Friday, 31 July 2020

कवी लक्ष्मण लच्छमन्ना - परिचय तनुजा ढेरे


*ऋतुगंध :- ' निसर्ग-कवितेच्या वाटेवरचा ध्यानस्थ ऋषी '


आज आपण ओळख करून घेणार आहोत ते गेली दोन दशकं कवितेच्या क्षेत्रात यशस्वी रित्या मुशाफिरी करणारे कवी. लक्ष्मण लच्छमन्ना मलगिरवार या मराठवाड्यातील एका ज्येष्ठ नामवंत कवी साहित्यिकाची. कवी लक्ष्मन लच्छमन्ना यांचे मूळ गाव देगलूर हे कर्नाटक, तेलंगना व महाराष्ट्र या सीमारेषेवर वसलेले महाराष्ट्रातील ठिकाण. नांदेड विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमातही त्यांच्या कवितांचा समावेश झाला आहे. अनेक राज्यस्तरीय साहित्यिक संस्थानी त्यांच्या काव्यसंग्रहाची नोंद घेऊन त्यांना पुरस्कृत केले आहे.

स्वतःचा एक विचार व स्वतःच्या कवितांवर ठाम असणारे व तसेच ठामपणे कवितेवर बोलणारे हे कवी जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या कवितेमागची भूमिका व प्रतीमा उलगडत जाते.  त्याचा कवितेचा ध्यास व कवितेकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपल्याला कळतो. त्यांच्या कवितांना स्वतःचा चेहरामोहरा आहे. अंर्तमुख करायला लावणारी त्यांची कविता, निसर्गाप्रती एकनिष्ठ होऊन प्रकटते. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय मांडणाऱ्या काव्यपंक्ती म्हणजे कविता. कमी शब्दात आपल्या भावना अतीशय चपखलपणे मांडून रसिकाच्या मनाची कवाडे उघडी करणे सहजासहजी कुणास जमत नाही. समाधीस्त होऊन एकचित्ताने निसर्गाशी एकरूप होऊन जी एकतानता निर्माण होते. त्यातून जो चैतन्यभाव प्रकटतो तो  आपल्या कवितेतून अतीशय चपखलपणे मांडला आहे.


चित्रात भरलेले रंग जेव्हा बोलतात तेव्हा संपूर्ण चित्र तयार होते व त्या चित्राला अर्थ प्राप्त होतो. आणि शब्द जेव्हा अबोल होतात अन् कागदावर उतरतात तेव्हा कविता निर्माण होते. कविता ही कविच्या मनातील भावभावनांचे प्रतिबिंब असते. कवी.लक्ष्मण लच्छमन्ना या कविच्या कविता वाचताना मानवी मनाच्या संवेदनशील भावभावनांबरोबरच निसर्गातील विविध प्रतिमांचा त्यांच्या कवितेत मिलाफ झालेला दिसतो. 'आभाळ पाहताना', 'चैत्रपाळी' नंतर कवी लक्ष्मण लच्छमन्ना यांचा 'ऋतुगंध' हा तिसरा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. निसर्गाची अद्मूत ओढ व त्या निसर्गाशी एकरूप झाल्यानंतर ज्या भावभावनांना आकारास आल्या त्या या काव्यसंग्रहातून पुढे आलेल्या आपल्याला दिसतात. छंद-लय-नाद याचं बोट पकडत यांच्या कवितेचा प्रवास चालू होतो. पंचक्षरी, षडअक्षरी, अष्टअक्षरी, अल्प अक्षरी छंदात उतरलेल्या त्यांच्या कविता मनाला सहज स्पर्शून जातात. कविता ही सृजनशील मनाची निर्मिती असते व त्यासाठी आवश्यक असणारे सृजनभान व दृष्टी त्यांच्याकडे आहे. 'आभाळ पाहताना' या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहात 'मृगाचा ढग' या कवितेत कवी लिहितात,


'डोळे मिटून

गायिली गाणी

पाण्याचे सूर

डोळ्यांत पाणी' (पृष्ठ ३२)


कवी. लक्ष्मण लच्छमन्ना आपल्या या कवितेतून सांगायचा प्रयत्न करतात की पाऊस पडतो आहे. पाण्याला सूर गवसला आहे. कवी डोळे मिटून गाणी गात आहे. पाण्याचे सूर कमी जास्त होतात तसे कवीच्या डोळ्यांत पाणी दाटते आहे. अतीशय भावगर्भ मनाची ही  कविता पुढे 'चैत्रपाळी' या काव्यसंग्रहात व्यापक अंगाने पुढे जाते. 'चैत्रपाळी' या काव्यसंग्रहात निसर्ग कवितांबरोबर, सामाजिक जाणिवा व भान जपणाऱ्या विविधरंगी छटा कवी मनात आकार घेतलेल्या आपल्याला दिसतात. कविच्या प्रत्येक कवितेत निसर्ग ओतप्रोत भरलेला दिसतो. रान, सर, थेंब, शेती-माती, पाखरं, गुरं ढोरं या शेती- मातीशी, व निसर्गाशी निगडीत प्रतीमातून कवी लक्ष्मण लच्छमन्ना यांची कविता मार्गस्थ करत समाजातील प्रश्नांशी जाऊन भिडताना परत निसर्गप्रतिमांना जाऊन मिळताना जागोजागी कवितेतून जाणवते. 'चैत्रपाळी' या काव्यसंग्रहातील 'रानचित्र' ही कविता वाचताना तर आपल्यासमोर रानाचे हुबेहूब चित्र उभे रहाते. 


' ही रात्र भरलेली चांदण्यांची उजेडांनी

मध्येच वाऱ्याच्या फेऱ्या गळ्यात कणसाच्या राशी.'


चांदण्यांनी भरलेलं आभाळ अन् कणसाच्या राशी याचं सुरेख चित्रण करताना वाऱ्याची झुळूक, सुखाच्या आणि दुःखाच्या हिंदोळ्याबरोबर कवी आपल्याला जागोजागी हळवा व भावनिक झालेला दिसतो. 'चैत्रपाळी' या काव्यसंग्रहातील अष्टअक्षरी छंदातील कविता काळजाचा ठाव घेतात. आणि आपली वाट शोधत वळणावळणाने पुढील प्रवास करत 'ऋतुगंध' या कवितासंग्रहातील कवितांजवळ येऊन थांबतात. घडीभर विसावा घेऊन मार्गक्रमण करत पुन्हा नव्या दमाने श्वास घेऊन आकारास आलेल्या या कविता अजून दमदारपणे भाव व आशय मांडत नव्या रूपाने आपल्याला 'ऋतुगंध' या काव्यसंग्रहातून आपली रंगछटा घेऊन पुन्हा नव्याने भेटतात. 


'ऋतुगंध' या कवितासंग्रहाच्या शीर्षकातच सर्व ऋतुंचा गंध भरलेला असल्याने, ऋतुंचा सौंदर्य संभार सांभाळतच व्यापक अंगाने या काव्यसंग्रहातील कविता पुढे येतात. अतीशय सहज, सोप्या, तरल भाषेतून कागदावर उतरलेल्या या कविता आपलं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतात. ' भिजताना' या कवितेत कवी लक्ष्मन लच्छमन्ना म्हणतात,


'थेंब थेंब

पाऊस

संथ संथ 

तुटताना


अंग अंग

दरवळतो

चिंब चिंब

भिजताना.' (पृष्ठ १८)


पावसाच्या सरींचा आवेग कमी होऊन पावसाची धिमी पाऊलं तुटक पडताना रानावनात खेळू लागतात तेव्हा चिंब भिजलेल्या हिरवळीला देखील गंध फुटतो आणि मग कवी मधलं हळवं मन जागं होतं व हळवाभाव कवितारूपाने उतरतो. 'चैत्र आला' या कवितेत कवी लक्ष्मन लच्छमन्ना म्हणतात, 


'गुलाबी पानाच्या

रेशमी पताका

जणू नाचवीत

चैत्र आला.' (पृष्ठ २६)


मला वाटते की फुलांचा, पानांचा रंग मनात भरतो तेव्हा अशी गुलाबी स्वप्नं घेऊन कविता उतरते. गुलाबी स्वप्नांच्या, रेशमी मुलायम पताका, कोवळ्या नाचवत चैत्र मोहरतो अन् आनंदाला उधाण येतं व  ऋतुगंध मोहरतो...असं कवी लक्ष्मन लच्छमन्ना यांच्या कवितेतून आपल्याला प्रतीत होतं. अशाप्रकारे 'श्रावण,' 'शिशीर', 'चैत्र', अशा विविध ऋतुंची सुंदर शब्दरूपी सुगंधीत पालवी या 'ऋतुगंध' मधील कवितेच्या हिरव्या पानातून उगवून आली आहे. समाजातील प्रश्न, जाणिवा व समाजातील विविध पातळीवरील परिस्थितीचे/ प्रश्नांचे स्वरूप, वर्णन व वर्तन, स्थळ-काळ वेळानुसार बदलत असते. मात्र निसर्ग व प्रेम या संकल्पना शाश्वत आहेत म्हणून या कविता चिरतरूण राहतील काळ बदलला तरी असे आशादायी चित्र दिसते.


पावसाचा थेंब, पावसाची सर, मातीचा सुगंध, रान, गावपाऊस, श्रावण या प्रतिमातून, प्रतीकातून व्यक्त होताना कविच्या मनात रूजलेला पाऊस, त्याचं पावसावरलं प्रेम त्यांच्या कवितेतून दिसून येतं. जणू पाऊस म्हणजे कवी व कवी म्हणजे पाऊस हे समीकरण, कविता म्हणजे पावसाचं अंतर्मन, पावसाचा अंतर्नाद म्हणजे कवी मन. 'चैत्र', 'श्रावण', 'पानगळ' या कविता ऋतूचा हिंदोळा पकडूनच कविच्या मनातून उतरलेल्या दिसतात.


कविच्या मनातील आठवणींचा पाऊस पडू लागतो तेव्हा कविच्या अंतरंगातील प्रेमभाव, विरहभाव आपोआपच, 'तिचाच', 'जळत होतो', 'बेईमान' इ. कवितांतून अतिशय तरलपणे कविने मांडले आहेत. तरलपणे उतरलेल्या या कविता तितक्याच तरलपणे वाचकाच्या मनात भावरंग भरतात. इथे  लक्ष्मण लच्छमन्ना हे केवळ निसर्ग, प्रेम या भावनिक हिंदोळ्यात अडकून पडत नाहीत तर सामाजिक भान जपताना दिसतात. दुष्काळाची गाज, माणुसकीचा पाझर आपल्याला त्यांच्या कवितेतून दिसतो. 


सुक्ष्मतेच्या दुर्बिणीतून पाहिले तर या कविता कविमनाच्या अंतरंगातून जन्मलेल्या आहेत. या कवितांना स्वतःची  अशी एक ओळख आहे. आवाज आहे. कविला कविता शब्दरूपाने गवसली आहे. मात्र या काव्यसंग्रहातील काही कविता वाचत असताना कविला शब्दांची नस गवसली आहे असे वाटत असतानाच कवितेची लय मधूनच तुटते. आपण कविता ठाराविक शब्दांच्या ढाच्यात जरी बसवली, तरी ती एका सुरावटीत देखील उतरली पाहीजे. ती कविता वाचताना, ऐकताना, गाताना त्या कवितेची लय खंडीत नाही झाली पाहिजे. कविता वाचताना गंमत वाटली पाहिजे. कविता आत्मसंवादाकडून आत्मसूराकडे वळली पाहिजे.  कवी लक्ष्मन लच्छमन्ना यांच्या कविता वाचताना त्यांना त्याच्या कवितेचा आवाज गवसला आहे असे वाटते व आता त्यांना सुराची आराधना करायची आहे. ही आराधना करताना त्यांना त्यांच्या कवितेत दडलेला सूर देखील नक्कीच गवसेल ही आशा या कविता वाचताना जागोजागी वाटत रहाते.


अल्पअक्षरात कविता लिहिणं तसं कठीणच. आजच्या या मुक्तछंदाच्या जमान्यात अतीशय लांबच लांब पल्याच्या ललितअंगाने जाणाऱ्या कविता आपल्याला अनेक ठिकाणी वाचायला मिळतात. नुसताच फाफटपसारा. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा वेगळ्या पध्दतीने मांडणे म्हणजे कविता नव्हे. या पध्दतीला पूर्णपणे छेद देत कवी लक्ष्मन लच्छमन्ना यांची कविता पुढे आलेली दिसते. कवी लक्ष्मन लच्छमन्ना यांच्या कविता या दृष्टीने आजच्या कवींना नक्कीच मार्गदर्शक आहेत. मात्र काव्यसंग्रहात काही ठिकाणी कवी लक्ष्मन लच्छमन्ना यांना खूप काही सांगायचे आहे असे वाटत असतानाच ते कविताबंधात अडकल्यासारखे वाटतात. पण तसे नाही यामागेही त्यांची ठाम भूमिका आहे. अल्पअक्षरात खूप काही सांगता येतं व या अल्पअक्षरी कवितेमागे लपलेली त्यांची अभ्यासू व जिज्ञासक वृत्ती आपण एक कवी म्हणून त्यांच्याशी साधतो तेव्हा आपल्याला जाणवते ती कवितेप्रती असलेली त्यांची निष्ठा व कवितेचा ध्यास. कवी लक्ष्मन लच्छमन्ना यांना त्यांचं आभाळ खुणावत असताना ते  विचारमग्न ध्यानस्थ ऋषी सारखे वाटतात. त्यांची ही आराधना, तप व व्रत नक्कीच त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल व उत्तोमउत्तम निर्मितीचा आनंद त्यांना मिळत जाईल. त्यांनी आपलं क्षितीज गाठावं व ते गाठू शकतात असा या कविता वाचताना ठाम विश्वास वाटतो कारण कविता निर्मिती पाठीमागचं 'सृजनभान' त्यांच्याकडे आहे. शब्दांच्या पलीकडचं जग त्यांना सतत खुणावत असतं ते त्यांना स्वस्थ बसू देत नाही, म्हणूनच 'ऋतुगंध' सारखी कवितारूपी सृजनपालवी त्यांच्या कविमनाला फुटली आहे. खरंतर वाचकाचा आनंद, समाधान व कौतुकाची थाप हेच कवी-लेखकाचं बळ असतं. एक वाचक व कवी या नात्याने त्यांच्या कविता वाचताना मनाला एक वेगळंच चैतन्य मिळतं. हे या कविताचं श्रेयस आहे. कवी. लक्ष्मन लच्छमन्ना यांना आपल्या स्वःनिर्मितीचा आनंद असाच मिळत राहो. 


नांदेड येथील सूर्यमुद्रा प्रकाशनाने प्रकाशीत केलेले त्यांचे हे तिन्हीं कवितासंग्रह 'आभाळ पाहताना', 'चैत्रपाळी', 'ऋतुगंध' त्यांच्या कवितेच्या अभिव्यक्तीला पूर्णपणे न्याय देतात. त्यांच्या कविता वाचताना आपल्याला एक दृष्टी देतात जी निसर्गस्त्रोताने ओतप्रोत भरलेली आहे. साहित्यक्षेत्रात त्यांनी आपल्या काव्यमोहरांचा ठसा उमटवला आहेच पण अजून वरचेवर त्यांच्याकडून उत्तोउत्तम कलाकृतीचा जन्म होवो या सदिच्छासह कवी लक्ष्मन लच्छमन्ना यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.


लेख - तनुजा ढेरे

कवी. लक्ष्मन लच्छमन्ना मलगिरवार ( नांदेड )

संपर्क -९४०३०७०४०५