Monday, 4 February 2019

कविता - कुठे चाललोय आपण

कुठे चाललोय आपण

काय आणि कुठल्या दिशेने चाललोय आपण ?
कितीही हातघाई,
जिथे  वाढदिवसाला दीर्घ आयुष्य मिळावे
यासाठी शुभेच्छा देतो आपण,
तिथेच शेवटचे दिवस, तास, घटका मोजत असताना
जीवंत व्यक्तीला मृत जाहीर करतो आपण ?

जिथे आयुष्यभर तोंडदेखली विचारपूस करतो
कसा आहेस ? कुठे आहेस ?
काहीच खंत नसते कुणाला.
जग घड्याळाच्या काट्यावर धावपळत असते.
अखेरचा श्वास घेताना,
क्षणभराची उसंत नसते विचारपूस करायला.

इथे मरण्याआधीच तयार असतात
श्रध्दांजलीचे बॅनर
सोशलमिडियावाल्याचे अॅकर
बातमी खोटीनाटी पसरवायला
जीवनाचा लेखाजोगा तयार असतो
हळहळ व्यक्त करायला
हल्ली अस्थी विसर्जन करतानाही
लोक सेल्फी घेतात
अन् शोकाकुल हास्यास्पद अवस्थेतही मिरवतात
हसावं की रडावं यावर हेच कळत नाही.

कसा ? कुठे जन्म झाला.
आमच्या बरोबर बसला उठला
कसला दांडगा जीवनप्रवास
किती पुरस्कार,
खूप चांगला होता तो नेहमी हसत बोलायचा
किती ते कौतुक !

पण प्रत्यक्षात
चार खांदे दयायला मात्र तिथे हजर नसतं कोणी
बोलाची कढी नि बोलाचाच भात
तेराव्याचं जेवायला मात्र बुंदीचे ताट
ताटावरून उठताना, शोक व्यक्त करताना
रोज मरे त्याला कोण रडे
म्हणत लागतात पुन्हा माणसं आपआपल्या कामाला
असं हे सम- विषम जीवनचक्र चुकलंय का सांगा कोणाला ?
----------
तनुजा ढेरे






No comments: