Friday, 30 November 2018

कथा की व्यथा


कथा की व्यथा तुमची आमची..

मोना- " अहो ऽ ऐकलंत का ? जरा ऐकाना,जरा माझ्याकडे एकदा पहाना.मी कशी दिसतेय.जराशी जाड झालीयेना मी. त्या रेश्मा एवढी तर जाड नाहीयेना.काल ती राशी आली होती. किती सिलम आणि ट्रीम झालीय आणि कपडे ही अगदी तसेच. मस्तच फिटींगचे घातले होते.मला पण आवडतात तसे कपडे घालायला.अहो तुम्ही ऐकून न ऐकल्यासारखे का करतायेत.पेपर वाचतायेत.मॅडम रागारागाने तावात येऊन तो पेपर बाजूला करत.एक दिवस पेपर नाही वाचला तर काय बिघडत नाही.माझं जरा ऐका ना ! मी काय म्हणतेय, याकडे नेहमीच दुर्लक्ष्य करता हं  तुम्ही ! आरश्यात पहात असताना अचानक मोनाला जणू साक्षात्कार होतो आपण जाड होत चालल्याचा."

मंगेश - " अगं, मोना ,तू आहेस तशी छान आहेस गं.नको त्या फंदयात पडू नकोस तू .कोणाचं ऐकू ही नकोस. आपण खात्या पित्या घरची माणसं.कशाला व्हायचंय तुला स्ट्रिम आणि ट्रिम. तू आहेस तशीच आवडतेस मला. मी काय म्हणतो मला एक कप चहा देना. तुला माहितेय चहा पिऊन फ्रेश झाल्या शिवाय मला काही एक सुचत नाहीना ऐकवत नाही.तेंव्हा प्लीज तू जरा चहा बनव ना लवकर. हा पण ते अद्रक टाकायचं विसरू नकोस हं. दुध कमी टाक आणि चांगला उकळवून कडक चहा बनव.पातेलं ठेवलं चहाचं की लगेच उतरवायची घाई करू नकोस. आणि हो आणखी एक विसरलोच की दुध तापवूनच टाक निरश्या दुधाच्या चहाचा वास येतो. बोलता बोलता मंगेश मनातल्या मनात म्हणाला नाहीतरी लग्न झाल्यापासून कुठे चांगला चहा बनवलायस तू पण तुझ्यासमोर तोंड उघडणार कोण."

मोना -- चहाचं आदण गॅसवर ठेवत ,मोना ,हे बघा तुम्हीं माझं ऐकत ही नाही. आणि उठल्यापासून मला नावं ठेवायला तयार. मी काय म्हणते.आज कोरा लिंबू टाकुन चहा बनवू का ? नाहीतर असच कोरा चहा बिन दुधाचा कमी साखर टाकून वजन कमी करायला तेवढीच मदत. तुमचं पोट बघा किती वाढलंय.गोल गरगरीत चेंडूसारखं. जरा गोड धोड खायचं आवरतं घ्या.आणि तुमचा काय तो पिझ्झा का पिज्जा आणि ते इंडियन बर्गर वडापाव मला तर बाई ते ब्रेड चे पदार्थ अजिबात आवडत नाही.चावता चावत नाही गिळता गिळत नाही. तुम्ही कसे काय खाता बुवा तुम्हालाच माहीत.

मंगेश -- "हे बघ मोना, मला काही डायबिटीस वगैरे नाही.की कुठला रोग.तू नाॅर्मलच रोजच्या सारखा चहा बनवून दे. नाहीतर तू पाण्यासारखा पाणचटच चहा नेहमी बनवतेस. तरी मी गुपचूप पितो.आणि माझ्या पिज्जा बर्गरचं तर तू बोलुच नकोस. तू आधी ते रोज मुलांना बाहेरचं चिकन लाॅली पाॅप आणि बटर चिकन ,चिकन तंदूर मागवायचं कमी कर. नाव मुलाचं पण तुच ताव मारतेस. उरलं सुरलं सगळा फडशा पाडतेस. "

मोना - " चहाची कपबशी टेबलावर दणकण ठेवत हे बघा, प्यायचं तर प्या नाहीतर नका पिऊ तसच बसा." हवा तसा तुमच्या हातानी बनवा. मला पण बनवून दया.नाही तर रोज सकाळी कोपऱ्यावरच्या त्या नानू चहावाल्याकडून पिऊन या. मलाही तेवढाच आराम. एक दिवस लग्न झाल्यापासुन कधी निवांत असा मिळला नाही.रोज उठलं की दिवस उगवायला काम चालु ते रात्रीला अंथरूणावर अंग टेके पर्यत चालुच."

