Tuesday, 16 August 2022

सोबत- मधु मंगेश कर्णिक


सोबत - ललित लेखसंग्रह

- मधु मंगेश कर्णिक 


'सोबत' मधु मंगेश कर्णिक यांचा ललित लेखसंग्रह. लेखकाची रसरशीत जीवन अनुभूतीच. खरंतर ललितगद्य हा माझ्या हृदयाच्या सर्वांत जवळचा प्रांत. मुळातच ललितलेखनाची असलेली आवड मला 'सोबत' या लेखसंग्रहाकडे घेऊन आली. साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कथा, कविता, कादंबरी, ललित इ. साहित्याच्या सर्वंच प्रांतात वैशिष्टयपूर्ण लेखन केले आहे.  एके ठिकाणी मी वाचले होते ललितगद्य लेखन हा या लेखकाचा आवडता लेखनप्रकार आहे. 


'सोबत' हा ललितलेखसंग्रह एकूण तीन विभागात विभागला आहे. पहिला भाग हा चिंच, आंबा, फणस, वड या झाडांशी जोडलेल्या सुखद स्मृतीचा ठेवा आहे. दुसर्‍या भागात लेखकाने मोती, कावळे, चिमण्या, गाढव या पशुपक्ष्यांशी असलेले आपले नाते तर तिसर्‍या भागात येरे येरे पावसा, पाऊलवाटा, झोपाळा व मंतरलेले आकाश ही निसर्गभाव वर्णन करणारी भावस्पंदने शब्दबद्ध केली आहेत हे पुढे मी विस्ताराने मांडणारच आहे. कोकणाच्या मातीचा सुगंध  लेखकाच्या या साहित्याला असला तरी सर्व  प्रांतातील साहित्य, रसिक वाचकांना त्यांचे लेखन आपले वाटते.


'आंबा' कोणाला आवडत नाही सांगा परंतु या लेखात लेखक आंब्याच्या झाडाला चक्क चालता- बोलता मित्र मानतो. रस्त्याच्या कडेचा पोरसवदा आंबा, पाणंदीतला नारळी आंबा, माळावरचा 'पावशा' आंबा, दारातला 'लाशा' आंबा अशा विविध आंब्याच्या झाडांशी असलेलं नातं लेखक म्हणतो, 'आंब्याची बाठी भाजून तुम्ही खाल्ली नसेल तर तुम्ही मिठाई कधी खाल्लीच नाही.'


'चिंच' हा लेखात लेखकाची निरीक्षण शक्ती सूक्ष्म आणि वृत्ती तरल आहे याची जाणीव होते. चिंचेचा आंबट, गोड चवी प्रमाणेच, चिंचेचा नाजूकपणा या लेखातून उतरलाय. चिंचेची फुलं, पानं यांचे वर्णन वाचताना दुर्गाबाईच्या ऋतुचक्राची आठवण होतेच होते. इतकं तरल चिंचूच्या रुपाचं वर्णन लेखकाने केले आहे. 'हिरवीगार साडी, पोपटी रंगाचे जंपर नि हातात पिवळसर रंगाचा हातरुमाल नि पर्स असा वेष धारण केलेल्या एखाद्या आधुनिक पुरंध्रीसारखी चिंच अशा वेळी दिसते.' असे लेखक म्हणतो तेव्हा प्रतिभा शक्तीचा एक वेगळा विचार लेखक करतो हे जाणवते.


'शेवगा' या लेखात शेवग्याची फुलं, शेवग्याच्या शेंगा अन् शेवग्याच्या शेंगेच्या आमटी सारख्या चविष्ट अशा खमंग आठवणी या ललितलेखातून व्यक्त केल्या आहेत. लेखकाचं मित्रत्वाचं नातं जपण्याची अंतरीक ओढ या लेखसंग्रहातील सर्वच लेखातून दिसून येते. 


'पिंपळ' या लेखात पिंपळाच्या मुंजीत पिंपळाला प्रदक्षिणा घालणारे कारकून, कद नेसून मिरवणारे निपुत्रिक बाबीभटजी,  चाकू उगारणारी घागरेवाली बलुची  स्त्री, पिंपळाला नमस्कार करायला लावणारी आई यांचे स्मरण भावूकपणे उभे केले आहे. तसेच खेड्यातला पिंपळ व शहरातला पिंपळ यांच्यातला फरक अतीशय बारकाईने टिपला आहे. 'पिंपळ' हा लेख जणू वडिलधारा बापच. छाया देणारा व सोबत करणारा मायाळू व आश्वासक असे वर्णन लेखकाने केले आहे. झाडांची लाखमोलाची सोबत आपल्या परिसरातील वृक्षतोडीनंतर जाणवणारं भकासपणं व हुळहुळणारं संवेदनशील मन आपल्यालाही अंतर्मुख करतं.


'औदुंबर' या लेखात बालपणी औंदुबराच्या झाडाबद्दल लेखकाला असलेलं कुतूहल, शाळेत शिक्षकांनी शिकवलेल्या औदुंबर या कवितेतला औदुंबर प्रत्यक्षात पाहण्यासाठीची लेखकाची तगमग, त्यासाठीचा शोध, प्रवास अन् अचानक एकेदिवशी प्रवासात अचानक झालेले त्या औंदुबराचे दर्शन. लेखकाची भय गूढ अवस्था. हर्ष व भय या स्थितीतला आत्मोद्गार वाचल्यावर आपणही त्या स्थितीत मग्न होऊन जातो. लेखकाचं औत्सुक्यपूर्ण, अलौकिकत्वाचा शोध घेणारं मन, बालमनाचा हट्टीपणा, प्रासंगिक कणखरपण अन् हळवा स्वभाव पदोपदी या लेखातून जाणवत राहतो. 


'बकुळ' या लेखात बकुळ फुलाच्या झाडाशी जोडलेल्या सुगंधी आठवणी लेखक सांगतो व बकुळ झाडाचं गुपीतही. बकुळ फुलाच्या हृदयातील सुगंधाची कळ तुम्हाला उमगायची असेल तर बकरीच्या झाडाशी गट्टी जुळावे लागते. ज्याच्याशी गट्टी जुळेल त्याच्यापाशी अंत:करण उघड करणे बकुळ झाडाला ठाऊक असते. 'फणस' या लेखात लेखक फणसाचं गोड रसाळ वर्णन लेखकाने केले आहे. 


'सोनचाफा' या लेखात सोनचाफ्याची फुले आणि लेखकाचं एक वेगळंच आपुलकीचं, औदार्य पूर्ण मैत्रीपूर्ण नातं लेखकाने रंगवलं आहे. सोनचाफ्याच्या फुलाशी निगडीत आठवण सांगताना लेखकाला वर्गातल्या एका मुलीची आठवण होते. पावसाळ्यात शाळेचे नविन वर्ग सुरु झाल्यावर शाळेत नव्याने आलेली एक मुलगी पहिल्या बाकावर बसायची. तिच्या केसात नेहमी एक सोनचाफे खोवलेला असायचे. ती पुस्तकाच्या पानातून केवड्याच्या पाती खुणेसाठी ठेवी. केतकी रंगाच्या त्या मुलीचे सौंदर्य सोनचाफ्यासारखेच. ती आली की  सर्वांच्या ओठी ओळी उमटत' सुवर्णचंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला-' आणि ती झऱ्यासारखी निर्मळ हसे. केळ, 'या लेखात लेखकाने केळीचे बन म्हणजे एकत्र कुटुंबपद्धतीचं मूर्तिमंत आदर्श.' असं वर्णन करत असतानाच केळीच्या झाडाचं देखणेपण अतीशय सुंदर शब्दात वर्णिले आहे.


दुसर्‍या भागातील लेख पशुपक्ष्यांशी निगडीत आहेत. 'मोती' या लेखात मोती कुत्रा आणि त्याच्याशी सर्व कुटुंबाचं असलेलं सख्य व या मोतीचा प्रामाणिकपणा, लेखकाचे वडिल गेल्यानंतर अकराव्या दिवशी या मोतीने प्राण सोडणे हे वाचताना डोळे भरुन येतात, कावळे, या लेखात कावळ्याचं महत्व सांगताना लेखक लिहितो, घराचे घरपण टिकवण्यासाठी- आणि माणसाचे माणूसपण टिकवण्यासाठीही कावळे हवेत.'चिमण्या' या लेखात चिमण्याचं चिवचिवणं ऐकलं नाहीतर लेखक अस्वस्थ होतो. चिमण्याचं आपल्या आजुबाजूला असणं लेखकाला आनंद देतं. लेखक म्हणतो, चिमण्यांची सारे वागणे विलक्षण उत्कट, कमालीचे मनस्वी असते. जीवन समरसून कसे जगावे ते चिमण्यांकडून शिकावे. प्रत्येक गोष्ट चिमण्या रस घेऊन पार पाडतात. आणि इथे  विशेष सांगावं वाटते की लेखकाला गाढव या प्राण्याविषयीही सख्य आहे. सगळीच गाढवे काही गाढवासारखी नसतात. काही गाढवे तर फार सज्जन माणसे असतात. मैत्री करावी तर अशाशीच. आम्ही मैत्री करायला शिकलो मुली गाढवापासून. आमचे सच्चे स्नेही म्हणून जी मंडळी गणली जात त्यात गाढवाचा नंबर पहिला असे. 


तिसर्‍या भागात लेखकाने निसर्ग व प्रिय अशा गोष्टीचं अंतकरणातील स्थान विषद केलं आहे. 'पाऊलवाटा' या  लेखात पाऊलवाटा विषयी लेखकाला वाटणारं आकर्षण जाणवते. माणसात असतात तसे प्रकार पाऊलवाटातही असतात, पाऊलवाटा अधीर, मनाला भुरळ घालणाऱ्या असतात. तर कधी कधी इकडे तिकडे न पाहता नाकासमोर चालणाऱ्या शालीन असतात. साळुंक्याचं पाऊलवाटावरुन पायांची उमटवत चालण्याचं विलोभनीय वर्णन लेखकाने केले आहे. झोपाळा या लेखात लेखक म्हणतो, माझ्या अनेक सुखस्वप्नांपैकी झोपाळा हे एक सुख स्वप्न आहे व अनेक दुःखापैकी एक दुःख ! मुंबईतील दोन खणी घरात कड्यांच नाहीत, साधा दोरीला झोपाळा टांगता येत नाही. मुंबईतल्या वडाच्या झाडांना पारंब्याच नाहीत; हे माझे दुःख आहे. 'मंतरलेले आकाश' या लेखात लेखकाला, आकाशाची सोबत इतर कोणत्याही सोबतीपेक्षा  अधिक विश्वासू व स्नेहमय वाटते. आकाशचं नानाविविध रुपाने भारुन टाकणं लेखकाला आवडतं. 


अशा प्रकारे 'सोबत' हा लेखसंग्रह वाचताना लेखकाचे निसर्गाशी असलेले नाते पदोपदी जाणवते. निसर्गरुपातील विविधता, निसर्गरुपातील बदल सूक्ष्मतेने टिपण्याची नजर, झाडे, पाने, फुले निसर्गसौंदर्याचे भावरंग, फुलाफळांच्या गोष्टी, व्यक्तीस्वभावचित्रे लेखकाने आपल्या सर्जनशील प्रतिभा शक्तीने या लेखसंग्रहात जीवंत उभी केली आहेत. माणसांइतकाच पशुप्राण्यांना जपणारा व हृद्यात स्थान देणारा हा लेखक, यांच्या ललितगद्याला भावनांची लय आहे. कोकण प्रांताबद्दलचे प्रेम, गावांना वेगळेपण प्राप्त करुण देणारा निसर्ग, देऊळे, तिथल्या भाषा अन् ऋतूसौंदर्य याचे लोभसवाणं चित्र लेखक अतिशय जिव्हाळ्याने उभं करतो. 


कोकणच्या भूमीला  लोकसंस्कृतीपासून- परंपरेची,  बालपणापासून- तरुणपणापर्यंतची, सद्यपरिस्थितीत जुळलेली अंतःकरणातील आंदोलनं नाजूकपणे अलवार  लेखकाने गुंफली आहेत. मनोहर, मनोरम असे हे ललितगद्य, आत्मपर, व्यक्तिचित्रणपर लेखन लेखकाच्या भावकवितेचा अविष्कार घडवते. एखाद्या निखळ निर्झराप्रमाणे स्वछंद असे ओघवत्या भाषाशैलीतून हे लेखन आपले सौंदर्य अंतरीक लयीतूनच वाढवतात. सौंदर्यआस्वादात रमणारे लेखकाचे मन जागोजागी जाणवते. सौंदर्यदृष्टी, निरंतर अशा कलानिर्मिती प्रकियेत रमणारा हा प्रतिभाशाली  लेखक सौंदर्यात्मक, कलात्मक दृष्टीने लेखन करताना जीवनवादी भूमिकाही मांडताना दिसतो. वास्तवाची करुण झालर देखील या संवेदनशील लेखकाच्या लेखनातून जाणवते.


छोटेखानी असे हे लेख अतिशय ओघवत्या, प्रवाही अन् लालित्य पूर्ण भाषेत लिहिलेले आहेत. आकर्षक सुरवात अन् मनात हळुच जागा करणारा शेवट. बालपणीच्या अल्लड आठवणीत रममाण होणारे लेखकाच्या आत दडलेलं बालमन, हे लेख वाचताना अजूनही या फुलांच्या, झाडांच्या अंगाखांद्यावर खेळते आहे. लेखकाचे पक्ष्यांशी व प्राण्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते वाचताना आपण भावविभोर होऊन जातो. चाळीस एक वर्षापूर्वी लिहिलेले हे पुस्तक मला आज एक रसिक वाचक म्हणून  वाचताना मनाला सुखावते. यातील व्यक्तिचित्रे मनात भरतात, मुक्या प्राण्यांचा प्रामाणिकपणा  मनाला भावतो. या लेखसंग्रहातील निसर्ग चित्रे वाचताना मन तल्लीन होऊन जातं. या लेखकाच्या सर्व गोष्टी, आठवणी आपल्यालाही आपल्याच वाटून जातात इतक्या त्या जवळच्या वाटतात. कधी रंजक आठवणी तर कधी करुण रसात बुडणारे भावुक मन हे लेख अंर्तमुख होऊन विचार करायला लावतात. नवविचार देणारी व नवचैतन्य निर्माण करणारी अशी लेखकाची लेखनशैली ललितगद्यप्रकारच्या परंपरेत, प्रवाहात स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करुण उभी आहे. 


मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने सप्टेंबर १९६२ मधे प्रकाशित केला. आता पर्यंत या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या निघाल्या आहेत. अवघ्या अठ्ठ्यानव पानाच्या या लेखसंग्रहाचे मूल्य शंभर रुपये आहे. अतीशय सुंदर व आकर्षक असं निसर्गपर मुखपृष्ठ लेखसंग्रहाच्या सुरवातीपासून सोबत करणारं दीनानाथ दलाल यांनी रेखाटले आहे. प्रत्येक लेखाला साजेशी अशी सुंदर रेखाटने सतीश भावसार यांनी रेखाटली आहेत. कवितेचं लेणे हृदयामध्ये घेऊन जन्मलेला लेखक नकळत गद्यातही कविता लिहू लागतो, काव्यात्म गद्य लिहिणार्या या लेखकाने आपल्या हृदयात उमललेली शब्दरुपी सुंगधी सुमनं आपली पत्नी सौ. शुभा (शशी) हिला अर्पण केली आहेत. 


- तनुजा ढेरे 


Saturday, 9 April 2022

हजार धागे सुखाचे - लेखक किरण सोनार

सुख दुःखाची हळवी वीण - हजार धागे सुखाचे 

लेखक किरण सोनार

आयुष्यात सुख आणि दु:खाचा खेळ ऊन-सावल्या सारखा असतो. याचं प्रतिबिंब आपल्या आयुष्याच्या आरश्यात सतत झाकोळत असतेच. मात्र दुःखाची सल सतत सोबत असली तरी आपण जगायचं सोडत नाहीत आयुष्यात दुसर्‍याच्या चेहर्‍यांवरील हसू फुलवण्याची ताकद जर आपल्या व्यक्तीमत्वात असेल तर याहून मोठे  सुख कोणते, हेच जीवनाचं गुपीत सांगणारा हा कथासंग्रह  'हजार धागे  सुखाचे' आहे असे मला वाटते. मनोरंजना बरोबरच आपल्याला वेगळ्या जगण्याचा अनुभव देणाऱ्या या कथासंग्रहातील कथा आहेत. आजकाल अनेक कथालेखक कथा लिहित आहेत. कथा म्हणजे चला घडलं काहीतरी आज चला लिहून काढू म्हटल्याने व ते लिहिल्याने ती कथा होत नाही. कथेत पात्र, संवाद, घटना, प्रसंग तसेच विरोधाभास व नाट्य हवे. कथेत वेगळेपणा हवा, म्हणजे आपला अनुभव कदाचित तोच असेल मात्र ती अनुभवाची कलात्मक साहित्यिक मांडणी ही आपली ओळख वाटायला हवी. तरच तुमच्या नावाने तुमच्या कथा ओळखल्या जातील. अगदी तंतोतंत कथा या साहित्य प्रकारात आपली ओळख निर्माण करण्यात लेखक किरण सोनार यशस्वी झाले आहेत असे मला वाटते.


लाॅकडाऊनच्या या काळात माझ्या हाती म्हणण्यापेक्षा, या कथासंग्रहाचे शीर्षक 'हजार धागे सुखाचे' वाचून मीच विकत घेतला चपराक प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केलेला. लेखक किरण सोनार यांचा हा नवा कोरा, छोटे खानी कथांचा पहिलाच लघुकथासंग्रह वाचताना जेष्ठ साहित्यिका विजया वाड यांचे उत्कंठावर्धक असे प्रास्ताविक मनाला भावते व पुढे लेखकाचे मनोगत वाचताना लेखनाचा ध्यास, व्यासंग व आंतरीक आवाजातून उभारलेले भावविश्व म्हणजे हा कथासंग्रह आहे हे जाणवते. तर चपराकचे संपादक घनश्यामल पाटील यांनी या कथासंग्रहाची पाठराखण केली आहे. उत्कृष्ट असे रेखीव साजेसं मुखपृष्ठ संतोष धोंगडे या अनुभवी मुखपृष्ठकारानी रेखाटले आहे. त्यामुळे  हा कथासंग्रह अजूनच देखणा झाला आहे.


पत्रकार, सामाजिक कार्यकता असलेला हा लेखक आपल्याला आलेले अनुभवकथन करण्यासाठी धडपड करतोय व त्यासाठी निवडलेले हे कथांचे माध्यम या कथालेखनाची नस लेखक किरण सोनार यांनी अचूक पकडली आहे. खरंतर सुरवातीला लेखकाने मनोगतात सामाजिक अंगाने जाणारे हे पुस्तक आहे असे म्हटल्यावर आपल्याला हा कथासंग्रह म्हणजे दुष्काळ, स्त्रीसमस्या, अत्याचार  यावर आधारीत असे  लेखन आहे असे वाटेलही परंतु असे नाहीये.  तेच ते पारंपारिक सामाजिक विषय व  प्रश्न न हाताळता समकालीन विषय व वातावरण समोर ठेवून जाणिवा-नेणिवाचं भान राखून लेखकाने या कथासंग्रहातील कथाविश्व त्याच त्या प्रश्नांना बगल देऊन आपल्यासमोर अगदी सहजपणे उभे केले आहे. 


ओघवती निवेदन शैली व भाषेचा वापर लेखकाने या कथासंग्रहातील लिहिताना केला आहे. कथासंग्रहातील कथा वाचताना सुरवातीला मन हळवे, भावूक व संवेदनशील होते परंतु साध्या, सरळ व सुटसुटीत अंगाने जाणाऱ्या या कथा वाचण्यात आपण जेव्हा मग्न होतो तेव्हा कथा वाचताना आपण भवताल विसरून त्या कथांमधे पुढे काय होणार हा विचार करत रहातो. आटोपशीर संवाद, नेटकी पात्र व प्रसंग उभारणी केल्यामुळे कथा आटोपशीर झाल्या आहेत. आकर्षक सुरवात, मध्य व उत्कंठावर्धक शेवट यामुळे कथा वाचताना कथा क्लिष्ट  वाटत नाही व मागचं काय आणि आता काय असे विस्मरण होत नाही. कथेतून तोचतोच पणा जाणवत नाही. प्रत्येक कथेचा रंगभाव वेगळा उमटवण्यात लेखक यशस्वी झाला आहे.


खरंतर पारंपारिक कथालेखनाला फाटा देऊन कथेचं स्वतःचं वेगळं भावविश्व उभारून स्वतःचं वेगळेपण मांडण्यात लेखक इथे यशस्वी झाला आहे. या कथासंग्रहात एकूण आठ कथा आहेत, पहिली कथा 'पोरका बाप'  या कथासंग्रहातील पोरका बाप मधील हळवा बाप आपल्या कायम लक्षात रहातो. पर्यावरण रक्षक व निसर्ग प्रेमी अण्णा झाडांना पोटच्या मुलाप्रमाणे झाडं जपतात. एके दिवशी मुलाप्रमाणे जपलेल्या झाडांना एक वेडगळ माणूस चापटा मारतो व शिव्या देतो, तेव्हा अण्णा विरोध करतात तर तो त्यांनाही जुमानत नाही, नाईलाजास्तव हे प्रकरण पोलिसापर्यंत जाते, परंतु याच झाडाशी टक्कर होऊन त्या माणसाच्या तरुण मुलाचा मृत्यू होतो. त्याची करुण कहाणी ऐकत शेवटी त्याच्या वेडसर  वागण्यामागचे कारण ऐकून आण्णा माघार घेतात. तेव्हा वाचक ही हळवा होतो.


दुसरी हृदयस्पर्शी कथा अनमोल श्वास या कथेत स्वामी  हा इयत्ता चौथीत शिकणारा संवेदनशील लहान बालक आपल्या आई वडिलांकडे वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून कुत्र्याचं पिल्लू हवंय असा हट्ट करतो. ते सर्वजण त्याच्या हट्टाखातर कुत्र्याचे पिल्लू घ्यायला पेट शाॅप मधे जातात. दुकानदार योगेश त्यांना अनेक  कुत्र्याची पिल्लं दाखवतो. परंतु ती महाग असतात. तरीही तो कुत्र्याच्या पिल्लासाठी हटून बसतो.  स्वामीला पाहून योगश त्याला एक अपंग कुत्रा तसाच घेऊन जा म्हणतो. तो खूप आनंदी होतो. योगेश आश्चर्यचकित होतो परंतु यावर स्वामी  प्रतिक्रिया आपणास थक्क करणारी आहे. स्वामी व त्याचे आईवडील योगेशला पैसे घ्यायला भाग पडतात. त्या पपीचं मोल समजावून सांगताना स्वामी आपल्या पायातले बूट व साॅक्स  योगेशला काढून दाखवतो हे चित्र मन हेलावून सोडणारं आहे.


