श्रावणझुला
आकाशात दाटलेले घनश्यामल मेघ आणि आसंमतात पसरलेला हिरवागार गारवा. मनाला मोहून टाकणाऱ्या हिरव्यागार पर्वतरांगा, टेकड्या. अंगाखांद्यावरून खळखळून वाहणारे पांढरेशुभ्र झरे. हिरव्यागार झाडांच्या पर्णकुटीवर रेलणाऱ्या नाचणाऱ्या, मुरडणाऱ्या नाजूक लतिका. कानात, पायात रूणझुणणारी पैंजण फुले इवली इवली मुकटात खोवून वाऱ्यावर झुलणारी गवताची पाती. त्यावर बागडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे. गावाला वळसा घालून पुढे जाणारी खळखळून हसत वाहात जाणारी नदी. नदीकडेचं महादेवाचं मंदिर या मंदिरात होणारी भाविकांची गर्दी हे मनोहरी दृश्य डोळ्यांत साठवून, घाटमाथा चढून या टेकड्यावर खेळायला जाणारा आमचा मुलींचा घोळका. या श्रावण महिन्यात आम्हा मुलींची चंगळच असायची. रंगीबेरंगी इवली इवली नखाएवढी गवतफुले, गवताचे विविध प्रकारचे तुरे हातात गुच्छ गोळा करून डोंगरावर घसरगुंडी खेळत चिखलात फुलं खोवत तर कधी या गवतफुलांच्या माळा गळ्यात कानात ही डुलं अडकवून उड्या मारत नाचत बागडत आम्ही घर गाठायचो तेव्हा मन हा हिरवा शेला पांघरून आईच्या कुशीत अलगद पापण्या मिटायचं.
खरंतर श्रावण महिन्याची चाहूलच मनात सप्तरंगी इंद्रधनूचे रंग भरायचे. श्रावणी सोमवार, नागपंचमी, पंधरा ऑगस्ट राखीपौर्णिमा, गोपाळकाला कितीतरी सण या महिन्यात; चिमुकले हात, पाऊले मेंहदीच्या लाल रंगाने सुवासाने खुलून यायचे. आम्ही मुली बाजूच्या काॅलनीतल्या जगदाळेमामाच्या वाड्यासमोरच्या मेहंदीच्या झाडाचा पाला ओटीत भरून आणून तो हिरवागार पाला कुटून त्याचा बारीक गरगटा करून तो हातावर लावत असू. मेह॔दीचा वास घरभर पसरायचा. हातभर बांगड्या, रंगीबेरंगी काचमण्याच्या टिकल्या, नखपाॅलिश, नविन फ्राॅक परकर पोलकं नेसून महादेवाच्या मंदिरात आई, गल्लीतल्या बायका यांच्या बरोबर राजाच्या बागेत नाहीतर सिध्देश्वर रामलिंगच्या टेकड्यावर महादेवाच्या मंदिरात जात असू. हिरव्यागार टेकड्याच्या कुशीत वसलेली ही शिवमंदिरे अलौकिक सौदंर्याने धरेवर वसलेला स्वर्गच जणू.
या मासात श्रावणी सोमवार निमित्त शाळेतून सहल जायची कधी पायी वडगाव सिध्देश्वरला तर कधी बसने रामलिंगला खूपच मजा यायची. आजुबाजूला हिरवीगार वनराई आणि या वनराईच्या मधून जाताना निसर्गाचा अलौकिक ठेवा आपल्या पदरात घालणाऱ्या सृष्टी निर्मात्याचे ही कुतूहल वाटायचे. श्रावणमहिन्यातील सिध्देश्वर व रामलिंग येथे भरणारी जत्रा व महादेवाच्या दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी कमीअधीक फरकाने सारखीच. हिरव्या वनराईतून आत गर्द डोंगराईत गेल्यावर दुरूनच रामलिंग सिध्देश्वर मंदिराच्या कमानी दिसायच्या कमानीत शिरताच... आजुबाजूला फुगेवाले, खेळणीची दुकाने, खाऊची दुकाने, कुंकूं, गुलाल, बेल, दुर्वा, कापूर, उदबत्ती, नारळ, पेढे व फळांची-फुलांची दुकानं खाद्यपदार्थाची दुकाने चहापाणाच्या टपऱ्या आणि आजूबाजूला पायऱ्यावर, झाडावर वानरांची फौज व धमाल असायची.
मंदिरातील ती शंकरमहादेवाची ती प्रसन्न मुर्ती, बेल, फूल, दूध कापूर, धूप, उद, दुर्वांचा घमघमाट. दही, दूधाचा अभिषेक गाभाऱ्यात दाटलेली निळाई मनातली उदासीनता दूर करून एक वेगळाच चैतन्याचा मोहर सर्वांगावर मोहरायचा. हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात बसून जेवणाची अंगतपंगत, खेळणे, डोहात डुंबणे धामुकडे, काळीमैना, जंगली फळं व मेवा खाताना खूपच मजा यायची. घरी परतताना या गोड आठवणींचा ठेवा पदरात बांधून वाऱ्याच्या हिरव्या पदरावर झुलत घर गाठायचं. मन कितीतरी दिवस या हिरव्यागार आठवणींच्या झुल्यावर झुलतच राहायचं
या श्रावणमहिन्यावर लिहावं तितकं कमीच आहे. खरंतर हा श्रावण महिना ऋतुगंध फुलवणारा, पसरवणारा या महिन्यात स्त्रियांसाठी एक मुक्त जगण्याचा हिंदोळाच घेऊन येतो. या महिन्यात इतक्या दिवस घरातल्या कामाने शिणलेली स्त्री निसर्गाच्या या अद्भूत मायावी प्रेमळ शक्तीने मोहरून येते व आनंदाने सण साजरे करते. मंगळागौर, राखीपौर्णिणा या निमित्ताने श्रावणपाटी माहेरवाशीन सासुरवाशीन सासर-माहेर असा प्रवास करतात. घर आनंदानं पाहुण्यानं, मायलेकीच्या-सुनांच्या पाऊलांनी, हसण्या खिदळण्यानं, गप्पा-गोष्टींनी आनंदाने मोहरून येतं. दाराला बांधलेले झोके, बांधावरची वारूळं, हातावरची राखी आणि मंगळागौरीचा खेळ, नारळीपुनवेच्या नारळीभाताचा सुवास, कोळीगीते, पंधरा आॅगस्टचा ' भारत माता की जय 'जयजयकार, मंगळागौरीचा खेळ हातात हात घालून, फेर धरून नाचताना गोलाकार, झिम्मा, फुगड्या फु बाई फू, खिस बाई खिस दोडका खिस, नाच गं घुमा खेळ कसा रंगात येतो अन् संपतो कळत देखील नाही आणि मग वेध लागतात पुढच्या महिन्यात, भाद्रपदात येणाऱ्या गणपत्ती बाप्पाचें आणि गौरीचे. जागोजागी विकायला आलेल्या गणपती बाप्पांच्या सुरेख मुर्त्या आणि देखावे उभे करण्यासाठी असलेली गल्लीतल्या मुलांची गडबड, लगबग आणि वर्गणी गोळा करण्यासाठी उडालेली झुंबड आठवली की अजून मन त्या बालगोपाळाच्या मेळ्यात एकाच्या पाठीवर एक पाय देवून उभ्या राहणाऱ्या आणि गोपाळकालेची दहीहडीं फोडणाऱ्या गोपळांच्या गोपगोपिकांच्या बालमित्रांच्या आठवणीतून बाहेर येतच नाही.
तनुजा ढेरे

1 comment:
मुग्ध
Post a Comment