हेमंत ऋतु
ऋतू कुस बदलतानाचा ऋतुचा उत्सव खरंच पाहण्यासारखा असतो अगदी नयनरम्य. तुम्ही कधी बारीक नजरेनं टिपलीय का हो हा निसर्ग कूस बदलतानाची छटा. अगदी बारकाईने पाहिले ना तर तुम्हाला सुध्दा जाणवतील बारीक बारीक या ऋतुरंगाचा बदलत्या छटा. आता हेच पाहा ना लांबचे कशाला. नुकताच पाऊस थांबलाय. अपवाद यावर्षीचा पाऊस अधूनमधून ढगातून वाट काढत जमीनीवर झेपावतच आहे. मात्र या पावसाची पावलं आता धिमी झाली आहेत. नदीकाठ, तलाव, धरणं यावर्षी तुडूंब भरून वाहात आहेत. नदीकाठ, रस्ते, घाटमाथा आणि डोंगरवाटा हिरव्याकंच बहरून आल्या आहेत. आणि हिरवाईवर फुलं आणि फुलपाखरं आनंदाने डुलतात.
आता हा हेमंत ऋतु पाहा ना आषाढ-श्रावण महिना संपत आला की आकाशातील काळ्या ढगांचे सावट दूर होते, हवा मोकळी स्वच्छ आणि शांत शीतल, पावसाची हिरवीगार पाऊल सर्वत्र उगवलेली, दाट धुक्याची चादर पांघरून चमचमत सकाळच्या कोवळ्या उन्हात ही डोंगर घाटातील, नदीकाठची झाडं उभी राहतात हिरवीकंच, या दिवसात वरचेवर खुलत जाणारं निळं शुभ्र आकाशकाळ्या कापसाच्या बोंडातून कापूस बाहेर पडावा तसा ढगांचा पांढरा शुभ्र फुलोरा बाहेर पडतो आणि मनातली काजळीची जळमटं दूर व्हावीत अन् उन्हाची सुखलोलुप लोलकं उठून दिसावीत तसं अंगाखांद्यावर खेळणारी ही उन्हं उठून दिसू लागतात.
खरंतर धुकं म्हटलं की मनात दाटायला लागते ती पांढरी शुभ्र मखमली, रेशमी पसरलेली धुई. या धुक्याच्या दिवसात. कधी लवकर उजाडतं. तर कधी उशीरा. काळोंखात शुभ्र धुक्याची दुलई घट्ट पांघरून निजलेली झाडं. पहाटेला उजाडताना पाखरांच्या चिवचिवाटाने जागी झालेली हिरवी डोंगर रानं. किलकिल्या नजरेने घरट्याची दारं उघडून, हिरव्या पानांतून डोकावून पाहणारी, पंख फडफडवणारी ही पाखरं, मानेवरचा आळस झटकून भुर्रकन एक उंच भरारी मारून परत आपल्या जागेवर येऊन बसणारी पाहिली, की किती ताजंतवानं वाटतं ! झाडातून उडताना धुक्यात चिंब भिजलेली ही पाखरं... पंख फडफडवत, अंग आखडून चिवचिवाट करत, सकाळच्या कोवळ्या उन्हाची वाट पाहत, सूर्योदय कधी होतो याचा विचार करत, एकटक नजर लावून बसलेली दारात, खिडकीत, अंगणात, कौलांवर मोठ्या डौलात. किती मनोरम्य दिसतं ना हे सगळं पहाटेचं चित्र ! कौलावर पाखरांची सकाळी सकाळी भरलेली शाळा एका रांगेत बसलेले सगळे पक्षी पाहून किती अदब आणि शिस्त आहे या पाखरांच्या वागण्यात असं वाटतं. मग एकामागून एक असे संथपणे पंख पसरून उडत वेगवेगळ्या कवायती करणारी ही पाखरं आणि त्यांची पहाटेची लगबग, चिवचिवाट पाहण्यात वेळ कसा निघून जातो कळतही नाही.
काळोखातून उजाडतानाचा सर्वत्र ओल्या मातीचा दरवळणारा सुगंध निराळाच असतो, नाही ? सर्वत्र धुकं पसरलेलं, पहाटेच्या गारव्यात दवाचे टपोरे थेंब पानापानात निवांत पहुडलेले. पावसाच्या रिमझिम सरी येऊन गेलेल्या. चिंब भिजलेली पाऊलवाट रानावनाची...इकडून तिकडे भिरभिरणारी पाखरं. उभी डोंगराची गावं आणि पायथ्याशी नागमोडी विळखा घालून, घट्ट बिलगून अगदी शांतपणे डोळे मिटून अंग आखडून घेतलेलं नदीतलं निळं निळं पाणी शुभ्र निळाई पांघरून उन्हाच्या कोवळ्या स्पर्शानं थरथरू लागतं. मनातल्या मनात गुणगुणू लागतं. ऊन पडण्यापूर्वी पसरलेलं नदीकाठचं धुकं आणि ऊन येताच चमचमू लागणारा आरस्पानी नदीचा काठ दोन्ही दृश्य तितकीच विलोभनीय वाटतात आणि हे दृश्य पाहून पाय अलगद नदीच्या पाण्यात सोडावे असं वाटलं तरी सोडवत नाहीत. गारठलेल्या पाण्याच्या स्पर्शानं अंगावर काटा आलेला... आतलं हृदयाचं पान गारठलेलं देखील आतल्या गारठून जातं तर उन्हाच्या कोवळ्या स्पर्शानं हृदय पान सळसळतं.
मग जादुगाराने आपल्या खिशातली जादूची काठी अलगद बाहेर काढावी आणि फिरवावी... ओठांतून काहीतरी मंत्र पुटपुटावे व अलगद फुंकर मारावी. समोरच्या निसर्गावर तसं सगळं चित्र गूढ हरवलेलं. हळुहळू पुन्हा डोळ्यांसमोर उभं राहतं. उन्हाची कोवळी पावलं अंगणात खेळू लागतात. दुडूदुडू धावू लागतात. आणि चमचमणारे चंदेरी सोनेरी भिंगाचे लोलक दारात, खिडक्यांवर पाहाता पाहाता तोरण बांधू लागतात .या कोवळ्या कवडश्याच्या स्पर्शानं सगळं घर हसायला अन् बोलायला लागतं. खरंच, पावसाच्या सरी येऊन गेल्यानंतर या धरेचं रूप किती गोजिरं आणि सुंदर दिसतं, नाही ? शुभ्र धुक्याची दुलई पांघरून निजलेली झाडं. उन्हाच्या कोवळ्या स्पर्शानं जेव्हा सळसळायला लागतात तेव्हा खरंच पावसाच्या सरींत न्हाऊन माखून उभी झाडं आणि आजुबाजूची सृष्टी किती गोंडस दिसायला लागते ! अगदी नुकतंच झोपेतून जागं झालेलं बाळ. जणू, आईने सर्व अंगाला तेल लावून, माखून चंदन उटणं लावून न्हाऊ माखू घातल्याप्रमाणे ही झाडं, वेली, फुलं अगदी खुलून दिसतात. हसू लागतात. लहान बाळाला बारीक पानांफुलांचा नक्षीदार अंगरखा घातल्याप्रमाणे या हिरव्या पानाफुलांच्या नक्षीदार अंगरख्यातल्यी धरा किती टवटवीत आणि प्रफुल्लित दिसते, नाही ? ढगांच्या डोळ्यांतलं नाजूकसं काजळ आणि निळ्या भाळावरची नाजूकशी चंद्रकोर... ही मनाला खूप भावते.
चंदेरी धुक्याच्या रेशमी पावसात बुडालेले हिरवे, सोनेरी भुरकट डोंगर. शुभ्र निळसर पावसातल्या धुक्याची वाट चालताना मन पहाटेच्या वेळीच कातर होतं. तो शुभ्र रेशमी पाऊस मंथरलेला कानात रूंजी घालणारा. सगळीकडे पसरलेली धूसरशी शुभ्र निळाई जणू धरेवर स्वर्ग अवतरल्यासारखं वाटतं. हिरव्या पानांची गुलाबी सैलसर सळसळ पानापानातली मनाला मोहनी घालते. उजाडतानाची रानपाखरांची गोड किलबिल कानाला सुखवाते. निळ्या निळ्या आकाशात डोलणारी ढगांची शुभ्र झाडं. या निळ्याशुभ्र सळसळणाऱ्या ढगांच्या झाडांच्या पालवीतून उडणारे राघू, रान पाखरांचे थवेच्या थवे. मनातल्या मनात गिरक्या घेत, चिवचिवताना, मन त्या राघू-पाखरांच्या मागे धावते. ते थवे नजरेआड होईपर्यंत. तोपर्यंत पूर्वेस उगवणारा, निळ्या निळ्या निळाईतून वर येणारा सूर्याचा लाल तांबूस गोळा अंतरंगात वर वर येताना गडद गडद होत जाताना केशर रंगात बुडताना मनात भावभावनांचे हिंदोळे हेलकावे घेत असताना, श्वास मोहरलेला मातीच्या कस्तुरी सुगंधांत न्हाताना, जीवाची होणारी तगमग...वाढतच जाते? सकाळच्या टपोऱ्या दवाच्या थेंबाची चमचम थरथरणारऱ्या पाकळ्यात, फुलांत, पानात खुलून दिसते अन् क्षणात एखादी सुखाची आरोळी ऐकू यावी तसं मन निळ्या डोहात खळळणाऱ्या अंतरंगात सामावून जातं. झाडांच्या भरभक्कम बाहुत मनमोकळं व्हावं. उन्हाचे कोवळे कवडसे मंथरलेले पांघरून डोळे गच्च मिटून हिरव्या पापण्यांच्या सावलीत पडून राहावं तासनतास. भरदुपारची निरव शांतता लपेटून. एकांतात सावल्या बनून जावं. भर दुपारच्या अंगणातल्या कृष्ण वर्णीय सावल्या वेचाव्यात. नव्हे आपण त्या अंगणात खेळणाऱ्या सावल्यांच्या प्रेमातच पडलेय असं सतत वाटत राहातं ? माहीत नाही कसली अनोखी जादू करतात या सावल्या.
सांज कातर होताना... संधीप्रकाशात लख्ख वितळून जावा सांजदेह तसं तसं गडद गडद होताना अंधार. वितळून जावेत श्वास आसंमतात. लख्खं चांदणं बनून फुलावं अंगणात आणि पापण्या मिटताच पहाटेच्या धूसर निळाई बरोबर विरघळून जावं दाट धुक्याची शुभ्र मखमली दुलई पांघरून श्वासात. पहाटेचं हे निळंशार धुकं पाहता पाहता विरघळूनच जातो आपण स्वप्नांच्या अवकाशात. पण खरंच या पहाटेच्या धुक्यात स्वत:चं अस्तित्व विसरून चालताना किती आनंदी आल्हाददायक वाटतं ना ! क्षणभराचं हे सुख सगळ्या जगाला विसरून या सुखद अनुभूतीत रममाण होण्याचं किती महत्त्वाचं आहे ना ! जगण्याची उर्मी देतात हे क्षण. पण हे सगळं जगण्यासाठी संवेदनशील मन हवं. या ऋतूच्या पाऊलवाटेवर चालताना.
सांज पाऊल वाटेवर चालताना अशी गुलाबी स्वप्ने पापण्यात, झाडांच्या फांद्यानी अंग आखडून घेतलेले. दुतर्फा हिरवे रान सांजधुक्यात बुडालेले. मातीला फुटलेला सांज होत जातानाचा रात्रीच्या हिरवाईचा सुगंध, सांज गडद गडद होत जाताना नदीही भावूक वाटते. सूर्यास्ताची वेळ. दूरवर पसरलेलं सोनसळी माळरान वाऱ्यावर गात आहे असं भासतं. सूर्याने डोंगराआड जाता जाता हिरव्या रानावर सगळीकडे अंथरलेल्या सावल्या. सोनेरी भुरकट माळरान सळसळणारं, नदीकाठावर कुठेतरी हिरवाई, नदीकाठचं पाणगवत, नदीतील झाडं, नदीच्या डोहात विहारणारी पांढरी शुभ्र बदकांची जोडी दूर दुसऱ्या काठावर किती सुंदर दिसते. डोईवरती आभाळ तांबडं-गुलाबी रंगलेलं. निळा गारवा. कातर होत जाणारी सांजवेळ. गुलाबी आकाशात मुक्त उडणारी बगळ्यांची माळ. नदीच्या डोहात खेळत्या मावळतीच्या छटा. दूर दुसऱ्या काठावरच्या झाडांच्या पाण्यात पडलेल्या गडद हिरव्या सावल्या आणि शिळा स्तब्ध: पाहून मन गहिवरुन येतं. नदीच्या काठावर एकांती उभं राहून. एकटक त्या नदीच्या निळ्या संथ लहरणाऱ्या लाटांकडे पाहात वेळ कसा निघून जातो कळतही नाही. सांज गडद गडद होत जाताना आभाळ चांदण्यानं भरलेलं नदीच्या निळ्या डोहात उतरतं... आणि चांदणं फुलांनी बहरलेला डोह चमचमणारा खळखळून हसायला लागतो.
उन्हाच्या कोवळ्या स्पर्शासरशी मन अलगद डोळ्यांच्या पापण्या घट्ट मिटून घेतं. पापण्या मिटताच डोळ्यांत समोर चित्र उभं राहतं...सगळं कसं लख्ख लखलखीत पुसलेल्या आरशासारखं... रस्ते, इमारती, नदीकाठची पाऊलवाट, बागबगीचे पुन्हा एकदा अंगावरची धूळ झटकून कामाला लागल्यासारखे उत्साही दिसतात. असा बेमौसमी पडलेला पाऊस. आलेलं चक्रीवादळ व त्यामुळे वाढवलेला गारवा, धुक्यात मंथरलेला, हवा गुलाबी सर्द... आणि डोळे उघडताच आजुबाजूला वाहनांची, माणसांची तुरळक वर्दळ... पाव, अंडी, नानकटाई विकणाऱ्या मामाच्या सायकलींची ट्रिंग ऽ ट्रिंग ऽ बेल... रिक्षांचा ढुर्रम ढुर्रम आवाज... कधी तरी बासरीचे सुमधूर आवाज, वासुदेवाचे वासुदेव आला हो ऽ वासुदेव आला हे बोल कानावर येतात. तेव्हा मनपाऊल आपसूकच दरवाजाकडे वळतं अजूनही. कावळ्यांची काव ऽ काव ऽ, राघू पाखरांचा चिवचिवाट, खिडकीत कबुतरांची गुटरगू ऽ ऽ गुटरगू आणि चमचमणारं चमचम ऊन, आपला दिवस चालू झाला आहे. चला, स्वप्नांच्या जादुई दुनियेतून बाहेर या आता असं सतत सांगत राहतं. तेव्हा आपण आपले राहत नाही. ..ती ट्रिंग ट्रिंग... ती चिवचिव... चमचमणारं ऊन बनून आपण आपल्या कामात कधीच मग्न झालेलो असतो.
तनुजा ढेरे

No comments:
Post a Comment