हिरवी बोली बोलणारे कवी :- कवीवर्य. पद्मश्री. ना.धों महानोर
जगातील मराठी भाषिकांना आपल्या साहित्यप्रतिभेने गेली पन्नास वर्षांपासून मोहिनी घालणारे रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन १० जानेवारी २०२० रोजी होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी शुक्रवारी दिली. आणि सर्व साहित्यिक वर्तुळात पुनःश्च उत्साहपुर्ण वातावरण निर्मिती झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १० ते १२ जानेवारी २०२० या दरम्यान उस्मानाबाद येथे होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा या आयोजक संस्थेकडून संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच एकमताने निवड झाली आहे. 'उस्मानाबादकरांच्या विनंतीचा मान राखून ना.धों. महानोर यांनी संमेलनाच्या उद्घाटनाला येण्याचे मान्य केले आहे. त्यांच्या सहवासामुळे साहित्यक्षेत्रातील प्रतिभेला आणि नवोदित लेखक, कवींना ऊर्जा मिळेल,' असे तावडे यांनी सांगितले ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची, अभिमानास्पद, स्वागताहार्य गोष्ट आहे….
कविवर्य, पद्मश्री ना.धों. महानोर यांचा जन्म महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. ना.धों महानोर यांना चार भाऊ व तीन बहिणी, ते सगळ्यात थोरले. शाळेत असल्यापासूनच त्यांना कवितेची गोडी लागली. शाळेच्या नाटकांमधूनही त्यांनी काम केले. मॅट्रीक झाल्यावर जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. महाविद्यालयात असताना त्यांना त्यांच्या साहित्यिक प्राध्यापकांकडून प्रोत्साहन मिळाले. मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले. वैयक्तिक अडचणींमुळे ते महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला आपल्या गावी परतले व तेथेच रमले.
ना.धों.महानोर यांनी मराठी साहित्याचा प्रांत आपल्या लेखनीतून हिरवागार बहरवला. अद्भुत निसर्गप्रतिमांनी, प्रतिकांनी, निसर्गाच्या नानाविविध रंग छटांनी, फुलांच्या, पानाच्या, मातीच्या गंधाने नदीच्या प्रवाहासारख्या नाद लयींनी त्यांची कविता समृध्द अशी मराठी साहित्यात अमुल्य अशी भर टाकणारी ठरली. रानात शेती मातीत रमणारा हा कवी, निसर्गाची हिरवी भाषा बोलतो, हिरवी स्वप्ने पाहतो. निसर्गाशी संवाद साधतो. कवितेचं बोट धरून आपण रसिक वाचकांना निसर्गाचं आगळंवेगळं दर्शन त्यांच्या कविता घडवतात. शेतीत शब्द पेरून कवितांचे पीक घेणारा हा ‘शेतकवी’. ना.धो. महानोर यांनी आपल्या जीवनात अनेक चढउतार पाहिले. जिवावर बेतणार्या अनेक घटना त्यांच्या जीवनात घडल्या. अनेक कडू-गोड प्रसंगांतून त्यांना जावे लागले व तेच भाव त्यांच्या कवितेच्या गाथेतून तरलपणे उतरलेले आपल्याला दिसतात.
‘ह्या शेताने लळा लावला असा असा की
सुखदु:खाला परस्परांशी हसलो-रडलो
आता तर हा जीवच असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो ’
ना.धों. महानोरांच्या या गोड, रसाळ शब्दांनी मराठी रसिकांना लळा लावला. काळ्या मातीवर, शेतीवर, गावावर, आपल्या आईवर व माणसांवर जिवापाड प्रेम करणार्या या कवीने आपल्या शब्दांनी अवघ्या देशाला मोहिनी घातली. शेती, मातीशी, आभाळाशी संवाद साधणाऱ्या निसर्गकवितेची अद्भूत अशी विविध रूपे त्यांनी आपल्या कवितेतून शब्दबध्द केली.
‘ या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे.’
गंधगर्भ लयीने व लख्ख चांदण्याने ना.धों.महानोर यांची कविता ओंथबलेली आहे. मातीचा मृदगंध, मातीशी जोडलेलं एक अनोखं नातं, जुडलेली नाळ, मातीशी जोडलेल्या वेदना-संवेदना आहेत. आभाळाशी नातं, निसर्गाचे विविध गंध, रंग व ध्वनी असलेली त्यांची कविता, निसर्गाच्या विविध प्रारूप जाणिवांनी, संवेदनांनी फुललेला व रोमांचित करणार श्रृंगार त्यांच्या कवितेत आहे. ना. धों. महानोंरीची उत्कट अभिव्यक्ती या रोमॅटिक भाव भावनांच्या अंगाने अनेक कवितेतून वळण घेत पुढे जाते.
‘नदीकाठावर कर्दळीचे बन पाण्यात निथळे
बांधाला लागून गव्हाचे पिवळे शेत सळसळे
आंब्याच्या झाडाला मोहोराचा वास झेपता झेपेना
गाभुळ्या चिंचेला नवतीचा भार पोटी धरवेना
माघातले ऊन झेलताना अंग झाले निळेभोर
पाणमळ्यातील शेलाट्या वेलींचे नव्याने उभार…’
स्वच्छंद व निखळ गावाचं वर्णन करणारी, निसर्गाइतकेच प्रेमळ प्रेमभाव जपणारी त्यांची कविता ही वेगळीच बलस्थानं घेऊन अवतरते. निसर्ग आणि स्त्री ही महानोंराच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. व याला जोडूनच निस्सिम, उत्कट, निखळ, नितळ असा पवीत्र प्रेमभाव त्यांच्या कवितेतून प्रकट होतो. त्यांच्या स्त्रीकेंद्री कविताही रानातल्या स्त्री निसर्गप्रारूपाशीच एकरूप आहेत.
‘ फुलात न्हाली पहाट ओली क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले
रंग फुलांवर ओघळताना असे जुईला लदबदले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले
निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणा कुणाच्या आठवणी’
याबरोबरच केवळ निसर्गाचं सौंदर्य व सुखदायक चित्र न मांडता तितक्याच ताकदीने आत्मचिंतनातून त्यांनी दुष्काळाचे व माणसाच्या वास्तव जगण्याचे पैलूही समोर आणले. ना. धों. महानोर म्हणतात, ‘ जिथे आपण जगतो, त्या जगाशी, विश्वाशी आपण एकरूप झालेलो असतो.’ तसेच मीही इथल्या, मातीशी, निसर्गाशी, सुखदु:खाशी एकरूप झाले, व तेच शब्दचित्र त्यांच्या कवितेतून उमटलं. प्रत्येक वर्षाचा निसर्ग, आभाळ, पाऊस हा वेगवेगळी रूपे घेऊन येतो, प्रत्येक वर्षाचा भुईच्या नांगरण्याचा सुंगध हा वेगळा असतो…. कधी कधी दुष्काळ पडल्यावर माणसं निष्पर्ण होत गेलेली त्यांनी पाहिली व त्यांच्या कवितेतून तेच भाव तितक्याच ताकदीने उतरलेले आपल्याला दिसतात.
‘नांगरून पडलेली जमीन सर्वत्र, नुसताच शुकशुकाट
एखादेच चुकार वासरू कुठेतरी. उध्वस्त घाट
फुलांच्या पाकळ्या गळून गेलेल्या, नुस्तेच देठ
तशी माणसे नुस्ती नुस्ती त्यांच्याच खोप्यांत गुरफटलेली….’
ना.धो.महानोरांची कवितेत प्राणतत्व आहे. वास्तवतेचे सामाजिक संदर्भ आहेत. तसेच काही कवितांचा घाट हा कथात्मक असून, अल्पअक्षरत्व हाही एक गुण ना. धो महानोंराच्या कवितेचा आहे. कवितेची भाषा सहज, सोपी असून लयदार आहे.
‘ ज्वार, उभार, गर्भारपण
हिर्व्या पदराला जर,
निऱ्या चाळताना वारा
घुसमटे अंगभर.’
