Sunday, 25 November 2018

आजची वाचन संस्कृती- वाचाल तर वाचाल

वाचाल तर वाचाल :- आजची वाचन संस्कृती

        
एक वाचक म्हणून मी जेव्हा आजुबाजूला पाहते तेव्हा लोक सतत मोबाईलमधे आयपॅड वा लॅपटाॅपमधे डोकावताना दिसतात. सोशलमिडियावरील पोस्टस वाचनीय असतील तर नक्कीच वाचतात. पुस्तक हातात घेऊन नाहीतर ऑनलाईन या ना त्या स्वरूपात नकळतपणे वाचन याचं होतच असतं. पण सकस, दर्जदार  वाचन त्याप्रमाणात खूप कमी होतंय. कारण वाॅल स्क्रोल करून पुढे जाताना आपण काल काय वाचलं होतं ते लगेच विसरून जातो. किंवा कधी कधी व्यक्तीचं नाव वाचूनच पुढे जातो. एखादाच विरळ जो आवर्जून एखाद्याची वाॅल शोधून वाचतो. तसं पुस्तक मात्र सतत उशाशी ठेवलं तर हवं तेव्हा वाचता येतं हे आपण आता  विसरतच चाललोय. घडयाळाच्या काट्यावर चालणाऱ्या या जगात लोक इतके या इंटरनेटच्या विळख्यात अडकत आहेत की खऱ्या पुस्तकाची दुनियाच विसरून जात आहेत. आपण स्वतः प्रत्येकाने प्रत्येकाच्या अभिव्यक्ती आवडीनुसार प्रत्येकाला हातात पुस्तक घेऊन वाचनासाठी प्रवृत्त केले पाहिजे. आपण सतत हे वाचले पाहिजे ते वाचले पाहिजे असे म्हणताना मुलांकडून, आजच्या तरूण वर्गाकडून पुस्तके वाचून घेऊन, त्यांना वाचनाची गोडी लावायला हवी. त्यांचा वाचनाचा कल लक्षात घेऊन चांगली पुस्तकं वाचण्यासाठी सुचवावीत. त्यांच्यात लेखनकौशल्य असेल तर त्याला पूरक वाचन आहे हे समजावून सांगताना सहज सोप्या छोट्या छोट्या पुस्तकापासून गोडी लावत त्यांच्यात आपण वाचनाची गोडी निर्माण करू शकतो. खरंतर आजच्या मुलांना बालकवीता म्हणजे काय ? बालकवी कोणते ? चांगले कथाकार ? इथंपासूनचे प्रश्न आहेत. आजच्या तरूणांना जुन्या-नव्या पिढीतले लेखक कोणते, किती वाचले असे विचारले तर काय उत्तर येईल, 'ते बोअरिंग काम आहे.' ह्यांना कसं वळवता येईल वाचनाकडे हे पाहयला हवं. दर्जेदार बालसाहित्याकडे मुलांना वळवलं तर नक्कीच उद्याचा सदृढ वाचक वर्ग निर्माण होईल.

खरंतर एक वाचक म्हणून विचार केला तर जेव्हा आपण आजुबाजूला पाहतो  तेव्हा सोशलमिडियावरील पोस्टस वाचनीय असतील तर नक्कीच वाचणारा एक वर्ग आपल्याला दिसतो. परंतू हा वर्ग तसं पुस्तक हातात घेऊन वाचताना फार कमी आढळतो. काही चिकित्सक व अभ्यासक असतील व त्यांना सांगितले की तू हे पुस्तक वाच, ते वाच, तो संदर्भ पाहा तर शंभरात एखादी व्यक्ती ते पुस्तक विकत घेऊन वाचेल. प्रत्येकजण आपल्या सोईनुसार जमेल तसं काहीना काही प्रमाणात वाचत असतो. ते वाचताना ते वाचन कुठल्याही प्रकाराचे असू शकते. अगदी सोशलमिडियापासून ब्लाॅग ते विकिपिडीयावरील माहितीपर लेख सुध्दा. एखाद्या सिनेमापासून, दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या चमचमीत बातम्या सुध्दा. मला इथे एक मुद्दा मांडावासा वाटतोय की सोशल मिडियावरले लेख कधी कधी चटपटीत खमंग मनोरंजनपर असतात किंवा तात्कालीक त्या कालावधीचं निदर्शन करताना एक तात्कालिक विधान करणारे असतात. तेवढ्या काळापुरतं मर्यादित अस्तित्व असतं त्या लेखनाचं. त्यातील काही व्यक्ति-लेखक जाणीवपूर्वक विविध विषय हाताळताना वैशिष्टयैपूर्ण लेखन करताना आपल्या दिसतात. यात ते पुस्तक वाचनावरही भर देतात. यात अलीकडे ई-बुकचाही समावेश झालाय. खरंतर सोशलमिडिया हे प्रसिध्दीमाध्यम आहे त्याला विविधअंगानी आपण लोंकानीच वळवले आहे. आपण या माध्यमातील अनेक सजग वाचकांना वा ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांना ग्रंथालयाकडे वळवू शकतो. त्यांच्यात वाचनाची गोडी लावू शकतो त्यासाठी वेगवेगळे मेळावे, वाचन कट्टे यात त्यांना वाचन करण्यास बोलावून सहभागी करून घेणे. साहित्यिक विविध स्पर्धा आयोजित करून त्यात  वाचकांना सहभागी करून घेऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे की तुमचं जीवन तुमचा वेळ तुम्ही कसा सकारात्मक पध्दतीने घालवू शकता.