नजरेतून शिक्षा मधील मजूर कामगार पांडुरंग, त्याची बायको मंजुळा व दोन मुलं गणेश व महेश यांची कथा. कामगार व गावचं राजकारण यात निष्पाप पांडुरंगचा नाहक जाणारा बळी व यातून विस्कटलेले मंजुळेचे आयुष्य अन् गणेशचं जाधवसाहेबाच्या समाधी समोर चपला सोडणं व आपल्या वडिलांच्या समाधीवर रोज नित्यनेमाने फुलं वहाणं कथेतील हळवा शेवट मनाला चटका लावतो. 'अनपेक्षित पाऊलवाटा' या कथेत इंजिनिअरींगची पदवी मिळविलेला मयूर नोकरी मिळत नाही म्हणून निराश न होता मिळेल ते काम करून अनपेक्षित वाटणारी स्वतःची पाऊलवाट तो स्वतः निर्माण करतो. त्याची ध्येयपूर्ती व मेहनत नक्की आजच्या नवयुवकांना प्रेरणा ही कथा युवापिढीला प्रेरणा देणारी आहे.


'इरपाची लढाई' या कथेतील लढा हा नैतिकतेचा आहे.  ही कथा सरकारी यंत्रणा आणि नक्षलवादी या दुहींच्या कैचीत सापडलेलं गाव आणि त्या गावातील सुशिक्षित इरपा यांच्यावर बेतली आहे. गावातील अठरा विश्वे दारिद्र्य पाहून इरपाला गावासाठी काहीतरी करावेसे वाटते, परंतु सरकारी अधिकारी व नक्षली यांची दहशत त्याच्यासाठी अडचणीची ठरते. तरीही इरपा गावासाठी असे काम करतो, जे आजपर्यंत कोणीच केलेले नसते, या कथेतून लेखकाने सामाजिक संदेश दिला आहे.


शाळेची खिचडी ही कथा गरीब घरातील गणेशच्या जीवनावर चितारली आहे. गणेश हा बालक त्याचं पितृहृद्य व मातृदायी मन कारुण्यपणे लेखकाने या कथातून रेखाटले आहे. इयत्ता चौथीत शिकणारा गणेश शिक्षकांना चोर वाटतो, परंतु तो रोज शाळेत मिळणारी खिचडी संपूर्ण न खाता  काही घास आपल्या चारपाच वर्षासाठी राखून ठेवतो. घरी जाऊन भरवतो. शाळेतले पाटील सर त्याचा पाठलाग करतात. मात्र वस्तुस्थिती जाणताच पाटीलसरांना अपराध्यासारखे वाटते.  हा शेवट वाचताना  वाचकही नकळत भावनाविभोर होतो.  कधी कधी परिस्थितीवरून मत बनवणं कसं फोल असतं हे या कथेत लेखकाने छान प्रत्ययास आणून दिले आहे.


स्कार्फवाली बाई ही कथा नवरा बायकोच्या घरगुती वादावर गुंफली आहे. विनाकारण बायकांची नवऱ्याबद्दलची संशयी वृत्ती किती निरर्थक असते हे या कथेतून लेखकाने खूपच रंजक पणे लिहिले आहे. भांडणाचे कारण जाणताच वाचकही स्तंभित होतो.


हजार धागे सुखाचे ही शीर्ष कथा आहे. ही कथा नोकरी गमावलेल्या रणजीतच्या जीवनावर आधारित आहे. आधुनिक लाइफस्टाइल जगत असलेल्या रणजीतला नोकरी शोधूनही मिळत नाही, तेव्हा त्याला खूप नैराश्य येते. परंतु या नैराश्यमय काळातही मनाला उभारी देणारी एक घटना घडते, व रणजीतला जगण्याची एक सकारात्मकता निर्माण करते. या कथेतून लेखकाला दुःखातही सुख पेरलेले असते हे सांगायचे आहे.


या सात कथा व शेवटची शीर्षक कथा हजार धागे सुखाचे लेखकाच्या भाषेतच सांगायचे झाले तर आपल्या जीवनात एक धागा दुःखाचा आहे पण हजारो धागे सुखाचे सोबत आहेत व हेच सुखाचे क्षण, हीच उर्मी जगण्याला प्रोत्साहित करते. जीवनाचं मर्म व कर्म यावर संवेदनशील संवादातून कथात्मक अंगाने भाष्य करणारा आशयगर्भ असा हा कथासंग्रह आपल्याला अंर्तमुख करतो. या कथासंग्रहातील भावविश्व जरी सामाजिक अंगाने जात असले तरी या कथात भावनिक उमाळा व कौटुंबिक जिव्हाळा आहे. कथासंग्रह वाचनीय झाला आहे.


कथासंग्रह - किरण सोनार (नाशिक)

                (पत्रकार-लेखक)

प्रकाशन-२६ जून २०२०

चपराक प्रकाशन- पुणे

पृष्ठसंख्या-१८०

मुखपृष्ठ - संतोष धोंगडे

मूल्य-१०१/-


पुस्तक परिचय- सौ. तनुजा उल्हास ढेरे ( एम.ए)




Friday, 8 April 2022

भेटीगाठी- श्याम पेंढारी

 भेटीगाठी  - ललित लेखसंग्रह - श्याम पेंढारी



कुसुमाकर मासिकाचे संपादक श्याम पेंढारी यांचे 'भेटीगाठी' हे पुस्तक अलीकडेच वाचनात आले. जे.के. मिडिया प्रकाशन संस्थेच्या ज्योती कपिले यांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक. चित्रकार सतीश भावसार यांचं उत्कृष्ट मुखपृष्ठ. खरंतर  या पुस्तकाची अर्पणपत्रिका व प्रास्ताविक वाचले आणि मनात कुतूहल निर्माण झाले. या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य असे की लेखकाने चक्क मनीमाऊशी संवाद साधला आहे. आपल्याला भेटलेली माणसे, आलेले अनुभव व मनातल्या गोष्टी लेखकाने अतिशय सहृदयभावनेने हळुवारपणे या आपल्या आवडत्या मनीमाऊजवळ व्यक्त केल्या आहेत. लेखकाचे गावच्या कौलारू घरावर, घरात पाळलेल्या  मांजरींवर व कुत्र्यावर असलेले प्रेम व याचबरोबर लेखक- कवी म्हणून अनुभवलेल्या विविध साहित्यिक घडामोडी, तसेच भेटलेले कवी-लेखक त्यांच्या आवडलेल्या गोष्टी यांना खुल्या मनाने लेखकाने दिलेली दाद भावते. तसेच मनातील खंतही अतीशय संयत शब्दात लेखकाने मांडले आहे. एकशे बारा पानाच्या या छोटेखानी पुस्तकात तीस लेख आहेत व हे लेख नुसते माहितीवजा नाहीत तर या लेखांमधे लेखकाने अतीशय सूक्ष्मपणे प्रत्यक्षात भेटलेल्या व मनात वसलेल्या ठिकाणांचे सूक्ष्मपणे भावचित्रण केले आहे. जसे की 'गिरगाव', 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इ. तसेच लेखकाने वाचलेलं व भावलेलं एखादं मासिक, वर्तमानपत्राच्या रविवारच्या विविध पुरवण्या, कविसंमेलन व कविसंमेलनात भेटलेले कवी व आयुष्यात भेटलेले मित्र व त्यांचे अनुभव या मनीमाऊशी लेखकाने अतीशय सहज आपण एखाद्या मैत्रणिंशी गप्पा माराव्या अगदी तसाच संवाद लेखकाने साधला आहे. आणखिन एक गोष्ट केवळ आठवणी वजा लेखन न करता लेखकाने महागाई, बेरोजगारी, राजकारण, समाजकारण याविषयावरही या पुस्तकातून संवाद साधला आहे. यावरून एक लेखक म्हणून लेखकाची वर्तमानाविषयी जागरूकता व भविष्याविषयी असलेली मनातील काळजी दिसून येते. त्याचबरोबर आठवणींची सुंगधी कुपी आपल्या मनीमाऊ समोर उघडली आहे. प्रसन्न,ओजस्वी व ओघवती भाषा, प्रसंगी कवितेच्या व गीतांच्या ओळी  यामुळे हे लेख वाचनीय झाले आहेत. प्राजक्त, मातीचे घर, मैत्रीचा गाव हे कवितासंग्रह, वळणावरती कादंबरी व कंदील हा लेखसंग्रह ही अन्य पुस्तके देखिल लेखकाची वाचनीय आहेत.