कविता लेखनासोबतच ना.धों. महानोंरानी गद्यलेखनही भरपूर केलं आहे. 'गाधांरी' ही कादंबरी, ‘गपसप’ व ‘गावकडच्या गोष्टी’ हे लोककथांचे संग्रह ‘ऐशी कळवळ्याची जात’ हा व्यक्तीचरित्रात्मक ललितलेखसंग्रह असे विविधरंगी ललितलेखन त्यांच्या नावावर आहे. ‘यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार’, ‘शरद पवार आणि मी’, ‘आनंदयोगी पु.लं’. या पुस्तकांमधून त्यांनी महाराष्ट्रातील मोठी व्यक्तीमत्वे उलगडली आहेत. अलिकडेच त्यांचं ‘दिवेलागणीची वेळ’ हा ललित लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. नवनविन साहित्यनिर्मितीतून जसा त्यांना आनंद मिळतो, तसाच शेतीमातीच्या जगण्यातून मिळतो. याचेच अनुभवकथन या पुस्तकातील लेखातून त्यांनी केले आहे. अर्थात ना.धों महानोंराचं पहिलं प्रेम कवितेवरच ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहाने मराठी साहित्य्त, कवितेत त्यांचं स्थान निर्माण केलं. ‘पानझड’, ‘वाहटळू’ इ. त्यांचे अकरा कवितासंग्रह व 'अजिंठा' हे खंडकाव्य प्रसिध्द आहे. 'वही' आणि 'पळसखेडची गाणी' हे त्यांच्या लोकगीतांचा संग्रह प्रसिध्द आहेत. 'जैत रे जैत' या चित्रपटात त्यांच्या कविताच गाण्यांच्या रूपात अविष्कृत झाल्या आहेत. ‘जैत रे जै’, ‘सर्जा’, ‘एक होता विदूषक’, ‘अबोली’, ‘मुक्ता’ इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. पावसाची विविध रूप त्यांच्या मनात भरलेली, ‘मृगाचा पाऊस’, ‘रात झडीचा पाऊस’इ. अनेक प्रतीमा, प्रतीकातून त्यांनी अतिशय भावगर्भ अशा पावसाळी कविता लिहिल्या व त्याची पुढे गाणी झाली. ‘घन ओथंबून येती’, ‘नभ उतरू आलं’, ‘मी रात टाकली’,’ मन चिंब पावसाळी’, ही गाणी मराठी रसिकजनांच्या ओठी आजही कायम आहेत. ना.धों.महानोराचं लोकगीत, लोकसंगीत व लोककलेवर अपार प्रेम आहे. लोकसाहित्याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड प्रेम व जिव्हाळा आहे. लोकसाहित्याच्या छत्रछायेतच ते लहानाचे मोठे झाले. या लोकसाहित्याच्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या भागातील लोकगीतं व लोककथा शोधून काढल्या व त्या एकत्रित संग्रहरूपाने त्यांचा परिचय महाराष्ट्राला घडवला. ना.धों. महानोंरानी लिहिलेल्या वह्या त्यांच्या 'वही' या संग्रहरूपाने पुढे आल्या.
‘चांद केवड्याची रात आलीया सामोरा
राजा माझ्या अंबाड्याला बांधाया गजरा
अशा सौंदर्य व श्रृंगार रसाने नटलेल्या शब्दकळाचं लेणं लाभलेल्या 'वही' या संग्रहाचं रूप राजस आहे.
'राजसा... जवळी जरा बसा
जीव हा पिसा तुम्हाविण बा ऽ ई ऽ
कोणता करू शिणगार सांगा तरी का ऽ ही !'
विलक्षण लयकारी लाभलेल्या कविने मुक्तछंदही भरपूर लिहिला आहे. 'प्रार्थना दयाघना' मुक्तछंदात आहे आणि 'तिची कहाणी' सुध्दा. महानोंराच्या कवितेचे असे अनेक विविध पैलू आहेत. मराठी साहित्यविश्वात ते 'रानकवी' म्हणून ते प्रसिद्ध आहेत. १९७८ साली ते महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सदस्य झाले. भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार, इ.स.१९९१ कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, इ.स. २००९ साहित्य अकादमी पुरस्कार, तर इ.स. २००० - 'पानझड' या काव्यसंग्रहास तर ना.धों महानोर आणि त्यांच्या पत्नी सुलोचना यांना यशवंत-वेणू पुरस्कार (२०१७) मधे मिळाला. तसेच मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इतकेच नाही तर २४ मार्च २०१४ रोजी सुरू झालेल्या दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तीन दिवस चालणार्या विचारमंथनातून साहित्यप्रतिभेला नवी दिशा निश्चित मिळू शकणार आहे. व या अनुषंगाने ना.धों.महानोर यांची संमेलन उद्घाटक म्हणून झालेली निवड व त्यांचे विचार ऐकायला मिळणं ही आपल्या साहित्य रसिकासांठी एक अद्भुत साहित्यिक मेजवाणी असणार आहे.
तनुजा ढेरे