एक वाचक व लेखक या भूमिकेतून मी जेव्हा आजच्या साहित्याकडे पाहते तेव्हा आजचे बोटावर मोजण्याइतके साहित्यिक व त्यांचे लेखन व वर्तन यामधे मला सुसंगता वाटते.  त्यांची वैचारिकभूमिका त्यांचा अभ्यास, साहित्याबद्दलची निष्ठा व वर्तन यात विसंगतता असं नाही म्हणता येईल पण आजकाल मी किती हुशार व बुध्दीवंत आहे दाखवण्याकडे कल वाढला आहे. सोशलमिडिया व अनेक प्रसार माध्यमामुळे स्वप्रसिध्दी मिळते एक वलय निर्माण होते. या वलयातून बाहेर येण्यास लेखक तयार होत नाही. यात वास्तवाचे भान विसरून चटपटीत खमंग आकर्षक लेखन करून आपला वाचक वर्ग तयार करताना कधी कधी स्वतःचं अस्तित्व विसरून भान हरपून गेलेले लेखक ही मला इथे दिसतात. तर काही लेखक पड्दया आड राहून वा अधूनमधून समोर येऊन आपली वैचारीक भूमिका मांडताना साहित्यिकाची बाजू भूमिका ठाम मांडताना दिसतात. त्यांच्या लिखानाची ठोस बाजू मांडतात. नवोदिंताना दिशा देण्याचं काम करताना उत्तम साहित्यकृलाकृती म्हणजे नेमकं काय त्यांच्या अभिव्यक्तीमधून आपल्याला आढळतं. या  लेखकवर्गाचा विशिष्ट असा वाचक वर्ग आहे व नक्कीच त्यांच्या लिखानाचा वाचकाच्या प्रतिमेवर परिणाम दिसून येतो.
आता सोशल माध्यमं हाताशी असल्याकारणाने जो तो पहिलं लिहितो व प्रसिध्दीच्या मागे लागतो. पण वाचनाकडे हे लोक हे वळलेले दिसत नाहीत.

काॅलेज जीवन संपले व लग्नानंतर मुलं होईपर्यंतचा मधला काळ यात जास्ती पुस्तक वाचन झाले नाही. वाचनापासून पूर्णच लांब होते असेही नाही. मधल्या काळात तशी बरीच पुस्तके वाचली. पण ती ही घरगुती विषयाची. मात्र जसा जसा वेळ मिळत गेला पुढे परत मी रिकाम्या वेळेत वाचनाकडे वळले. टेबलाशी, बेडजवळ, गाडीत, पर्समधे एकतरी पुस्तक असतेच. आता महिन्यातून कमीत कमी पाच ते दहा पुस्तकाची खरेदी करतेच. वाचनाने चार भितींतलं माझं जगणं  बरंचसं समृध्द केलंय. मुंबईसारख्या या महानगरीत राहताना धावपळीच्या, घाईगडबडीच्या जगण्यात ही पुस्तकं मानसिक समाधानाबरोबरच एकलकोंडेपणाही कमी करतात असं म्हटलं तर चूक होणार नाही.

तनुजा ढेरे


No comments: