Tuesday, 5 February 2019

कथा :- मायेचा शब्द


मायेचा शब्द

विकी पंचवीस तीस वर्षाचा हुशार मुलगा, अतिशय साधा सरळ तेरावी- चौदावी शिकलेला. तो सर्वांशी अतिशय प्रेमाने वागणारा. दिसायला बराच म्हणायचा. उंचापुरा जरासा सावळा, एका कंपनीत मॅनेजर म्हणून तो कामालाही लागला होता. घरीची परिस्थिती तशी चांगलीच म्हणायची वीस-पंचवीस एकर बागायती जमीन. गाडी, बंगला, फार्म हाऊस सगळं. चार भाऊ, दोन बहिणी असा परिवार. तो तसा जरा विक्षिप्तच होता. घराबाहेर इतरांशी तसं बरं वागायाचं पण नेहमी एकटा एकटा राहयचा. जास्ती कोणात मिसळायचा नाही. कामापुरतंच बोलायचा. त्याची स्वप्नं, त्याच्या ईच्छा आकांक्षा या खूप वेगळ्या म्हणण्यापेक्षा खूप मोठ्या होत्या. त्याचे तिन्ही मोठे भाऊ तसे स्थिरस्थावर झाले होते. सर्वात मोठे दोघे परदेशात होते. तर चार नंबर दिल्लीला शिकायला होता. हा तीन नंबरचा.

मात्र त्याचा एक खूप मोठा प्राॅब्लेम होता. तो आपल्या वडिलांशी दिनकररावांशी कधीच प्रेमाने बोलायचा नाही. नेहमी तो तिरकसच बोलायचा. त्यांचा तो इतका तिरस्कार करायचा की बस्सं त्याच्या वडिलांना पाहियलं की त्याची तळपायाची आग मस्तकात जायची. त्याचं अस्तित्वच त्यांना नकोसं वाटायचं. दिनकरावांनी आपल्या दोंन्ही मुलीची लग्न करून दिली होती. मोठ्या दोन मुलांचीही झाली होती. पण आपल्या चार मुलात सर्व संपत्ती अजून वाटून दिली नव्हती. चारीही मुलांना तसं वैयक्तीक काही कमी नव्हतं वा आर्थिक अस्थिरता ही नव्हती. मात्र आपला बाप कधी मरतोय अन् त्याच्या मढ्यावरचं लोणी कधी खायला मिळतंय याचीच ते वाट पाहात होते. कधी एकदा ईस्टेट अन् शेतीची वाटणी हातात येईल आणि ती विकून टाकून संपत्तीचे आपण धनी होऊ असे या भावडांना झाले होते. त्यांना त्यांच्या आईवडिलाचा थोडासाही हस्तक्षेप त्यांच्या जीवनात नको होता.

कारणही तसेच होते. दिनकरराव कधी आपल्या मुलांना प्रेमळ मनाने बोलायचेच नाहीत. त्याचं आपल्या मुलावर प्रेम खूप होतं. पण ते आत मनातच ठेवून कधी मनमोकळेपणानी मुलांशी बोललेच नाहीत. कडक, शिस्तप्रिय असे दिनकरराव होते. त्यांना नेहमी वाटायचं की आपल्या मुलांनी अमुक करावं तमूक करावं. त्यांच्या ईच्छा आकांक्षा या खूप वेगळ्या होत्या व त्या या काळातील मुलांना सहजासहजी पटणाऱ्या नव्हत्या हे कधी दिनकररावांनी जाणलंच नाही. त्यामुळे मुलं समोर आली की त्यांना बोल लावणे. त्यांच्या चुका काढणे व दाखवणे एवढंच काम दिनकरराव करायचे. कधी समजून घ्यायचा प्रयत्नच केला नाहीच त्यांनी मुलांना ना की कधी चांगले म्हटले. आता तिघे तर जवळ नव्हते. राहता प्रश्न विकीचा. विकी नेहमी नजरेसमोर असायचा. आपल्या वडिलांचा हा तिरकस स्वभाव पाहून तो कंटाळला होता. त्याला वाटायचं आपल्याला काय कमी आहे. पैसा आहे, घर, गाडी, बंगला वडिलांनी पैसे दयावे अन् आपण मोठा धंदा करावा. दिनकररावांना वाटायचे आधी याने चारपाच महिने कुठेतरी नोकरी करावी मग धंद्याचं प्रशिक्षण मिळेलं की नोकरी करावी. पण आपण का म्हणून कमीपणाने नोकरी करावी असं विकीला सदैव वाटायचं. यातच दोघांचा या विचाराच्या तफावतीमुळे दोघांतला तेढ वाढतच गेला. विकीने आठ दहामहिने एका ठिकाणी नोकरी केलीही पण त्याचं मन तिथेही रमेना. त्याला तिथे वाईट संगत लागली. गुटखा मावा खाणे. दारू पिणे. दंगा करणे. दिवसभर भटकंती करणे.

आता तर दिनककरावांना आयती संधी मिळाली. विकीच्या या सवयी पाहून ते नेहमी चारचौघात ही त्याचा पानउतारा करू लागले. काडीची अक्कल नाही अन् चाल्लाय लाखोचा बिझनेस करायला. स्वप्नं तर बघा करोडपती होण्याची.  दमडी कमवायची अक्कल नाही. दिनकरराव असे बोलले की विकीच्या रागाचा पारा अजून वाढतच असे. मग दोघांच्यात शाब्दिक चकमकी होत. घरातलं वातावरण गढूळ होऊन शांती भंग पावत असे. कधी कधी रागाने दिनकरराव रागारागाने विकीवर हात ही उगारत अन् मग मधल्या मधे मालतीआईची घुसमट होई. कधी कधी तिच्यावरही दिनकरराव रागाच्या भरात हात उचलत. अन् दिवसेंदिवस हे भांडणं वाढतच होतं. कधी कधी ते प्रेमाने बोलत तेव्हा विकि ऐकण्याच्या मनस्थित नसे. विकिची आई ही नेहमी दिनकररावांना दुषने देत तुमच्या या वागण्यानं हाताचा जाईल पोरगा. आयुष्यभर काही बघीतलं नाही अन् आता लग्नाचं वय झालं तेव्हा तुम्ही त्याला शिस्त लावायला चाललाय. जबाबदारी अंगावर पडली की तो आपोआपच सुधरेल

दिनकररावांनी या कटकटीच नको म्हणून, विकीचे लग्न करून दयायचे ठरवले. मग तर तो सुधरेल म्हणून. पण कुठले काय लग्न झाल्यावर त्याला वडिलोपार्जित जमीन कसायला देऊन घर गाडी सगळं कंटाळून देऊन टाकलं. खरंतर त्यांनी समजून घ्यायला हवं होतं विकिला. पण स्वभावाला औषध नसतं म्हणतात. विकिचं लग्न झाल्यावरही दिनकररावाचं विकिला टोचून बोलणं सुटलं नाही. आता विकिला आपल्या बायकोसमोर होणारा आपला अपमान सहन होईना. त्याची बायको निमा तिलाही ते आवडायचं नाही. त्यांनी वेगळं व्हायचं ठरवलं व लवकरच ते घराबाहेर पडले. हाताशी थोडाफार पैसा होताच. एक छोटासा व्यवसाय चालू करून निमा व विकी आनंदाने राहू लागले. इकडे सहा अपत्य असूनही दिनकरराव मात्र एकटे पडले. 

आपण म्हणू तिच पूर्व दिशा अशा विचारांनी पुढे आलेले दिनकरराव आपल्याच अनुभवाच्या चौकटीत मुलांना बसवू पाहात होते. मात्र ती चौकट फक्त चूक आणि बरोबर याच आधारावर उभी होती. दिनकरराव त्या चौकटीला सांधणारा प्रेमाचा मायेचा कोपरा असतो तेच नेमके विसरले होते. म्हणून ती चौकट कधी उभी राहिलीच नाही. त्यांनी मुलांना शिक्षण दिलं, कपडालत्ता, पैसा दिला पण मायेचा आवाज विश्वास दिला नाही की कधी चारचौघात मुलाचं कोडकौतुक केलं नाही. याचाच परिणाम चारी मुलं दुरावली... लेकी यायच्या जायच्या त्या पण नावालाच. आईसाठी.

दिनकररावांना विकिच्या व्यवसायाची रोज खबरबात मिळत होती. हेच तर मी त्याला अगोदर कर म्हणत होतो. त्याने सहज स्विकारलं असतं तर मी कशाला बोललो असतो त्याला. माझी जीभ कटू आहे पण वाईट नाही. आपल्या लेकराचं भलं व्हावं यासाठीच तर आपण कटू वागत होतो. पण... असं काय चुकतं होतं माझं ? काय चुकलं ? मी बरोबरच होतो ? अख्खा गाव सलाम करतो राव मला. उभ्या आयुष्यात नोकरीत कोणी माझा शब्द मोडला नाही. आजही मला सगळे मानतात मला. अन् घरात कवडीची किंमत नाही. का ? अजूनही दिनकररावांना कळत नव्हतं. का कळूनही न कळल्याचा आव आणत होते दिनकरराव ? विकी मात्र त्याच्या आयुष्यात मश्गुल झाला होता. दिनकरावांची आठवण आली की तासनतास बसून राहयचा. मनात असूनही दिनकरावांना भेटायला जायचं टाळायचा. दोन शब्दांसाठी प्रेमाच्या, मायेच्या आपुलीकीच्या तो अन् दिनकरराव दोघें आजही भुकेले होते.

कथा लेखीका- तनुजा ढेरे


No comments: