Tuesday, 26 February 2019

International schools becomes more complicated


" इंटरनॅशनल स्कूलस म्हणजे पैसे भरून विकत घेतलेलं दुखणं."

"ये आई ऐकना चलना आम्हाला टिचर ने नविन प्रोजेक्ट दिलाय." आई ," काय परत नविन प्रोजेक्ट अगं गेल्या आठवडयात तर आपण चार कलर चार्ट पेपर, कलर पेन , डेकोरेटिव्ह इ.सगळं हजार रूपयाचं सामान घेतलं ना." आज परत नविन स्क्रॅब बुक परत प्रिन्टस काढायच्या हे जास्ती होतंय. असं कर टिचरलाच देत जा म्हणावं ना प्रोजेक्ट बरोबर सगळं साहित्य. आणि प्रोजेक्ट झाल्यावर परत काय करता गं त्या सगळ्याचं ढुंकून ही पाहात नाही त्याकडे. " ये मम्मा असं काय गं करते तो प्रोजेक्ट हिस्ट्रीचा होता.हा जाॅग्रफीचा आहे .तुला यातलं नाही गं समजणार जाऊ दे. चल बरं आत्ताच्या आता सामान हवंय.' 

" हे बघ मी येते पण जेवढं लागेल तेवढंच साहित्य घे. आणि साहित्य घेऊन झाल्यावर त्याबरोबर क्लिपस, पिना नविन कंपास बाॅक्स गेम काही मागायचं नाही.ना त्या दुकान दारासमोर दुकानात हट्ट करायचा. आणि पाच ते दहा मिनिटात पटकन सगळं साहित्य घ्यायचं लक्ष्यात आलं. नाहीतर अर्धा एक तास लागतो. प्रिन्ट ऑऊट सामान घ्यायला.मला बाकीचं ही खूप लिहायचं असतं आणि खूप काम ही आहे घरी." हो गं चल आता. मॅडम चं नेहमी ठरल्याप्रमाणे हजारच्या ऐवजी पाचशे रूपयात काम होतं. पण मागे कुरकुर असतेच." मम्मा हे घेना ते हवंय."पण आज ठरवलेलं असतं दुसरं काही नाही .मी ठाम निर्णयावर.अर्ध्या तासात घरी परत. मी मनातल्या मनात खुश अर्धा तास बडबड केली पाचशे रूपये वाचले.

सांगायचा उद्देश्य हाच की काय हे आजची शिक्षण पध्दती. एक वहया पुस्तकाचा संच घ्यायचा तर सहा ते सात हजार रूपये लागतात. इयत्ता सहावी काय अन पहिली काय. युनिफाॅर्म ही तसेच हजार रूपये एक सेट आणि चक्क या उच्च वर्गिय आई वडील चारचार पाचपाच सेट घेतात. शाळेतून सहल जाते ती कुठे दुबई ,ऑस्ट्रेलिया पन्नास हजार ते एक लाख खर्च काय म्हणायचं...काय बोलायची सोयच नाही.शाळेची फि वर्षाला एक एक लाख परत डोनेशन अॅडमिशन घेताना घेतलेले वेगळे.शाळेच्या वाहनासाठी पंधरा ते वीस हजार भरायचे वर्षाचे.सगळंच अॅडव्हान्स. बरं एवढं असुनही शाळेतले रिझल्ट समाधानकारक असावेत तसं ही नाही.मग काय उपयोग.पॅरेन्टस मिटींग मधे उपदेशाचे ढोस देतात. काय तर तुम्ही मुलांकडे लक्ष दया घरून करून घ्या..म्हणजे टयुशन आली.टयुशनचे दर तासावरून ठरतात .तिथे ही फुल्ल पैसे वसुल करण्याचा धंदा.मग शेवटी आपणच शिकवा मुलांना हाच योग्य पर्याय व मार्ग शेवटी आपल्या मुलाची प्रगती महत्वाची.

तर मग शिकवायला घेतलं तर काय सगळं डोक्यावरून जातं. जो या मुलांना पहिली दुसरीला अभ्यासक्रम आहे तो मला पाचवीला होता..धड नीट अक्षरओळख नाही अश्या मुलांना शाॅर्ट स्टोरीज आणि काय काय तो अभ्यास..' आय सी एस सी बोर्ड ..पेक्षा मला तर स्टेट बोर्डच आवडतं.पण आता याचं म्हणणं  हे बघ उगाच त्रागा नको असच चालावं लागणार व असणार एकदम फास्ट त्याला पर्याय नाही..' कारण सगळं जग फास्ट चाललंय पुढं मुलांनी नको म्हणायला व आपल्याला नको वाटायला आपण नाही प्रयत्न केले बेस्ट देण्याचे...' आजकाल मुलांना एवढं अभ्यासाचं आणि होमवर्क चं टेन्शन नसतं तेवढं या आया डोक्यावर घेतात घर.मुलांना शाळा आणि अभ्यासातून श्वास घ्यायला जागा ही मिळत नाही. खेळायचं कधी या मुलांनी हा प्रश्न मला सारखा पडतो.

मला तर या १०० % मार्क मिळालेल्या मुलाचं कौतुक वाटतं. पण याबरोबरच ९५ % ९४ टक्के  मिळालेल्या मुलांना हव्या त्या शाखेत आपल्या मनासारख्या ठिकाणी अॅडमिशन नाही मिळत याचं वाईट वाटतं. एवढं अभ्यास  करून काय उपयोग.खरंतर अभ्यास मार्क्स या बरोबर मुलांचा सर्वांगीण व्यक्तीमत्व विकास महत्वाचा.आम्हाला तर आठवंतय असं कोणीच ओझं लादलं नाही .अभ्यासचं ना नव्हतं.तसं माझं लक्ष्य कधी नव्हतं अभ्यासात ही गोष्ट वेगळी. पण दोन शाळेचे ड्रेस , चप्पल कापडी पिशवी एक ते दोन डझन वहया सहा ते सात पुस्तकं..आणि वर्गशिक्षक जे काही शिकवतील ते एवढंच पण हसत खेळत शिकलो शाळा. खेळाचे, संगिताचे तास, वार्षिक संमेलनं ,सहली सगळं खूप एन्जाॅय केलं. पण आई वडीलांना कधी या गोष्टीचं टेन्शन घेताना नव्हतं पाहीलं. आजकाल आईवडीलांनाच गरज आहे मुलांना शिकवण्याची शाळा असंच एकंदर वातावरण ,मुलांना सारखं म्हणावं लागतं चला ऊठा शाळेत जा होमवर्क करा.आम्ही तर आमचं आम्हीच करायचो अभ्यास. तात्पर्य एवढंच सांगायचंय की हे ओझं विनाकारण शिक्षण पध्दतीचं वाढत चाललंय याला कारणीभूत ....आपण आहोत वाटायला लागलंय कारण आपण नाही नाही म्हणतो आणि एवढी फी भरतोच...हे या शाळांना ही बरोबर माहीती झालंय का ?... विचार तर नक्कीच करायला हवा...पैसे देऊन विकतंच दुखणं आहेत या महागडया शाळा.

सौ. तनुजा ढेरे

माय मराठीचा गोडवा न्याराच - मराठी भाषा दिनानिमित्त लेख

माय मराठीचा गोडवा न्याराच


होय, न्याराच ! मी मराठी आहे व माझी माय असलेल्या मराठी भाषेचा मला अभिमान आहे. मराठी भाषा आणि तिचा गोडवा हा वेगळाच आहे त्यातल्या त्यात ग्रामीण बोली भाषेची तर चवच न्यारी, घाटावरची रांगडी मराठी भाषा, पुण्याची सदाशिव पेठीय अस्सल पुणेरी भाषा, मुंबईची तर बातच न्यारी अर्धी मराठी अर्धी हिंदी. “कांदा कैसा किलो रे बाबा.” मालवणी, आगरी, अशा अनेक बोली भाषांचा प्रभाव असलेली मुंबईची मराठी, नागपूरची वऱ्हाडी अगदी संत्रा बर्फीसारखी, कोल्हापूरी लवंगी मिरचीच्या ठसक्यात बोलली जाणारी मराठी , सोलापूरी सुरातली, “काय बे काय चाललंय.” कानडी भाषेचा प्रभाव पडलेला जरासा, मराठी अन् मराठवाड्याची आपली मराठी भाषा, धड ग्रामीण ना शहरी यात मोडणारी निमशहरी मराठी... शंकर पाटील, द.मा. मिराजदार यांनी बरेचसे साहित्य या भाषेत लिहिलंय ग्रामीण कथा, कादंबऱ्याचा बाजच निराळा, त्यातली अस्सल मराठमोळी पात्र व त्याचं वर्णन वाचताना आपण इतके मग्न होतो की बस्सं. खरंतर बदलत्या काळानुसार भाषेचे स्वरूप बदलत आहे.


