणिवाचं भान राखून लेखकाने या कथासंग्रहातील कथाविश्व त्याच त्या प्रश्नांना बगल देऊन आपल्यासमोर अगदी सहजपणे उभे केले आहे.
ओघवती निवेदन शैली व भाषेचा वापर लेखकाने या कथासंग्रहातील लिहिताना केला आहे. कथासंग्रहातील कथा वाचताना सुरवातीला मन हळवे, भावूक व संवेदनशील होते परंतु साध्या, सरळ व सुटसुटीत अंगाने जाणाऱ्या या कथा वाचण्यात आपण जेव्हा मग्न होतो तेव्हा कथा वाचताना आपण भवताल विसरून त्या कथांमधे पुढे काय होणार हा विचार करत रहातो. आटोपशीर संवाद, नेटकी पात्र व प्रसंग उभारणी केल्यामुळे कथा आटोपशीर झाल्या आहेत. आकर्षक सुरवात, मध्य व उत्कंठावर्धक शेवट यामुळे कथा वाचताना कथा क्लिष्ट वाटत नाही व मागचं काय आणि आता काय असे विस्मरण होत नाही. कथेतून तोचतोच पणा जाणवत नाही. प्रत्येक कथेचा रंगभाव वेगळा उमटवण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
खरंतर पारंपारिक कथालेखनाला फाटा देऊन कथेचं स्वतःचं वेगळं भावविश्व उभारून स्वतःचं वेगळेपण मांडण्यात लेखक इथे यशस्वी झाला आहे. या कथासंग्रहात एकूण आठ कथा आहेत, पहिली कथा 'पोरका बाप' या कथासंग्रहातील पोरका बाप मधील हळवा बाप आपल्या कायम लक्षात रहातो. पर्यावरण रक्षक व निसर्ग प्रेमी अण्णा झाडांना पोटच्या मुलाप्रमाणे झाडं जपतात. एके दिवशी मुलाप्रमाणे जपलेल्या झाडांना एक वेडगळ माणूस चापटा मारतो व शिव्या देतो, तेव्हा अण्णा विरोध करतात तर तो त्यांनाही जुमानत नाही, नाईलाजास्तव हे प्रकरण पोलिसापर्यंत जाते, परंतु याच झाडाशी टक्कर होऊन त्या माणसाच्या तरुण मुलाचा मृत्यू होतो. त्याची करुण कहाणी ऐकत शेवटी त्याच्या वेडसर वागण्यामागचे कारण ऐकून आण्णा माघार घेतात. तेव्हा वाचक ही हळवा होतो.
दुसरी हृदयस्पर्शी कथा अनमोल श्वास या कथेत स्वामी हा इयत्ता चौथीत शिकणारा संवेदनशील लहान बालक आपल्या आई वडिलांकडे वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून कुत्र्याचं पिल्लू हवंय असा हट्ट करतो. ते सर्वजण त्याच्या हट्टाखातर कुत्र्याचे पिल्लू घ्यायला पेट शाॅप मधे जातात. दुकानदार योगेश त्यांना अनेक कुत्र्याची पिल्लं दाखवतो. परंतु ती महाग असतात. तरीही तो कुत्र्याच्या पिल्लासाठी हटून बसतो. स्वामीला पाहून योगश त्याला एक अपंग कुत्रा तसाच घेऊन जा म्हणतो. तो खूप आनंदी होतो. योगेश आश्चर्यचकित होतो परंतु यावर स्वामी प्रतिक्रिया आपणास थक्क करणारी आहे. स्वामी व त्याचे आईवडील योगेशला पैसे घ्यायला भाग पडतात. त्या पपीचं मोल समजावून सांगताना स्वामी आपल्या पायातले बूट व साॅक्स योगेशला काढून दाखवतो हे चित्र मन हेलावून सोडणारं आहे.
नजरेतून शिक्षा मधील मजूर कामगार पांडुरंग, त्याची बायको मंजुळा व दोन मुलं गणेश व महेश यांची कथा. कामगार व गावचं राजकारण यात निष्पाप पांडुरंगचा नाहक जाणारा बळी व यातून विस्कटलेले मंजुळेचे आयुष्य अन् गणेशचं जाधवसाहेबाच्या समाधी समोर चपला सोडणं व आपल्या वडिलांच्या समाधीवर रोज नित्यनेमाने फुलं वहाणं कथेतील हळवा शेवट मनाला चटका लावतो. 'अनपेक्षित पाऊलवाटा' या कथेत इंजिनिअरींगची पदवी मिळविलेला मयूर नोकरी मिळत नाही म्हणून निराश न होता मिळेल ते काम करून अनपेक्षित वाटणारी स्वतःची पाऊलवाट तो स्वतः निर्माण करतो. त्याची ध्येयपूर्ती व मेहनत नक्की आजच्या नवयुवकांना प्रेरणा ही कथा युवापिढीला प्रेरणा देणारी आहे.
'इरपाची लढाई' या कथेतील लढा हा नैतिकतेचा आहे. ही कथा सरकारी यंत्रणा आणि नक्षलवादी या दुहींच्या कैचीत सापडलेलं गाव आणि त्या गावातील सुशिक्षित इरपा यांच्यावर बेतली आहे. गावातील अठरा विश्वे दारिद्र्य पाहून इरपाला गावासाठी काहीतरी करावेसे वाटते, परंतु सरकारी अधिकारी व नक्षली यांची दहशत त्याच्यासाठी अडचणीची ठरते. तरीही इरपा गावासाठी असे काम करतो, जे आजपर्यंत कोणीच केलेले नसते, या कथेतून लेखकाने सामाजिक संदेश दिला आहे.
शाळेची खिचडी ही कथा गरीब घरातील गणेशच्या जीवनावर चितारली आहे. गणेश हा बालक त्याचं पितृहृद्य व मातृदायी मन कारुण्यपणे लेखकाने या कथातून रेखाटले आहे. इयत्ता चौथीत शिकणारा गणेश शिक्षकांना चोर वाटतो, परंतु तो रोज शाळेत मिळणारी खिचडी संपूर्ण न खाता काही घास आपल्या चारपाच वर्षासाठी राखून ठेवतो. घरी जाऊन भरवतो. शाळेतले पाटील सर त्याचा पाठलाग करतात. मात्र वस्तुस्थिती जाणताच पाटीलसरांना अपराध्यासारखे वाटते. हा शेवट वाचताना वाचकही नकळत भावनाविभोर होतो. कधी कधी परिस्थितीवरून मत बनवणं कसं फोल असतं हे या कथेत लेखकाने छान प्रत्ययास आणून दिले आहे.
स्कार्फवाली बाई ही कथा नवरा बायकोच्या घरगुती वादावर गुंफली आहे. विनाकारण बायकांची नवऱ्याबद्दलची संशयी वृत्ती किती निरर्थक असते हे या कथेतून लेखकाने खूपच रंजक पणे लिहिले आहे. भांडणाचे कारण जाणताच वाचकही स्तंभित होतो.
हजार धागे सुखाचे ही शीर्ष कथा आहे. ही कथा नोकरी गमावलेल्या रणजीतच्या जीवनावर आधारित आहे. आधुनिक लाइफस्टाइल जगत असलेल्या रणजीतला नोकरी शोधूनही मिळत नाही, तेव्हा त्याला खूप नैराश्य येते. परंतु या नैराश्यमय काळातही मनाला उभारी देणारी एक घटना घडते, व रणजीतला जगण्याची एक सकारात्मकता निर्माण करते. या कथेतून लेखकाला दुःखातही सुख पेरलेले असते हे सांगायचे आहे.
या सात कथा व शेवटची शीर्षक कथा हजार धागे सुखाचे लेखकाच्या भाषेतच सांगायचे झाले तर आपल्या जीवनात एक धागा दुःखाचा आहे पण हजारो धागे सुखाचे सोबत आहेत व हेच सुखाचे क्षण, हीच उर्मी जगण्याला प्रोत्साहित करते. जीवनाचं मर्म व कर्म यावर संवेदनशील संवादातून कथात्मक अंगाने भाष्य करणारा आशयगर्भ असा हा कथासंग्रह आपल्याला अंर्तमुख करतो. या कथासंग्रहातील भावविश्व जरी सामाजिक अंगाने जात असले तरी या कथात भावनिक उमाळा व कौटुंबिक जिव्हाळा आहे. कथासंग्रह वाचनीय झाला आहे.
कथासंग्रह - किरण सोनार (नाशिक)
(पत्रकार-लेखक)
प्रकाशन-२६ जून २०२०
चपराक प्रकाशन- पुणे
पृष्ठसंख्या-१८०
मुखपृष्ठ - संतोष धोंगडे
मूल्य-१०१/-
पुस्तक परिचय- सौ. तनुजा उल्हास ढेरे ( एम.ए)

No comments:
Post a Comment