@ तनुजा ढेरे


#भेटीगाठी

#श्याम पेंढारी

आलोक - कथासंग्रह परिचय


 आलोक - आसाराम लोमटे कथासंग्रह 


आ लो क - आसाराम लोमटे

आलोक आसाराम लोमटे

लेखक-पत्रकार-परभणी) यांचा हा कथासंग्रह, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त (२०१६), मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमात  समावेश असलेला हा कथासंग्रह विद्यार्थांना वास्तववादी दृष्टीकोनातून जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तर देतोच परंतु त्याचबरोबर साहित्यिक अंगाने  कथानका मार्फत कथा लेखनाकडे पाहताना कसं पहावं हेही हा कथासंग्रहाद्वारे शेवटी लेखक सांगतो. मुंबईच्या शब्द पब्लिकेशन  जानेवारी २०१० मधे हा कथासंग्रह प्रकाशित केला. 'इडा पिडा टळो' हा कथासंग्रह व 'धूळपेर' लेखसंग्रह अशी आणखी दोन पुस्तकं लेखकाची प्रकाशित आहेत. 'चिरेबंद', 'ओझं', 'खुंदळन', 'कुंभाड', 'जीत' व 'वळण' अशा एकूण सहा दीर्घ कथा या कथासंग्रहात आहेत.


कथासंग्रहाच्या सुरवातीला अर्पणपत्रिकेत लेखक म्हणतो, 'अशांना, ज्यांची मुळं अजूनही मातीत आहेत.' त्यांना समर्पित.  इथेच लेखकाच्या प्रतिभेची चुणूक दिसून येते. अचूक प्रतिमा, प्रतीके व निवेदनशैलीचा वापर करून आपल्या कथाविश्वाला पोषक पायाभरणी करूनच कथाकार आसाराम लोमटे आपल्या कथेतील मूळ गाभ्याला हात घालतात.


'चिरेबंद' या कथेची सुरवातच पाह्यली तर जाणवते, 'दोन-चार दिवसांपासून चालू असलेली पावसाची झड. आभळातून कणी-कोंडा गळत राहावा तशी पावसाची भुरभुर सुरूच.' अगदी अचूक निसर्ग प्रतिमा वापरून कथानकाला लेखक हात घालतो या कथेतून लेखकाने ओघवत्या शैलीत आत्मनिवेदन पध्दतीने, प्रसाद या वीस- बावीस वर्षाच्या तरुण नायक पात्राच्या सहाय्याने कथा उभारली आहे. त्याची आजी, आजोबा व चिरेबंदी वाडा यांच्याशी जोडलेली त्याची नाळ व ओळख, नव्या व जुन्या नातेसंबंधातील वीण, पावसाच्या संततधार लयी सारख्या उलगडत त्यातून निर्माण झालेल्या अस्वस्थ वर्तमानाचे जीवंत चित्र या कथेतून उभे केले आहे.


तशीच  'ओझं' ही कथा, या कथेचं पहिलं वाक्य, डरपोक माणसासारखा पाऊस पळून गेलेला. एखाद्या भित्र्यागत दडी मारून लपून बसलेला त्याच्यात धाडसच नाही धाड धाड आवाज करीत यायचं. एखाद्या धिप्पाड माणसानंही बुळ्यासारखं असावं तसं आभाळाचं येणंही वांझ वाटायलेलं.' दोन भावांची ही कथा एक प्राध्यापक व एक शेतकरी दोघांच्या मनामधील अंतर मांडणारी. कथेची सुरवात, मध्य व शेवट कथेचा घाट बांधून, पात्र, प्रसंग व वातावरण निर्मिती करून पात्रापात्रातील संबध त्यातून वातावरणनिर्मिती करत तसेच त्या व्यक्तीच्या वैयक्तिक पातळीवर/ सामुहिक पातळीवर त्या पात्राच्या मनोभूमिकेत शिरून त्यांच्या मनातील अंतर्गत संघर्षांतून प्रसंगानुरूप निवेदन करत कथांची उभारणी केली आहे. 


'खुंदळन' ही कथा ग्रामीण भागातील राजकारणावर आधारीत असून, ठसठशीत अशा भाषेचा प्रयोग लेखकाने या कथेत केला आहे. उदा : ' आडरानात अब्रू लुटलेल्या बाईसाहेब पोरकेपण भवती दाटून आलं.' ही कथा 'दत्ताराव' या व्यक्तीरेखेभोवती गुंफलेली आहे. ग्रामीण भागातील गटबाजीय राजकारण, त्या राजकारणात सहभागी व्यक्ती, त्याचा कुटूंबातील सर्व सदस्यावर त्याचा होणारा परिणाम अधोरेखीत केला आहे. 'जीत' ही कथाही ग्रामीण परिसरातील राजकीय जीवनावर भाष्य करते,  ग्रामीण जगण्यातले बारीकसारीक संघर्ष अनुभवाच्या पातळीवर साकारले आहेत. प्रथमपुरूषी व तृतीयपुरूषी निवेदनातून पुढे आलेल्या या कथा घटना, प्रसंग व प्रतिमांच्या सुयोग्य वापराने व बोलीभाषेच्या वापरामुळे अजूनच उठावदार झाल्या आहेत.  


'कुभांड' या कथेतून गावातल्या राजकारणात परस्परांचा काटा काढण्यासाठी सामान्य माणसाचा वापर कसा होतो याचे दर्शन होते. तशीच 'वळण’ ही कथा, मनाचा तळठाव गाठणारी  ! शेळ्या राखणाऱ्या व त्यावर गुजराण करणाऱ्या शेती राख्याची लाडकी मुलगी प्रयाग उर्फ पगन. आठव्या इयत्तेत शिकणारी, सातवीला स्कॉलरशिप मिळवळलेली शाळेतील एकमेव मुलगी. तिला शिक्षणाची आवड आहे. आईबापालाही वाटतं की आपल्या मुलीने शिकावे मोठे व्हावे. त्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची त्यांची तयारी असते.  ‘प्रयाग’ रोज वाडीवरून गावातील शाळेत चालत जाते. एक दिवस प्रयाग एकटीच जात असताना वाटेवर कोणाच्यातरी चिरकण्याचा आवाज ऐकू येते, ती मागे वळून पहाते तर डगरीवर तिला एक माणूस दिसतो. तिथे खून झालेला असतो. नंतर पोलीस तिची चौकशी करतात. प्रयागच्या शिक्षणाचं काय होतं हे पूर्ण कथा वाचल्यावर समजतं. या कथेत गरिबांची होणारी ससेहोलपट, त्यांना जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, मुलांना शिक्षणासाठी करावी लागणारी पायपीट, ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलांच्या गळतीची कारणं, हातावर पोट असणाऱ्यांचा आयुष्यातील एक कोडं सुटताच दुसऱ्या कोड्यात अडकावं ही अवस्था वाचकाला अस्वस्थ करते.


लेखक आसाराम लोमटे आपली लेखनासाठी भूमिका मांडताना म्हणतात, "सगळ्यांच्या घड्याळात एकाच वेळी विशिष्ट ठिकाणीच काटे असतील पण सगळ्यांच्या वाटेला आलेला काय सारखाच नसतो." आपल्याला तो वेगळा काळ, ती गोष्ट, तो क्षण पकडता आला पाहिजे. ग्रामीण परिसरातील माणसाच्या जगण्यावर  प्रकाश टाकणारा हा कथासंग्रह आहे. ग्रामीण कथा म्हणजे इरसाल गोष्टी व किस्से या जातकुळीत बसणारी त्यांची कथा नाही. असे लेखक स्पष्टपणे कथासंग्रहात शेवटी लिहिण्यामागची 'भूमि'का या भागात आपली भूमिका मांडताना ठामपणे सांगतात. माझी कथा ही ग्रामीण कथा नसून या कथांचा लिहिण्याचा परिसर जरी ग्रामीण असला तरी या कथा माणसांच्या आणि त्याच्या जगण्याच्या आहेत. तळागाळातील माणसाचा शब्द गुदमरु नये त्याला वाचा मिळावी या अंतरिक प्रेरणेतून मी लिहितो आहे. 


ग्रामीण जीवनातील  जीवन जगत असताना नैसर्गिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवस्थेला, अडचणींना तोंड देताना, ग्रामीण माणसांच्या मनाची तगमग, अहाय्यता व शोषण त्याबरोबर आनंद व दुःखाचे क्षण या कथासंग्रहातील कथातून संवेदनशील रित्या लेखकाने मांडले आहेत. केवळ शेत, शेतकरी, दुष्काळ इथपर्यंत न थांबता शेतमजूर, कामगार, दलित, स्त्रिया यांच्या दैनंदिन जगण्यातील संघर्ष  अतिशय तळमळीने अंतरिक उर्मीने कथातून आला आहे. माणसाच्या मनाचा तळ शोध घेताना, मनाचा तळ गाठला यायला हवा व तो आपल्याला त्या कथेच्या वा पात्राच्या अनुषंगाने आपल्या कथेत त्या कथेचा पात्र प्रसंग व निवेदनानुसार कथानकाच्या भाषेतूनच मांडता यायला हवा. 


खरंतर आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असताना आपल्यासमोर अनेक अडीअडचणी असतात. वैयक्तिक व सामूहिक पातळीवर सर्व स्तरावर अनेक प्रश्न उभे असतात परंतु आपण स्वतःच्या कोषात एवढे अडकलेले असतो की सभोवताली काय चाललंय तेच आपल्याला कळत नाही. आपल्या जाणिवा बोथट होत जातात. आपण काळानुसार समुहा बरोबर न चालता वैयक्तिक आपले जीवन जगण्यात मशगूल झाले आहोत.   आणि नेमका हाच धागा लेखक आसाराम लोमटे यांनी आपल्या या कथासंग्रहात पकडला आहे. काळानुसार बदलणारे प्रश्न व बदलती संवेदना यांचे सामुहिक जीवन जगताना अनुभवाच्या पातळीवर होणारी मनाची घुसमट व अस्वस्थता त्यांनी आपल्या कथांतून मांडली आहे.  त्यांची कथा ही समूहाची कथा आहे.


तसे पाह्यले तर विसाव्या शतकाचा प्रवास चालु आहे. ग्रामीण भागात आता बरेच बदल होत आहेत, या अनुषंगाने ग्रामीण भाग नागर होत चालला आहे. आलोक मधील कथा या निमशहरी ग्रामीण जीवनाच्या वर्तमानावर भाष्य करणाऱ्या आहेत. शेतकरी हे ग्रामीण जीवनाचं मुख्य अंग आहे. शेती हा परंपरागत व्यवसाय व अनुषंगानेच येणारे प्रश्न, निसर्गाचा प्रकोप, दुष्काळ, अज्ञान, गावातलं राजकारण अशा अनेक विषयांना हात घालत ग्रामीण जगण्यातील ज्वलंत व जिवंत अनुभव आपल्यासमोर वास्तव जगण्याच्या पातळीवर लेखकाने उभे केले आहेत. वास्तविक दृष्टिकोनातून ग्रामीण माणसाच्या जगण्यावर प्रकाश टाकणाऱ्या या कथा साहित्यिक मुल्यांच्या पातळीवर सर्वांगाने उतरल्या आहेत. 


ग्रामीण जगणं जगत असताना काळ्या मातीशी नाळ जोडलेल्या व  त्या मातीतूनच उभारीने उभं राहून उगवलेल्या प्रत्येक नव्या दिवसाच्या चांगल्या बऱ्या वाईट अनुभवाना तोंड देत चार उन्हाळे-पावसाळे पाहिलेली,  समोर उभ्या परिस्थितीशी जुळवून घेताना होत असणारा प्रासंगिक संघर्ष, मनातील अस्वस्थता व त्याच बरोबर त्या पात्र व्यक्तिरेखेबाबतचा जिव्हाळा ओलावा याची करूण छटा लेखकाने आपल्या कथानकातून हुबेहुब जीवंत चित्रित केली आहेत. त्यांच्या निवेदनातून व बोली संवादात्मक शैलीतून त्या घटना ती पात्रे आपल्याशी जीवंत बोलत आहेत असे वाटते. वास्तववादी दृष्टिकोनातून कथा मांडताना कथेला कलात्मकतेची जोड देत व्यापक आशयअंगाने पुढे येत  वाचकाच्या मनाचा तळ गाठतात व वाचकास समकालीन कालखंडाच्या चाकोरीतून समोरच्या वास्तवाकडे उघड्या डोळ्याने पाहण्याची नवी दृष्टी देतात हे या कथासंग्रहाचे यश आहे. 


कथासंग्रह- आलोक

लेखक - आसाराम लोमटे

प्रकाशन - शब्द पब्लिकेशन मुंबई 

पृष्ठसंख्या 

मूल्य -२५० रुपये

पुस्तक परिचय- सौ.तनुजा उल्हास ढेरे ( एम.ए- मराठी)


#आलोक


#आसाराम लोमटे


नेट- सेट स्पर्धा परिक्षांना सामोरे जाताना


 नेट- सेट परिक्षेला सामोरे जाताना


सेट- नेट या दोन्हीं परिक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. अगदी सहा ते सात टक्के रिझल्ट लागला. त्यातही नेट परिक्षेत वयोमर्यादा व मेरीटप्रमाणे जेआरएफ मिळते. खरंतर ही परिक्षा आजच्या युवापिढीसाठी त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी एक उत्तम अशी संधी आहे. परिक्षाभिमुख अभ्यास केला तर यश तुमच्यासमोर उभे आहे. या परिक्षांचा अभ्यास करताना मला जाणवलेली गोष्ट म्हणजे  इतिहास, इंग्रजी, संस्कृत, हिंदी या भाषा विषयाच्या तुलनेत मराठी हा विषय घेऊन परिक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच मराठी विषयाचा कटऑफही कमी आहे. नेट- सेट या परिक्षांचा मागील तीन- चार वर्षाचा निकाल जर पाहिला तर ४८ ते ५० % सरासरी मराठीचा कट ऑफ लागतो खुल्या प्रवर्गासाठी आणि इतर गटासाठी ४४ ते ४८ % कटऑफ लागतो. यावर्षी नेटमधे मराठी विषय घेऊन २५२५ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी १७१ विद्यार्थी असिस्टंट प्रोफेसर यापदासाठी क्वालीफाय झाले तर २३ विद्यार्थ्यांना जेआरएफ मिळाली. सेट परिक्षेत साधारण ४७०० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २८२ विद्यार्थीच क्वालीफाय झाले. मराठी विषयात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एवढी कमी का ? ते कुठे कमी पडतात ? याचं कारण काय ? या परिक्षा देताना मुलांना काय अडचणी येतात ? याचा थोडा अभ्यास केला असता जाणवलेली गोष्ट कोणती तर परिक्षांच्या अभ्यासक्रमाची पुरेशी माहिती नसणे. अभ्यासक्रमास असलेले घटक, उपघटक कोणते ? त्या घटकातील मुद्दे-उपमुद्दे  संकल्पना यांचा आकलनात्मक अभ्यास करून वस्तुनिष्ठपध्दतीने कसा प्रश्न येऊ शकतो हा विचार इथे महत्वाचा आहे असे वाटते. पेपर पहिला हा अध्यापन अभियोग्यता चाचणीपर दहा घटक ५० प्रश्न १०० गुण व दुसरा पेपर मुख्य विषय दहा घटक १०० प्रश्न २०० गुण अशी एकूण ३०० गुणांची ही परिक्षा. पास होण्यासाठी सरासरी ४० ते ३५ % गुण हवे. त्यातही मेरीटप्रमाणे सहा टक्के विद्यार्थी क्वालिफाय होतात. 


