मनमोहक शिशिर
हेमंत ऋतूच्या शेवटी, वसंत ऋतुच्या उंबरठ्यावर उभा असा हा शिशिर ऋतु मनोहर, मनोरम मनाला सुखावणारा खरंतर हेमंत ऋतुतलं धुकं धूसर धूसर होताना, बोचर्या थंडीची पावलं हळवी होतं वातावरणातून लुप्त होवू लागतात. उन्हाची कोवळी लुसलुशीत मऊ पाऊले प्रखर होत सकाळी सकाळीच घरात शिरून घराचा ताबा घेतात. पानां फुलांचा बहर या सुगीच्या दिवसातला गंध हळुहळु कमी होऊ लागतो आणि मन हळवं होऊ लागते. निष्पर्ण अंगावर दाट मळभ चढलेल्या, सुस्तावलेल्या झाडांना पाहून मनवाटांना वेध लागतात ते वसंत ऋतूतील वसंतोत्सव साजरा करण्याचे.
खरंतर या हेमंतॠतुतील सुगीची ग्लानी अजून पापणीवरून उतरलेली नसतेही. मन अजून त्या सुखद गोड रसरशीत सृष्टीचैतन्यातून बाहेर आलेले नसतेच. परंतु या सृष्टीचा नियमच पहा आपल्याला कसं ओढून बांधून ठेवतो हा निसर्ग आपल्या बाहुपाशात. की त्याचं बहरात आलेलं सौंदर्य अन् तो साज उतरवतानाचं नदीच्या, तलावाच्या अंतरंगात प्रतिबिंबित झालेलं निखळ असं सालस सौंदर्य आपल्याला आकर्षित करतं. जणू ते आपल्या आभाळमायेला आर्जव करत असतं आपल्या अंगातून हात बाहेर काढून पुन्हा मोहरण्याठी प्रेमाची पाखर कर, असंच म्हणत असतील का ही झाडं ?
शिशिरात ही झाडं जणू वर्षभर अंगावर जड झालेली मरगळ या ऋतूत झटकून टाकतात अन् नव्या उभारीने पुन्हा फुलण्यासाठी, नटण्या सवरण्यासाठी नववधूसारखी अंर्तमनातून तयारी करतात. खरंतर या हेमंत ऋतूतील निसर्ग सौंदर्य याप्रमाणेच या शिशिर ऋतुचंही एक वेगळंच सौंदर्य आहे. या दिवसात पानां फुलांचा रंग पिवळसर तांबूस फिक्कट पडून, पानं गळायला लागतात. झाडांच्या फांद्या, निष्पर्ण होऊ लागतात. दाट हिरवे गर्द डोंगर हळुहळु सोनेरी भुरकट रंगाचा पदर अंगावर ओढू लागतात. अन् दूरवर पसरलेली माळरानं मुकाट नजरेने हे बदलणारे रंग आपल्या डोळ्यात भरून घेतात. जंगलातील, डोंगर रानातील, नदीकाठावर जाणाऱ्या पाऊलवाटांवर ताबा मिळवून बसलेली हिरवीगर्द झाडांची वाडीवस्ती. आता हळुहळु आपली जागा सोडून या पाऊलवाटांची वाट मोकळी करू लागतात अन् इतक्या दिवसांचा गोड सहवास या पाऊलवाटा या वियोगाने खरंच किती शांत व निरव वाटतात. पाखरं झाडांची मिठी सोडून मोकळी नदिकाठची वाट पकडतात अन् निष्पर्ण झालेली झाडं पुन्हा उमलण्याची वाट पहात उगवत्या सूर्यादयाकडे अन् मावळत्या सूर्यास्ताकडे पहात डोळ्यांनी ते रंग पिऊन घेतात. पुन्हा अंगावर फुटणाऱ्या पालवीत, फुला पानांतून बहरण्यासाठी.
अन् मग काही ठिकाणी एक वेगळंच दृश्य पाह्यला मिळतं. काही झाडांवर पर्णसंभार कमी सर्वत्र फुलंच लगडलेली झाडांना तो जांभळ्या, केशरी फुलांचा साज अंगावर चढवून ती कमनीय झाडं नवयौवनासारखी वयात आल्याप्रमाणे डौलदार डुलत असतात. अन् उगाचच इतर झाडांना चिडवत असतात का ? तसं मी काहीही विचार करते. असं का करतील ही झाडं उलट या दिवसात आजूबाजूच्या निष्पर्ण झालेल्या पाऊलवाटांना, झाडांना त्या मखमली सोनेरी उद्याच्या दिवसाची आठवण करून देत असतील. अन् अंगावरून झडलेल्या आठवणींची मोहर अंतरंगात पेरून, जीवन जगण्याची आशा सुगंधीत करुन नवचैतन्य रुजवण्याची पुन्हा नव्याने फुलण्याची, बहरण्याची उभारी देत नसतील कशा वरून. खरंतर या ऋतुतला मंद हळवा वाऱ्याचा नूर, मनात हळवा कातर भाव विणतो. चंद्राचं रेखीव प्रतिबिंब डोळ्यात भरून घेताना चांदण्यांनी भरलेला तलाव अन् त्यात खेळणारा चंद्र पाहिला की मन तासनतास रमतं. आता हे चित्र तसं फारसं पाह्यला वेळ नाही वा तसा निवांतपणाही नाही आपल्याकडे. पण पुर्वी असं दृश्य आपसूकच दिसायचं. वर आकाशात पाहिलं की चांदण्यांनी भरलेलं आभाळ डोळ्यात मावायचं नाही. अन् उराशी बाळगलेली मूठभर स्वप्नं त्या चांदण्यां मोजताना, डोळ्यांनी खुडताना साखरझोपेतच पहाटेच्या गारव्यात सुगंध पेरून जायच्या. मधाळ असा पहाटगारवा अवतीभवती शिशिरातल्या त्या दिवसांतही मग रंग भरायचा, अन् उगवतीच्या किरणांत मिसळून जायचा. पुन्हा विलग न होण्यासाठी कायमचा. शिशिरमय होऊन.
-तनुजा ढेरे
दैं संंचार सोलापूर प्रकाशित
No comments:
Post a Comment