खरंतर आपल्या पायाला ठेच लागली की आपण आई ग म्हणतो, मोठा अपघात आपल्या डोळ्यादेखत घडला तर बाप रे म्हणतो, मात्र आपली मुलं मात्र मम्मा, डॅडा या शब्दांबरोबर मोठी होतायेत आई-बाबा हे शब्द विसरत चाललयेत हे का आपल्या लक्ष्यात येत नाहीये. इंग्रजी भाषा ही एक संवाद, संपर्क माध्यम भाषा म्हणून जास्त वापरात येत असताना निश्चितच ती महत्वाची आहे पण त्याबरोबर मराठी भाषेचे महत्व व दर्जा कमी होऊ लागलाय ही बाब आपल्यासाठी नक्कीच चांगली नाही. आय.सी.य.सी बोर्डच्या नावाखाली व इंग्रजी शाळेच्या वाढत्या स्तोमामुळे मराठी शाळा नामशेष होत चालल्या आहेत. पहिलं अंगणवाडी बालवाडीचं चित्र गावागावात शहरात पाहयला मिळायचं तर आता गल्ली बोळात आपल्याला किंडर गार्डन, प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनियर, सिनियरचे बोर्ड दिसतात, याला कारणीभूत आपणच आहोत. आपण आता मुलाला अ अ...आई, ब...ब बाबा, म...म मराठी, शिकवायचं विसरतच चाललोय. आपण काय शिकवतो...A...for appple, B ...for ball, M...for mummy, D...daddy... असं आपण शिकवतो यात वाईट काहीच नाही पण त्यामुळे आपल्या मातृभाषेशी आपल्या मुलांची नाळ जोडलेली आपसूकच तुटून पडत आहे. त्यांना मराठी भाषेबद्दल गोडी, आपुलकी वाटत नाही. शाळेत गेल्यापासून इंग्रजी भाषा पहिली भाषा म्हणून शिकवल्यामुळे मराठी भाषा त्यांना आपसुकच क्लिष्ट वाटायला लागते. खरंतर बालवयातच मराठीची गोडी मुलांना लागली तर बालगीते, बालकथा बालकविता व बालसाहित्य वाचनाची गोडी लागेल व ती शेवटपर्यंत जपली जाईल. पुढे त्यांनी इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतलं तरी मराठी भाषेशी नाळ जोडलेली असल्यामुळे पुढीलकाळात त्याचं मायमराठीशी असलेलं नातं अतूट राहील.


मराठी भाषेचा इतिहास, त्याची व्याप्ती व महती ही फार थोर आहे. संताची वाड:मयीन परंपरा लाभलेली आपली ही संस्कृती आपणच तिचं मुल्य जपलं पाहिजे. अभंग, ओव्या, भारूड, पोवाडे, लावण्या, भक्तिगीत, भावगीतांची,जोड असलेली संत तुकाराम, संत रामदास, संत ज्ञानेश्वरांपासून, छत्रपती शिवाजी महारांजाचं छत्र लाभलेली ही मराठी, मराठी साहित्याची दिंडी आपल्या खांद्यावर घेऊन प्रवास करत आलेले, व करत असलेले साहित्यिक यात संत कविपासून, बा.भ.बोरकर, बालकवीपासून, पु.ल देशपांडे. व.पु.काळे, शांताबाई शेळके, मंगेश पाडगावकर पासून ते आतापर्यंतचे कवी याचं कार्य पाहिले तर अगाध साहित्य वाड:मयीन परंपरा आपल्याला लाभली आहे. मराठी ग्रंथ, साहित्य परंपरा जपतानाच, रोजच्या जगण्यात, बोलण्यात येणारे मराठी शब्द, मराठी ऋतू, मराठी महिने, मराठी वार, मराठी संस्कृती, सण व परंपरा, मराठी अनुषंगाने महाराष्ट्रायीन लोंकाच्या सांस्कृतीक व सर्वच कलावारसाचं जतन करणं व त्यासाठी मुळात मराठी भाषा जपणं गरजेचं आहे. कवी सुरेश भट्ट यांनी अतिशय समर्पक शब्दात मायमराठीचा अभिमान वर्णन करणारं गीत लिहिलं आहे.