मुलांमुलींना यातील घटक - उपघटक यांची अपुरी माहिती असते. यु.जी.सी. नेट- सेट यांनी ठरवून दिलेला अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध आहे. तो आपल्याला माहितच असायला हवा. नव्हे सतत डोळ्यासमोर असायला हवा.

या अभ्यासक्रमानुसार आवश्यक असणारे संदर्भ ग्रंथ आपण वाचायला हवे. प्रत्येक घटकांचे उपघटकांचे वर्गीकरण करून माहिती संकलीत करून वर्गवारी करायला हवी. सूक्ष्म अभ्यास करून नोटस काढायला हव्या. केवळ  भारंभार नोटस गोळा करून पुस्तकांची थप्पी लावण्याच्या मागे न लागता. विश्वासाहार्य व दर्जेदार अभ्यासक्रमास पूरक असे साहित्य वाचावे. नाहीतर नुसती ती पुस्तके पाहुनच घाबरायला होतं, आता कधी वाचू, कसं होईल ? हा विचार करत बसण्यापेक्षा हातात आहे ते उत्तमरित्या अभ्यासणे महत्वाचे आहे. बाजारात अनेक वस्तुनिष्ठ प्रश्नसंच व माहितीचे विषयानुसार संच मिळतात. अर्थात ते कधी उपयोगी पडतात जेव्हा तुम्ही मूळविषयाचे संदर्भ ग्रंथ वाचले असतील तरच त्या प्रश्नाचें तुम्हीं आकलन करू शकता. नाहीतर नुसतेच वाचलेले डोक्यावरून जाईल. आपल्याकडे जे काही साहित्य आहे त्यापासून सुरूवात करून अभ्यासाचे नियोजन करावे. आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेच्या मर्यादा विचारात घेऊन त्यानुसार वाचन करणे, नोटस काढणे, प्रश्नपत्रिका सोडवणे याचा सतत सराव करायला हवा. 


आपण आपले ध्येय बी.ए. व एम.ए ला असताना ठरवलेले असले तर याचा खूप फायदा होतो. कारण तुमचा पाया मजबूत असेल तर या परिक्षाचं आव्हान पेलणं कठीण नाही. महाविद्यालयात शिकत असतानाच अभ्यासक्रमास असलेले ग्रंथ व संदर्भ ग्रंथ यांचे वाचन केलेले असेल तर बऱ्याच संकल्पना स्पष्ट होतात. तुमचा परिक्षेच्या दृष्टीकोनातून पाया तयार होतो. ही परिक्षा तुमच्या बौध्दिक क्षमतेवर आधारीत आहे. मराठी विषयाचा विद्यार्थी हा प्रतिभेच्या व कल्पनेच्या अंगाने जास्त विचार करतो. इथे तर्कबुध्दी, आकलणक्षमता व निर्णयक्षमता खूप महत्वाची. ही वाढवण्यासाठी आपले वाचन वाढायला हवे, त्यावर आधारीत संकल्पना स्पष्ट हव्या, प्रश्न व उत्तर यांचा अभ्यास हवा. एक प्रश्न व त्याचे चार पर्याय, एक  उत्तर व इतर तीन पर्याय त्याचे तीन प्रश्न तयार होतात, त्यांच्या उत्तराचा शोध घ्यावा.


स्वतःच्या मर्यादा कुठल्या आहेत. कोणते घटक कच्चे आहेत ? कोणते घटक पक्के आहेत ? प्रश्नपत्रिकेची, अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी कशी आहे, हे विचारात घेणे गरजेचे आहे. जे घटक आपले कच्चे आहेत ते पक्के करणे, पहिल्या वाचनात नाही कळाले तर परत वाचन करणे गरजेचे आहे. आपल्या मित्रमैत्रणिंशी संकल्पनात्मक वा त्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणे. सर्वांनी मिळून संदर्भ ग्रंथ वाचन करणे. नोटस काढणे. रोज एक विषय ठरवून त्यासंदर्भात वाचन व चर्चा केल्याने व घटक वाटून घेतल्यास अभ्यास जलद व सर्वांगीण होण्यास मदत होते. वेळ वाचतो. एकत्र मिळून प्रश्नपत्रिका सोडवणे. प्रश्नांच्या उत्तरापर्यत पोहचण्यासाठी कोण कशा पध्दतीने विचार करत आहे हे पहाणे. आपण कशा पध्दतीने विचार करतो हे पहाणे. आपणच आपले अवलोकन करून आपल्या अभ्यास क्षमता वाढवल्या पाहिजेत. वाचन, आकलन, मूल्यमापन व अर्थनिर्णयन या प्रक्रियांचा विकास आपल्या अभ्यास प्रकियेत समतोलपणे केला पाहिजे.


रोज दोन तास तरी सातत्याने अभ्यास करायला हवा. मग तो वाचन स्वरूपात, ऐकण्याच्या स्वरूपात, चर्चात्मक अथवा नोटस काढणे असो. आताच्या या युगात तर आपल्या हातात इतका प्रचंड माहितीचा खजिना आहे याचा योग्य वापर करायला हवा. विश्वकोश, विकिपिडिया यासारखे माहितीस्तोत्र उपलब्ध आहेत. ई माध्यामातून विकिपिडिया, विश्वकोश, ब्लाॅग यावरील अभ्यासक्रमानुसार विषयाशी निगडीत माहिती वाचन करणे. वेळ मिळेल तसे युटयूब वरील उपलब्ध विषयासंदर्भातील उपलब्ध मार्गदर्शकांचे विचार ऐकणे. या गोष्टींचा खूप फायदा होतो. सोशलमिडिया वा अवांतर मनोरंजनात्मक गोष्टीसाठी कमी वेळ देऊन, या साधनांचा सकारात्मक योग्य वापर करायला हवा.


पेपर १ मधील घटकांचा अभ्यास करताना मनावर दडपण न ठेवता. मला जमेल का नाही. माझे कसे होईल या गोष्टींचा विचार न करता. अभ्यासाला लागा. संकल्पना समजून घ्या त्या अनुषंगाने नोटस काढून. नविन संकल्पनांची ओळख करून घ्या. राज्यस्तरीय सेट परिक्षा देताना मराठी व इंग्रजी ही दोन्ही भाषा माध्यमे आपल्याला उपलब्ध आहेत मात्र नेट परिक्षा देताना भाषाविषयक अडचण निर्माण होते. राष्ट्रीय स्तरावरची ही परिक्षा पेपर एकचे माध्यम हे हिंदी व इंग्रजी व त्याची काठिण्यपातळी वरची थोडी जास्त आहे. त्यामुळे इथे मराठी विषयातील विद्यार्थ्याना मेहनत घ्यावी लागते.