मंगेश- "अगं,हो ऽ हो ऽ जरा हळु , कपबशी फुटेल. चहा सांडेल अंगावर .त्यापेक्षा ते चांगला चहा शिकवण्याचे , पोहे बनवण्याचे क्लासेस असतील तर करना.ते हिपहाॅप, सालसा डान्स क्लास करण्यापेक्षा."

मोना - "अय्या ! तुम्ही पण ना इकडून तिकडून माझ्या क्लासवरच येता हं. बरं झालं आठवण केली. क्लासवरून आठवलं.मी काय म्हणत होते मघाशीचा विषय अर्धवटच राहिला.तर मी काय म्हणत होते.ती राशी आहेना राशी तीने जीम लावली होती. ती पण अशी तशी नाही ती जीम   नविन निघालीय ना निशाज वेट लाॅस मधे जाते ती आणि स्पेशल डायएट शीन असते आणि जीममधे ते व्यायाम करून घेणारे काय ते ट्रेनर असतात.आणि ते डायट प्लॅन पण देतात. व्यायाम करून घेतात.काय तो डाएट प्लॅन त्यात मैदयाचे पदार्थ खायचे नाही.चहा बिनसाखरेचा प्यायचा फ्रेश ज्युस विदाऊट शुगर .ते कॅन्ड मधले ज्युस नाही हा प्यायचे आणि मग हवं तर त्या बरोबर डायट ज्युस ओटस आणि पावडरी पण मिळतात वजन कमी करायच्या. ती माझी एक मैत्रीण आहे ती करते त्याचं मार्कटिंग. मी पण करावा म्हणते.दोन तोन महिन्याचा कोर्स . नाष्टयाचं डीश पुढे करत..एक प्लेटभरून उकडलेली मुग मटकी तिखट मीठ लावलेली म्हणाली.

मंगेश -- " अगं ! मोना ,हे काय उकड नुसती.मूग नं मटकी कोथींबीर मला ओला नारळ किसलेला पेरून बनवलेले शेंगदाणा दाळे टाकलेले कांदा-पोहे बनव नेहमी प्रमाणे असला नाष्टा नको."

मोना -- अहो पण मी हेच बनवलंय आज हेच खायचंय. मला चालायला जायचंय.आणि नंतर जीम मधे. येताना चिकन घेऊन येते. (चिकन म्हटलंयावर जरासं बरं वाटलं मंग्याला.) हो पण फक्त शिजवलेली उकड.प्लेन सुप. मसाला नाही.आता मात्र मंगेश रावांचा चेहरा पूर्ण पडलेला असतो.

तितक्यात सोनू येते...हे माॅम डॅड मला पण ....काय गं मला पण...सोना...
सोना -- आई , तुझ्याबरोबर मी पण येणार जीमला. आणि   मम्मा डॅडा आपण जिमची शाॅपींग करायला कधी जायचं. 
मंगेश - अगं सोना तू पण हे काय नविन...
           (तितक्यात सनी येतो..)
सनी-- बाबा मी ही उदया पासून जाॅगिग ला जाणार आहे ....मला ही ते वाॅच, हेल्थ टाईमर ,नविन शूज आणि टि शर्ट ,ट्रॅक पॅन्ट, सगळं हवंय.आणि नविन सायकल ही हवीय .जुन्या सायकलचा स्पिड ही कमी झालाय.
मोना -- आणि मला ही नविन जीम सुट , स्पोर्ट शुज आणि ते टाईमर आणि नविन बॅग व नॅपकिनस सगळं हवंय..तिच्या आवाजात आवाज मिसळत सोना ही ...
सोना - आणि मला ही हवे आहेत नविन स्पोर्ट शूज आणि जीम सुटस.

मंगेश -- अरे मुलांनो, बापरे हे काय नवीनच सगळं.
ऐकतोय डोक्याला हात लावत.ही जीम आणि फिटनेसच खुळ डबलच खर्चिक आहे की. काही खरं नाहीये. मुलांनो आहे तसं जे करायचं ते करा.आहे त्या परिस्थितीत मी काहीही नविन घेऊ शकत नाही. ना वीस वीस तीस तीस हजार रूपये जीम लावायला देऊ शकतो.आता मात्र सगळ्यांचेच चेहरे पडले. सगळेच शांतपणे बसुन राहिले. तुम्हीं फिटनेस साठी. जीम ला जाता की.लोंकाना दाखवण्यासाठी फॅशन म्हणून.नाहीतर आजकाल कशाचाही दिखावाच जास्त. कानात हेडफोन लावून गाणे ऐकत वाॅक करणे ठिक आहे.पण जीम मधे एक्सरसाईज करताना सेल्फी. फोन हातात.चालताना ही मोबाईल वर बोलणं चालुच कसले हे व्यायाम. आणि डायटचे प्रकार. 

आजोबा सकाळी लवकर उठले होते.पेपर वाचत सोफ्यावर एका कोपऱ्यात शांत पणे बसुन होते. अधुनमधुन पेपर मधुन डोकं काढुन टेबलाकडे डोकावत व मधेच मिश्किलपणे हसत परत पेपर वाचण्यात मग्न होत. मात्र त्याचं सगळं लक्ष्य डायनींग टेबल समोरच्या खुर्चीत बसलेल्या मुलाच्या व सुनेच्या बोलण्याकडे होते म्हणण्यापेक्षा त्यांचे बोलणे आपोआपच त्यांच्या कानावर पडत होते.  

आजोंबानी पेपर वाचता वाचता खाली ठेवला त्यांनी मुलांना आपल्याजवळ बोलवले.सुनबाई कडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले मुलांनो आमच्या वयात ना वेगवेगळे नाष्टयाचे प्रकार नव्हते ना.जेवनाचे असे थाटमाट.अगदी साधं गरमागरम जेवण वरण-भात , भाजी-पोळी, चपाती ,तूप लोणचं कधी तरी पापड. कधीतरी गोड शिरा तो ही काहीतरी विशेष असेल तरच.मेथी , शेपू, पालक,चुका ,तांदुसा अश्या पालेभाज्या अगदी  आईने तव्यावर मीठ मसाला टाकुन परतलेल्या मोठ्या चवीने खायचो. वेळेवर चहा नाष्टा असा प्रकार मला माहित नाही पण सकाळी आठ नऊ वाजता दुपारी एक दोन व संध्याकाळी सात आठला जेवण होऊन नऊ वाजेपर्यंत ढाराढूर झोपायचो आम्ही.शाळा मग दुपारी संध्याकाळी मैदानी खेळ खेळायचो. हाच व्यायाम .हाफ पॅन्ट शर्ट दोन जोडी कपडे.रोज एक घालायचो.

स्वच्छ सुटसुटीत कपडे .पायाला आराम देणारी रोजची चप्पल हवी. आणि विशेष म्हणजे मोकळी हवा आणि निसर्गरम्य ठिकाण एखादा बगीचा, जाॅगिग पार्क असले म्हणजे झाले फिरायला. फळं ड्रायफ्रुटस खा.भरपूर पाणी प्या,आईच्या हातचं जेवण आवडीने वेळेवर खा.वेळेवर झोपा आणि वेळेवर ऊठा. गप्पा मारा बोला आवडीचे खेळ खेळा पहा कुठल्याही जीमची आणि वजन घटवण्याच्या प्रक्रियेची गरज पडणार नाही.आपोआप वजन कमी होईल. त्यासाठी खास वेळ ही दयावा लागणार नाही.सगळेच आनंदाने राहुयात..चला खूप वेळ झाला कामाला लागूया.मंगेश मोठ्या समाधानाने बाबांकडे पहात होता. मोना नी तोपर्यंत कांदा पोहे बनवून आणले.सर्वांनी हसत-हसत कांदा-पोहयावर ताव मारला.

-सौ. तनुजा ढेरे
ठाणे

Sunday, 25 November 2018

आजची वाचन संस्कृती- वाचाल तर वाचाल

वाचाल तर वाचाल :- आजची वाचन संस्कृती

        
एक वाचक म्हणून मी जेव्हा आजुबाजूला पाहते तेव्हा लोक सतत मोबाईलमधे आयपॅड वा लॅपटाॅपमधे डोकावताना दिसतात. सोशलमिडियावरील पोस्टस वाचनीय असतील तर नक्कीच वाचतात. पुस्तक हातात घेऊन नाहीतर ऑनलाईन या ना त्या स्वरूपात नकळतपणे वाचन याचं होतच असतं. पण सकस, दर्जदार  वाचन त्याप्रमाणात खूप कमी होतंय. कारण वाॅल स्क्रोल करून पुढे जाताना आपण काल काय वाचलं होतं ते लगेच विसरून जातो. किंवा कधी कधी व्यक्तीचं नाव वाचूनच पुढे जातो. एखादाच विरळ जो आवर्जून एखाद्याची वाॅल शोधून वाचतो. तसं पुस्तक मात्र सतत उशाशी ठेवलं तर हवं तेव्हा वाचता येतं हे आपण आता  विसरतच चाललोय. घडयाळाच्या काट्यावर चालणाऱ्या या जगात लोक इतके या इंटरनेटच्या विळख्यात अडकत आहेत की खऱ्या पुस्तकाची दुनियाच विसरून जात आहेत. आपण स्वतः प्रत्येकाने प्रत्येकाच्या अभिव्यक्ती आवडीनुसार प्रत्येकाला हातात पुस्तक घेऊन वाचनासाठी प्रवृत्त केले पाहिजे. आपण सतत हे वाचले पाहिजे ते वाचले पाहिजे असे म्हणताना मुलांकडून, आजच्या तरूण वर्गाकडून पुस्तके वाचून घेऊन, त्यांना वाचनाची गोडी लावायला हवी. त्यांचा वाचनाचा कल लक्षात घेऊन चांगली पुस्तकं वाचण्यासाठी सुचवावीत. त्यांच्यात लेखनकौशल्य असेल तर त्याला पूरक वाचन आहे हे समजावून सांगताना सहज सोप्या छोट्या छोट्या पुस्तकापासून गोडी लावत त्यांच्यात आपण वाचनाची गोडी निर्माण करू शकतो. खरंतर आजच्या मुलांना बालकवीता म्हणजे काय ? बालकवी कोणते ? चांगले कथाकार ? इथंपासूनचे प्रश्न आहेत. आजच्या तरूणांना जुन्या-नव्या पिढीतले लेखक कोणते, किती वाचले असे विचारले तर काय उत्तर येईल, 'ते बोअरिंग काम आहे.' ह्यांना कसं वळवता येईल वाचनाकडे हे पाहयला हवं. दर्जेदार बालसाहित्याकडे मुलांना वळवलं तर नक्कीच उद्याचा सदृढ वाचक वर्ग निर्माण होईल.

खरंतर एक वाचक म्हणून विचार केला तर जेव्हा आपण आजुबाजूला पाहतो  तेव्हा सोशलमिडियावरील पोस्टस वाचनीय असतील तर नक्कीच वाचणारा एक वर्ग आपल्याला दिसतो. परंतू हा वर्ग तसं पुस्तक हातात घेऊन वाचताना फार कमी आढळतो. काही चिकित्सक व अभ्यासक असतील व त्यांना सांगितले की तू हे पुस्तक वाच, ते वाच, तो संदर्भ पाहा तर शंभरात एखादी व्यक्ती ते पुस्तक विकत घेऊन वाचेल. प्रत्येकजण आपल्या सोईनुसार जमेल तसं काहीना काही प्रमाणात वाचत असतो. ते वाचताना ते वाचन कुठल्याही प्रकाराचे असू शकते. अगदी सोशलमिडियापासून ब्लाॅग ते विकिपिडीयावरील माहितीपर लेख सुध्दा. एखाद्या सिनेमापासून, दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या चमचमीत बातम्या सुध्दा. मला इथे एक मुद्दा मांडावासा वाटतोय की सोशल मिडियावरले लेख कधी कधी चटपटीत खमंग मनोरंजनपर असतात किंवा तात्कालीक त्या कालावधीचं निदर्शन करताना एक तात्कालिक विधान करणारे असतात. तेवढ्या काळापुरतं मर्यादित अस्तित्व असतं त्या लेखनाचं. त्यातील काही व्यक्ति-लेखक जाणीवपूर्वक विविध विषय हाताळताना वैशिष्टयैपूर्ण लेखन करताना आपल्या दिसतात. यात ते पुस्तक वाचनावरही भर देतात. यात अलीकडे ई-बुकचाही समावेश झालाय. खरंतर सोशलमिडिया हे प्रसिध्दीमाध्यम आहे त्याला विविधअंगानी आपण लोंकानीच वळवले आहे. आपण या माध्यमातील अनेक सजग वाचकांना वा ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांना ग्रंथालयाकडे वळवू शकतो. त्यांच्यात वाचनाची गोडी लावू शकतो त्यासाठी वेगवेगळे मेळावे, वाचन कट्टे यात त्यांना वाचन करण्यास बोलावून सहभागी करून घेणे. साहित्यिक विविध स्पर्धा आयोजित करून त्यात  वाचकांना सहभागी करून घेऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे की तुमचं जीवन तुमचा वेळ तुम्ही कसा सकारात्मक पध्दतीने घालवू शकता.

एक वाचक व लेखक या भूमिकेतून मी जेव्हा आजच्या साहित्याकडे पाहते तेव्हा आजचे बोटावर मोजण्याइतके साहित्यिक व त्यांचे लेखन व वर्तन यामधे मला सुसंगता वाटते.  त्यांची वैचारिकभूमिका त्यांचा अभ्यास, साहित्याबद्दलची निष्ठा व वर्तन यात विसंगतता असं नाही म्हणता येईल पण आजकाल मी किती हुशार व बुध्दीवंत आहे दाखवण्याकडे कल वाढला आहे. सोशलमिडिया व अनेक प्रसार माध्यमामुळे स्वप्रसिध्दी मिळते एक वलय निर्माण होते. या वलयातून बाहेर येण्यास लेखक तयार होत नाही. यात वास्तवाचे भान विसरून चटपटीत खमंग आकर्षक लेखन करून आपला वाचक वर्ग तयार करताना कधी कधी स्वतःचं अस्तित्व विसरून भान हरपून गेलेले लेखक ही मला इथे दिसतात. तर काही लेखक पड्दया आड राहून वा अधूनमधून समोर येऊन आपली वैचारीक भूमिका मांडताना साहित्यिकाची बाजू भूमिका ठाम मांडताना दिसतात. त्यांच्या लिखानाची ठोस बाजू मांडतात. नवोदिंताना दिशा देण्याचं काम करताना उत्तम साहित्यकृलाकृती म्हणजे नेमकं काय त्यांच्या अभिव्यक्तीमधून आपल्याला आढळतं. या  लेखकवर्गाचा विशिष्ट असा वाचक वर्ग आहे व नक्कीच त्यांच्या लिखानाचा वाचकाच्या प्रतिमेवर परिणाम दिसून येतो.
आता सोशल माध्यमं हाताशी असल्याकारणाने जो तो पहिलं लिहितो व प्रसिध्दीच्या मागे लागतो. पण वाचनाकडे हे लोक हे वळलेले दिसत नाहीत.

काॅलेज जीवन संपले व लग्नानंतर मुलं होईपर्यंतचा मधला काळ यात जास्ती पुस्तक वाचन झाले नाही. वाचनापासून पूर्णच लांब होते असेही नाही. मधल्या काळात तशी बरीच पुस्तके वाचली. पण ती ही घरगुती विषयाची. मात्र जसा जसा वेळ मिळत गेला पुढे परत मी रिकाम्या वेळेत वाचनाकडे वळले. टेबलाशी, बेडजवळ, गाडीत, पर्समधे एकतरी पुस्तक असतेच. आता महिन्यातून कमीत कमी पाच ते दहा पुस्तकाची खरेदी करतेच. वाचनाने चार भितींतलं माझं जगणं  बरंचसं समृध्द केलंय. मुंबईसारख्या या महानगरीत राहताना धावपळीच्या, घाईगडबडीच्या जगण्यात ही पुस्तकं मानसिक समाधानाबरोबरच एकलकोंडेपणाही कमी करतात असं म्हटलं तर चूक होणार नाही.

तनुजा ढेरे


दिवाळी अंक - साहित्यिक नजरेतून

दिवाळी अंक - २०१८

दिवाळी अंकाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा कितीतरी दिवाळी अंक आपल्या आजुबाजूला दिसतात. महाराष्ट्रातील दिवाळी अंकाना शंभर वर्षाची परंपरा लाभलेली आहे  या दिवाळी अंकाचा विचार करता दरवर्षी हजार ते बाराशे दिवाळी अंक निघतातच. मुंबई ठाणे, पुणे येथूनच शे- पाचशे अंक निघत असतील.

मौज, दीपवाली, महाराष्ट्र टाईम्स, हंस, कालनिर्णय, ऋतुरंग, सकाळ, जत्रा इ. दिवाळी अंकाच्या परंपरेत... आता अनेक जिल्हयातून, विभागातून दर्जदार दिवाळी अंक निघत आहेत.
अनेक साहित्यिक दिवाळी अंकाची मेजवाणी आपण रसिक चाखत आहोत त्यात वाघूर, साहित्यसेतू, अक्षरवेध, अधोरेखीत  इ. अनेक नवनविन दिवाळी अंकातून अनेक नवोदित लेखक कवींना स्थान मिळतंय. अनेक लेखकही पुढे येऊन संपादनाचं काम करतायेत ही खूप आशाजनीक गोष्ट आहे. पारंपारिक ठरलेली प्रस्थापित लेखकांची चौकट मोडून काही दर्जदार दिवाळी अंक नवनविन लेखकांना त्यांच्या अंकात सामावून घेताना लेखक वर्गाला प्रोत्साहन देत आहेत. ही उल्लेखनीय बाब आहे

एका वाचकाच्या भूमिकेतून दिवाळी अंकाचा विचार करताना रसिक वर्गाला  काय हवंय हे खरंतर खूप महत्वाचं असतं व हे ओळखण्यातच संपादक व लेखक वर्गाचं खरं कौशल्य आहे. मनोरंजन की मेंदूला पौष्टीक खुराक हवा या अंगाने विचार करायला हवा. आताचा वाचक वर्ग हा खूप सजग आहे. नुसता अंक देखणा असून उपयोग नाही तर त्यातील मजकूर लेखन हे सकस हवं.

आजच्या दिवाळी अंकाचा विचार करता यात प्रामुख्याने लेखकांची भूमिका/ कविची भूमिका वा मान्यवर कलाकार व व्यक्तीची भूमिका खूप महत्वाची वाटते. कथा / ललितलेखन/ मुलाखत/ माहितीपर / लघुकादंबरी, दीर्घ कथा, शब्दमर्यादा इ. विविध दालनं लेखकांसमोर आता खुली आहेत.

खरंतर दिवाळी अंक निर्मितीत लेखकासमोरची आव्हाने कोणती ? लेख वेळेत पाठवणे हे लेखकांसमोरचे मोठे कसब आहे? लेख कथा पाठवल्यानंतर पोहच पावती मिळेलच याबाबतीत लेखक नेहमी साशंक रहातो. लेख -कथा छापून आली तरी कित्येक वेळा अंकच पोहचत नाही त्या लेखकांपर्यंत. तिऱ्हाईत व्यक्तीकडून माहिती कळते की आपला लेख छापून आलाय. पारदर्शकता यायला हवी या सर्व व्यवहारामधे. अंक विकत घेतल्यावर काय आपण काय वाचतो. चाळून तसाच ठेवतो अंक की खरंच वाचतो प्रत्येक वाचक हाही प्रश्न नेहमीच मला पडतो.

प्रकाशका समोरची / संपादका समोरची आव्हाने ?
छपाई / लेखन निवडणे /

संपादक
^
लेखक/ कलाकार
^
चित्रकार
^
रेखाटनकार
^
वाचक
^
विक्रेता/ प्रकाशक

दिवाळीअंकात ज्या लेखक / कवींने लेखन केले आहे तो अंक त्याला विकत घ्यावा लागतो की संपादक पाठवतो ? लेखक/ कवी किती अंक विकत घेतात. सर्वसाधारण दिवाळी अंक वाचल्यावर आपल्याला काय वाटते ? हेही प्रश्न आहेत.

दिवाळी अंकाचे विविध प्रकार ; एकाच विषयाला वाहिलेले दिवाळी अंक उदा : नोबेल लेखक इ. आरोग्यविषयक, फराळ व रेसपी  खेळ, साहित्य इ. अनेक विषय व आशय हाताळलेले अंक- पद्मगंधा, बालसाहित्यविषयक दिवाळी अंक - किशोर, स्त्रीवर्गासाठी असलेले अंक - शब्दशिवार स्त्री कथा विशेंषाक, मनोरंजनपर हास्य व विनोदी कथा विशेष अंक..
कुबेर दिवाळी अंक - अभासी जगातून आकारास आलेलं वास्तव तितकंच प्रखर व सौम्य...शब्दातून मांडणारा हा दिवाळी अंक
संचार - साहित्य व राजकारण व समाजकारण सर्व अंगाना स्पर्श करणारा दिवाळी अंक
अश्लेषा दिवाळी अंक -
शब्दशिवार - कथा विशेंषाक सप्तर्षी प्रकाशन
कुसुमाकर - श्याम पेंढारी
आणि आता उत्सुकता आहे ती झपुर्झा दिवाळी अंक वाचण्याची...

तनुजा ढेरे