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी


विष्णू वामन शिरवकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. त्यांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. शिरवाडकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांच़ा जन्मदिवस 'राजभाषा दिन'म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. तर चला मग यांच्या या जन्मदिनी आपण वसा घेऊया माय मराठीचा आदर करून तिचा वापर योग्य पध्दतीने जास्तीत जास्त रोजच्या जगण्यात, बोलण्यात करूया आपल्या मुलांना आपल्या मातृभाषेतून बोलता, वाचता, लिहितां आलं पाहिजे यासाठी आपणच आग्रह धरूया.


तनुजा ढेरे

Wednesday, 20 February 2019

सोसेल इतकेच सोशल व्हावं...

सोसेल इतकंच सोशल व्हावं


एक वेळ जेवायला नसेल तर चालेल पण मोबाईलला नेटवर्क हवंच नाहीतर घशाखाली घास उतरत नाही आजकाल आमच्या की झोप येत नाही. इतकी चलबिचल अशी अवस्था झालीय  आपली. खरंच सोशल मिडियाच्या या जमान्यात फेसबुक, व्हाटसअप, इन्सटाग्राम या सोशल ॲप्सनी शहरी भागातील लोंकाना नव्हे तर ग्रामीण भागातील लोंकानाही आता तितकंच वेड लावलंय. स्टेटस अपडेट, स्टेटस, तुमच्या मनात काय आहे शेअर करा फोटो, व्हिडिओ, लाईव्ह एक नाही अनेक मार्ग उपलब्ध करून देऊन या माध्यमानी लहानमुलांपासून ते मुलमुली तरुणवर्ग, स्त्रिया, मुलं यांना अक्षरशः वेड लावले आहे. ही प्रसार माध्यमे हाताळताना या लोंकाना काळवेळ याचंही भानही राहत नाही. तासनतास यात आजची तरुणपिढी अडकून पडत आहे. एकिकडे ही माध्यमं प्रसारमाध्यमं म्हणून उपयोगी पडत आहेत तर दुसरीकडे अतीवापरामुळे याचे दुष्परिणामही आपणास भोगावे लागत आहेत. कुठल्याही चांगल्या वाईट गोष्टीचा अतिरेक व त्यातून टोकाची भूमिका वाईटच. 

एखाद्याला त्याच्या पर्सनल गोष्टीवरून ट्रोल करणं. त्याचं खाजगी जीवन चव्हाट्यावर मांडून उगाचच काहीही माहीत नसताना विषय चघळत बसणं. एखाद्याच्या हातातून चूक घडलीही असेल मात्र ती का घडली ? का नाही ? हे जाणून न घेता उगाचच ती गोष्ट व्हायरल करणं. या गोष्टी खरंच सामाजिक जाणिवा भान जपणाऱ्या आहेत का ? याचा विचार आपणच करायला हवा. आहे वेळ म्हणून चला लिहू काहीतरी मनातलं असं म्हणून जे मनात येईल ते सरळ सरळ लिहून टाकावं इतकं सोपं नाहीये हे जीवन.

आपण  आपल्या खाजगी जीवनातले उठल्यापासून झोपण्यापर्यंतचे बारीक सारीक अपडेटस आपल्या मित्रमैत्रणींना देत असतो. आणि मग ते कोणी पाह्यले कोणी नाही, किती लाईक आले हे पाहण्यात सतत मग्न राहतो. रात्री अपरात्री  झोपेपर्यंत आपण सतत बेचैन असतो. मग अपुरी झोप. उगाचच स्पर्धेचा ताण, वैयक्तीक हेवेदावे, विनाकारण आरोप- प्रत्यारोप या गोष्टीमधे मन गुरफटून जातं. यात आपलं ध्येय... वाटचाल याकडे दुर्लक्ष्य होतं मग चिडचिड, घरातला ताण वाढतो. उशिरा झोपणं, उशिरा उठणं यामुळे सकाळी अर्धवट झोपेमुळे अळसावलेलं अंग अपुऱ्या आरामामुळे आजारी असल्यासारखं वाटतं. दिवसभर मग उगाचच कंटाळवाणं वाटणं कामात लक्ष न लागणं. उगाचच मग मोबाईल स्क्राॅल करत सतत चाळत राहणं. ही सवय एक चाळाच होऊन बसते. यामुळे आपल्या वैयक्तीक कामावर परिणाम होतो.

खरंतर या सर्व गोष्टीचं, वेळाचं नियोजन केलं तर आपण या माध्यमांचा चांगला व योग्य कामासाठी आपले विचार व कार्य यांचा योग्य प्रसार करण्यासाठी उत्तमरितीने करू शकतो. मात्र किती वैयक्तीक राहयचं व किती सोशल हे आपण आपले ठरवयाची वेळ आलीये. कारण आपल्या वैयक्तीक माहितीच्या आधारे आपल्या कुंटूंबातील व्यक्तींना वा आपल्याला त्रास होऊ शकतो. आपण मोठे सतत मोबाईल व काम यात बिझी राहतो. आपण मोठी मंडळी मोबाईलमधे गर्क राह्यलो की आपल्या मुलांनाही आयती संधी मिळते तेही मग याचा फायदा उठवून आई-बाबा, काका, मामा कुणाचं लक्ष नाहीये चला म्हणत तासनतास आयपॅड वर गेम, टि.व्ही वर कार्टून पाहत राहतात. यु ट्यूब वर व्हिडिओ पाहतात... मी माझ्या मुलांना सहज एक प्रश्न केला की तुम्ही नक्की काय पाहता ? काय शिकता ? यातून काही जनरल नाॅलेज ? माझी मुलगी म्हणाली, " अगं आई जस्ट टाईमपास असतं हे. "  पाह्यचं अन् सोडून द्यायचं. अगं पण वेळ किती जातो यामधे. परिक्षेत उपयोगी पडत नाही. ध्येय ठरवत नाही. ना कसली मदत ना परिक्षेत नापास झाली तर हे कामाला येतं का ? याचं उत्तर नाही. ही प्रसारमाध्यमं चॅनलस युट्युब सारखी खरंतर खूप छान मार्गदर्शकही आहेत यावर अनेक शैक्षणिक व लहानमुलांसाठी उपलब्ध माहितीपर व्हिडीओ आहेत पण हे पाहण्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे. या तुलनेत गेम व कार्टून व्हिडिओ पाहण्याचं प्रमाण जास्त. तसेच हे व्हिडिओ व गेम खेळताना हिंसक पार्श्वभूमी असलेले गेम्स, तसेच अश्शिल व्हिडिओस ही अधूनमधून डोकावतात असतात. मुलांची लक्ष वेधून घेणारी नजर हे लगेच टिपते. ज्या वयात  चांगले बालसंस्कार व मुल्ये यांची ओळख व्हावी असे वाटणारा आपला पालकांचा वर्ग बदलती संस्कृती, बदलता जमाना याच्या नावाखाली का संवेदनाहीन बनत चाललाय समजत नाही. मुलांना वाचनाची गोडी लावून. त्यांना विविध मैदानी खेळ घरगुती कामं, विविध छंद, चित्रकला, नृत्य, संगीत यात का रमवत नाही हेच कळत नाही. नको ती कटकट म्हणून बालकांच्या काय तरुण मुलांच्या हातात मोबाईल वा आयपॅड दयायचे अन् आपण आपले काम करत राहयचे. ही पळवाट खरंच आपल्यासाठी व आपल्या मुलांसाठी खूप धोकादायक होऊ शकते.

