Monday, 10 August 2020

पैंजण कथासंग्रह - मोहना कारखानिस

 

पैंजण



कथा वाचायला कोणाला आवडत नाही सांगा. लहान लहान चटकदार खमंग खुसखुशीत तर कधी कधी हळव्या भावभावनांची गुंफण करत नाट्यमयरित्या पुढे जाणारी कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. कथासंग्रह वाचनाची ही आवड मला नेहमी नवनविन लेखकांच्या कथालेखनाकडे  आकृष्ट करते, कारण कथालेखनाच्या बदलत्या प्रवाहात आजच्या काळातील ही नवकथा आपल्या मला अधिक मनोविश्लेशषक वाटते. या नवकथा संवादी व प्रवाही होतानाच त्या थेट वाचकाच्या मनात शिरून आपलं अस्तित्व व्यापून टाकतात असं वाटतं. 'पैंजण' हा कथासंग्रह असाच मोहना कारखानीस या लेखिकेचा अलिकडील काळात माझ्या वाचनात आला आणि या कथासंग्रहातील कथा वाचताना मी इतके रमले की वेळ कसा निघून गेला तेही कळले नाही.


कौंटुबिक नातेसंबंध, प्रेम- विरह, सुख-दुःख, हेवे-दावे, सामाजिक जाणिवा व अंतरीक भावनिक अंदोलनं मांडताना या कथासंग्रहातील पात्रं, त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव, स्वभाव यांचे अचूक वर्णन, बारीक-सारीक गोष्टीचे तपशील लेखिकेने नेमकेपणाने टिपले आहे व ते वाचताना आपण त्या कथासंग्रहाचा एक भाग होऊन जातो. तरल वास्तववादी, भवतालचं जीवनदर्शन घडवणारे प्रसंग व ठसठसशीत व्यक्तीचित्रं हे या संग्रहाचं वैशिष्टयै मला हा कथासंग्रह वाचताना जाणवलं. 'डाळबीटी' ही  खुसखुशीत, 'लेखिका पत्नी' ही नर्मविनोदी, तर 'व्हॅलेंटाईन डे' हे नविनच लग्न झालेल्या मुलीची स्वप्नाळू कथा. माॅल संस्कृतीवर भाष्य करणारी 'माॅल' ही कथा. अशा वेगवेगळ्या आशयाच्या सव्वीस कथा या कथासंग्रहातील मनोरंजन करतानाच विचार करायला लावणाऱ्या, वाचताना आपसूकच कधी कधी चेहऱ्यावर हसू उमटते तर कधी आपल्या पापण्याच्या कडा अलवार का होईना हळव्या होतात व ओलावतातच.


'पैंजण' ही कथा या कथासंग्रहातील मध्यवर्ती कथा असून, 'नमू' या गरीब तरूणीची. चांदीचं पैंजण घालायला मिळावं एवढंच स्वप्न तिचं, पण स्वप्नांच्या जगात ती एका तरुणाच्या बोलण्याला भुलते व फसते, याचं हृद्यद्रावक चित्रण या कथेत लेखिकने केले आहे. 'आहेर', अग्निदिव्य, ब्युटीपार्लर अशा छोटेखानी कथांतून लेखिका आपल्या मनात आपसूकच तिच्या कथाविश्वातील एक एक कथामणी ओवते. हा कथासंग्रह वाचताना संवादात्मक ओघवत्या शैलीमुळे या कथासंग्रहातील सर्वच कथा  वाचक या नात्याने मनात घर करून राहयल्या व पैंजणातील घुंगराच्या सुरेख नादाप्रमाणे माझ्या मनात किनकिनत राहिल्या व कितीतरी दिवसांनी एक चांगला कथासंग्रह वाचायला मिळाला याचं समाधानही मिळालं.



तनुजा ढेरे