जर वेळीच उपाय न करता यावर नियंत्रण आणले नाहीतर. आजच्या पिढीचं भवितव्य हे डिजीटल तंत्रज्ञानावर अवंलबून असलं तरी एक माणूस म्हणून घडवताना समाजाचा एक जबाबदार नागरिक घडवताना संयम, प्रेम, नैतिकता, चांगलं वाईट याची ओळख करून देणे ही पालकांची नव्हे तर समाजाचा एक घटक म्हणून आपल्या प्रत्येकाची एक जबाबदारी आहे की आपण सजगपणे ही माध्यमं हाताळायला हवी व याचा आनंद घ्यायला हवा नाहीतर अतीउत्साह निरूत्साही जीवनाचं कारण होऊन होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही.

लेखिका - तनुजा  ढेरे


Tuesday, 5 February 2019

कथा :- मायेचा शब्द


मायेचा शब्द

विकी पंचवीस तीस वर्षाचा हुशार मुलगा, अतिशय साधा सरळ तेरावी- चौदावी शिकलेला. तो सर्वांशी अतिशय प्रेमाने वागणारा. दिसायला बराच म्हणायचा. उंचापुरा जरासा सावळा, एका कंपनीत मॅनेजर म्हणून तो कामालाही लागला होता. घरीची परिस्थिती तशी चांगलीच म्हणायची वीस-पंचवीस एकर बागायती जमीन. गाडी, बंगला, फार्म हाऊस सगळं. चार भाऊ, दोन बहिणी असा परिवार. तो तसा जरा विक्षिप्तच होता. घराबाहेर इतरांशी तसं बरं वागायाचं पण नेहमी एकटा एकटा राहयचा. जास्ती कोणात मिसळायचा नाही. कामापुरतंच बोलायचा. त्याची स्वप्नं, त्याच्या ईच्छा आकांक्षा या खूप वेगळ्या म्हणण्यापेक्षा खूप मोठ्या होत्या. त्याचे तिन्ही मोठे भाऊ तसे स्थिरस्थावर झाले होते. सर्वात मोठे दोघे परदेशात होते. तर चार नंबर दिल्लीला शिकायला होता. हा तीन नंबरचा.

मात्र त्याचा एक खूप मोठा प्राॅब्लेम होता. तो आपल्या वडिलांशी दिनकररावांशी कधीच प्रेमाने बोलायचा नाही. नेहमी तो तिरकसच बोलायचा. त्यांचा तो इतका तिरस्कार करायचा की बस्सं त्याच्या वडिलांना पाहियलं की त्याची तळपायाची आग मस्तकात जायची. त्याचं अस्तित्वच त्यांना नकोसं वाटायचं. दिनकरावांनी आपल्या दोंन्ही मुलीची लग्न करून दिली होती. मोठ्या दोन मुलांचीही झाली होती. पण आपल्या चार मुलात सर्व संपत्ती अजून वाटून दिली नव्हती. चारीही मुलांना तसं वैयक्तीक काही कमी नव्हतं वा आर्थिक अस्थिरता ही नव्हती. मात्र आपला बाप कधी मरतोय अन् त्याच्या मढ्यावरचं लोणी कधी खायला मिळतंय याचीच ते वाट पाहात होते. कधी एकदा ईस्टेट अन् शेतीची वाटणी हातात येईल आणि ती विकून टाकून संपत्तीचे आपण धनी होऊ असे या भावडांना झाले होते. त्यांना त्यांच्या आईवडिलाचा थोडासाही हस्तक्षेप त्यांच्या जीवनात नको होता.

कारणही तसेच होते. दिनकरराव कधी आपल्या मुलांना प्रेमळ मनाने बोलायचेच नाहीत. त्याचं आपल्या मुलावर प्रेम खूप होतं. पण ते आत मनातच ठेवून कधी मनमोकळेपणानी मुलांशी बोललेच नाहीत. कडक, शिस्तप्रिय असे दिनकरराव होते. त्यांना नेहमी वाटायचं की आपल्या मुलांनी अमुक करावं तमूक करावं. त्यांच्या ईच्छा आकांक्षा या खूप वेगळ्या होत्या व त्या या काळातील मुलांना सहजासहजी पटणाऱ्या नव्हत्या हे कधी दिनकररावांनी जाणलंच नाही. त्यामुळे मुलं समोर आली की त्यांना बोल लावणे. त्यांच्या चुका काढणे व दाखवणे एवढंच काम दिनकरराव करायचे. कधी समजून घ्यायचा प्रयत्नच केला नाहीच त्यांनी मुलांना ना की कधी चांगले म्हटले. आता तिघे तर जवळ नव्हते. राहता प्रश्न विकीचा. विकी नेहमी नजरेसमोर असायचा. आपल्या वडिलांचा हा तिरकस स्वभाव पाहून तो कंटाळला होता. त्याला वाटायचं आपल्याला काय कमी आहे. पैसा आहे, घर, गाडी, बंगला वडिलांनी पैसे दयावे अन् आपण मोठा धंदा करावा. दिनकररावांना वाटायचे आधी याने चारपाच महिने कुठेतरी नोकरी करावी मग धंद्याचं प्रशिक्षण मिळेलं की नोकरी करावी. पण आपण का म्हणून कमीपणाने नोकरी करावी असं विकीला सदैव वाटायचं. यातच दोघांचा या विचाराच्या तफावतीमुळे दोघांतला तेढ वाढतच गेला. विकीने आठ दहामहिने एका ठिकाणी नोकरी केलीही पण त्याचं मन तिथेही रमेना. त्याला तिथे वाईट संगत लागली. गुटखा मावा खाणे. दारू पिणे. दंगा करणे. दिवसभर भटकंती करणे.

आता तर दिनककरावांना आयती संधी मिळाली. विकीच्या या सवयी पाहून ते नेहमी चारचौघात ही त्याचा पानउतारा करू लागले. काडीची अक्कल नाही अन् चाल्लाय लाखोचा बिझनेस करायला. स्वप्नं तर बघा करोडपती होण्याची.  दमडी कमवायची अक्कल नाही. दिनकरराव असे बोलले की विकीच्या रागाचा पारा अजून वाढतच असे. मग दोघांच्यात शाब्दिक चकमकी होत. घरातलं वातावरण गढूळ होऊन शांती भंग पावत असे. कधी कधी रागाने दिनकरराव रागारागाने विकीवर हात ही उगारत अन् मग मधल्या मधे मालतीआईची घुसमट होई. कधी कधी तिच्यावरही दिनकरराव रागाच्या भरात हात उचलत. अन् दिवसेंदिवस हे भांडणं वाढतच होतं. कधी कधी ते प्रेमाने बोलत तेव्हा विकि ऐकण्याच्या मनस्थित नसे. विकिची आई ही नेहमी दिनकररावांना दुषने देत तुमच्या या वागण्यानं हाताचा जाईल पोरगा. आयुष्यभर काही बघीतलं नाही अन् आता लग्नाचं वय झालं तेव्हा तुम्ही त्याला शिस्त लावायला चाललाय. जबाबदारी अंगावर पडली की तो आपोआपच सुधरेल

दिनकररावांनी या कटकटीच नको म्हणून, विकीचे लग्न करून दयायचे ठरवले. मग तर तो सुधरेल म्हणून. पण कुठले काय लग्न झाल्यावर त्याला वडिलोपार्जित जमीन कसायला देऊन घर गाडी सगळं कंटाळून देऊन टाकलं. खरंतर त्यांनी समजून घ्यायला हवं होतं विकिला. पण स्वभावाला औषध नसतं म्हणतात. विकिचं लग्न झाल्यावरही दिनकररावाचं विकिला टोचून बोलणं सुटलं नाही. आता विकिला आपल्या बायकोसमोर होणारा आपला अपमान सहन होईना. त्याची बायको निमा तिलाही ते आवडायचं नाही. त्यांनी वेगळं व्हायचं ठरवलं व लवकरच ते घराबाहेर पडले. हाताशी थोडाफार पैसा होताच. एक छोटासा व्यवसाय चालू करून निमा व विकी आनंदाने राहू लागले. इकडे सहा अपत्य असूनही दिनकरराव मात्र एकटे पडले. 

आपण म्हणू तिच पूर्व दिशा अशा विचारांनी पुढे आलेले दिनकरराव आपल्याच अनुभवाच्या चौकटीत मुलांना बसवू पाहात होते. मात्र ती चौकट फक्त चूक आणि बरोबर याच आधारावर उभी होती. दिनकरराव त्या चौकटीला सांधणारा प्रेमाचा मायेचा कोपरा असतो तेच नेमके विसरले होते. म्हणून ती चौकट कधी उभी राहिलीच नाही. त्यांनी मुलांना शिक्षण दिलं, कपडालत्ता, पैसा दिला पण मायेचा आवाज विश्वास दिला नाही की कधी चारचौघात मुलाचं कोडकौतुक केलं नाही. याचाच परिणाम चारी मुलं दुरावली... लेकी यायच्या जायच्या त्या पण नावालाच. आईसाठी.

दिनकररावांना विकिच्या व्यवसायाची रोज खबरबात मिळत होती. हेच तर मी त्याला अगोदर कर म्हणत होतो. त्याने सहज स्विकारलं असतं तर मी कशाला बोललो असतो त्याला. माझी जीभ कटू आहे पण वाईट नाही. आपल्या लेकराचं भलं व्हावं यासाठीच तर आपण कटू वागत होतो. पण... असं काय चुकतं होतं माझं ? काय चुकलं ? मी बरोबरच होतो ? अख्खा गाव सलाम करतो राव मला. उभ्या आयुष्यात नोकरीत कोणी माझा शब्द मोडला नाही. आजही मला सगळे मानतात मला. अन् घरात कवडीची किंमत नाही. का ? अजूनही दिनकररावांना कळत नव्हतं. का कळूनही न कळल्याचा आव आणत होते दिनकरराव ? विकी मात्र त्याच्या आयुष्यात मश्गुल झाला होता. दिनकरावांची आठवण आली की तासनतास बसून राहयचा. मनात असूनही दिनकरावांना भेटायला जायचं टाळायचा. दोन शब्दांसाठी प्रेमाच्या, मायेच्या आपुलीकीच्या तो अन् दिनकरराव दोघें आजही भुकेले होते.

कथा लेखीका- तनुजा ढेरे


Monday, 4 February 2019

कविता - कुठे चाललोय आपण

कुठे चाललोय आपण

काय आणि कुठल्या दिशेने चाललोय आपण ?
कितीही हातघाई,
जिथे  वाढदिवसाला दीर्घ आयुष्य मिळावे
यासाठी शुभेच्छा देतो आपण,
तिथेच शेवटचे दिवस, तास, घटका मोजत असताना
जीवंत व्यक्तीला मृत जाहीर करतो आपण ?

जिथे आयुष्यभर तोंडदेखली विचारपूस करतो
कसा आहेस ? कुठे आहेस ?
काहीच खंत नसते कुणाला.
जग घड्याळाच्या काट्यावर धावपळत असते.
अखेरचा श्वास घेताना,
क्षणभराची उसंत नसते विचारपूस करायला.

इथे मरण्याआधीच तयार असतात
श्रध्दांजलीचे बॅनर
सोशलमिडियावाल्याचे अॅकर
बातमी खोटीनाटी पसरवायला
जीवनाचा लेखाजोगा तयार असतो
हळहळ व्यक्त करायला
हल्ली अस्थी विसर्जन करतानाही
लोक सेल्फी घेतात
अन् शोकाकुल हास्यास्पद अवस्थेतही मिरवतात
हसावं की रडावं यावर हेच कळत नाही.

कसा ? कुठे जन्म झाला.
आमच्या बरोबर बसला उठला
कसला दांडगा जीवनप्रवास
किती पुरस्कार,
खूप चांगला होता तो नेहमी हसत बोलायचा
किती ते कौतुक !

पण प्रत्यक्षात
चार खांदे दयायला मात्र तिथे हजर नसतं कोणी
बोलाची कढी नि बोलाचाच भात
तेराव्याचं जेवायला मात्र बुंदीचे ताट
ताटावरून उठताना, शोक व्यक्त करताना
रोज मरे त्याला कोण रडे
म्हणत लागतात पुन्हा माणसं आपआपल्या कामाला
असं हे सम- विषम जीवनचक्र चुकलंय का सांगा कोणाला ?
----------
तनुजा ढेरे