नेट सेट परिक्षे बाबत माझा अनुभव सांगायचा झाला तर, पुण्यात काॅलेजमधे असतानाच मी एम.पी.एस.सी व यु.पी.एस.सी या स्पर्धापरिक्षांचा अभ्यास केला होता मात्र वैयक्तिक कारणाने परिक्षा दयायचे राहुन गेले. मात्र आता संधी सोडायची नाही ही जिद्द बाळगळूनच पूर्वी बी.ए.इंग्रजी व एम.ए.राज्याशास्त्रातून झालं होतं. परंतु मराठी विषयाची रूची २०२०-२१मधे मी मुंबई विद्यापीठ आयडाॅल मधून  एम.ए प्रथम श्रेणीत पूर्ण केलं एम.ए चा अभ्यास करत करतच  सेट परिक्षा दिली. ही परिक्षा दिल्यानंतर आत्मविश्वास वाढला व पुढे दोन महिन्यातच नेट ही परिक्षा होती. सेट परिक्षेचा अनुभव पाठिशी, परत राहिलेल्या विषयांची उजळणी केली.  पेपर एकचा अभ्यास कमी पडतोय असं वाटले ती बाजू पक्की करण्याचा प्रयत्न केला. नुसतंच वाचत न जाता मन लावून स्मरणात राहील असा अभ्यास केला. स्वतः प्रश्नसंच बनवले व सोडवले. पहिल्याच प्रयत्नात नेट परिक्षेत यश मिळवेन ही मनाशी खूणगाठ बांधली व सातत्याने अभ्यास केला. एम.ए करताना रोज दोन-तीन तास अभ्यास करायचे तिच सवय पुढे सलग दोन वर्ष जोपासली व अभ्यासात ऐनकेन प्रकारे सातत्य ठेवले. माझे पक्के व कच्चे विषय कुठले. आपण कुठे कमी पडतोय याचं स्वतःच परिक्षण केलं. स्वतःशीच आपली स्पर्धा ठेवली. जास्तीत जास्त बेस्ट दयायला हवं या दृष्टीकोनातून शांत डोक्याने जास्त विचार न करता. परिक्षा केंद्रात फक्त पेपर प्रश्न आणि मी बाकी सगळं विसरून, उगाच कुठलातरी पर्याय टिक करायचाय म्हणून टिकमार्क न करता. जास्तीत जास्त चांगला  प्रयत्न उत्तरापर्यंत पोहचण्याचा केला.


अभ्यास करताना इंग्रजी-हिंदी शब्दांच्या अर्थासाठी डिक्शनरी सोबत ठेवली. मराठी व्याकरण वर्ग केले. तसेच मो.रा.वाळींबे व्याकरण दोन तीन वेळा उजळणी केली. प्रदक्षिणा खंड १ व २, साठोत्तरी साहित्य प्रवाह शरणकुमार लिंबाळे, लोकसाहित्याचे स्वरूप डाॅ. प्रभाकार मांडे, ग्रामीण साहित्यप्रवाह स्वरूप आणि  समस्या आनंद यादव, वर्णनात्मक व ऐताहासिक भाषाविज्ञान संपादित स.गं.मालशे, ईनामदार, अंजली सोमण असे प्रत्येक घटकानुसार एक तरी मूळ संदर्भग्रंथ वाचने आवश्यक आहे. मुख्यत्वे करून मुंबई, पुणे, शिवाजी, नाशिक मुक्त विद्यापिठाच्या पुस्तकांचा वापर अभ्यासासाठी केला. पेपर एक साठी शशिकांत अन्नदाते यांचे 'अध्यापन व संशोधन अभियोग्यता संपूर्ण मार्गदर्शक'  हे पुस्तक, धानय्या कवठगीमठ यांचे पेपर १ अध्यापन व संशोधन अभियोग्यता' हे पुस्तकही अभ्यासले तसेच नेट परिक्षेसाठी विशेष हरप्रीत कौर यांचे नेट/सेट/जेआरएफ हे इंग्रजीतील पुस्तक अभ्यासले. हा पेपर एकचा अभ्यास प्रत्येकाने करायलाच हवा. बुध्दीमत्ता चाचणी, उताऱ्यावरचे प्रश्न यांचा सरावही करायला हवा. कारण या परिक्षांची काठिण्यपातळी जास्त आहे.


नेट परिक्षेची तयारी करताना प्रश्नपत्रिका वाचन केले. पेपर एक हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून प्रश्नांचे स्वरूप कसे आहे हे आकलन करून घेतले. तसेच मराठी विषयाचा अभ्यास करताना मराठी विषयाचा आवाका खूप मोठा आहे तेव्हा मराठीच्या उत्तपत्तीपासून, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक मराठी वाडःमय, साठोत्तरी साहित्यप्रवाह त्यातही मग स्वातंत्र्यपूर्व- स्वातंत्र्योत्तर, साठोत्तरी, नव्वदोत्तरी असा वाडःमयीन कालखंडानुसार, साहित्यप्रकाराच्या उद्गम, विकास असा अभ्यास केला. वृषाली विनायक यांचे नेट-सेट मार्गदर्शन शिबीरात सहभागी झाले. याशिबारामुळे मला मराठी विषयाच्या अनुषंगाने अभ्यासाची योग्य दिशा व बैठक मिळाली. याच कालावधीत परिक्षेदरम्यान ऑनलाईन-पध्दतीने अनेक मोफत नेट-सेट मार्गदर्शन वर्ग घेतले जायचे ते केले. प्रा.डाॅ. राहुल पाटील हे नेट सेट परिक्षेबाबत एक टेलीग्राम चॅनल चालवतात त्यावर ते दर रविवारी सरावपरिक्षा घेत त्याचा उपयोग झाला. तसेच प्रा.डाॅ. महादेव जगताप, प्रा.डाॅ चौधरी, डाॅ. राहुल पाटील सरांच्या या युटयुब चॅनलचे रोज घरकाम करताना परिक्षेसंदर्भात व्हिडीओ ऐकले याचा फायदा झाला. खरंतर ईच्छा तिथे मार्ग म्हणतात ना त्याप्रमाणे ईच्छा असेल तर वेळ निघतोच. आणि या दिवसात मलाही याचा अनुभव आला तुम्हालाही येईल फक्त तुमचं ध्येय मात्र निश्चित असायला हवं व ते प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक कष्ट घेण्याची तयारी हवी.


तनुजा ढेरे.

एम.ए. मराठी सेट-नेट

ठाणे.


#नेट


#सेट


Net


Set



Friday, 25 March 2022

माझा लेखन प्रवास

साहित्य निर्मिती प्रक्रिया आणि माझे लेखन 
/ साहित्यनिर्मितीचे सृजनभान


साहित्य निर्मितीचा क्षण खरंतर हा विषय तसं म्हटलं तर खूप गंभीर म्हटलं तर सहज, सुलभ व तितकाच चुटकीसरशी सुटणारा आहे. आपण आपल्या साहित्य निर्मितीचा क्षण कसा अनुभवतो यावर बरंच आपलं साहित्य अवलंबून असतं. साहित्य निर्मिती हे जबाबदारीचं काम आहे. साहित्य ही समाजाशी निगडीत अशी कलाकृती आहे. समाजाच्या विविध अंगाचे दर्शन या साहित्यिक निर्मितीतून होते तेव्हा त्या कलाकृतीला वेगळेच महत्व प्राप्त होते. मात्र तेच जर आपण ती साहित्य निर्मिती स्वःच्या पातळीवर पुढे आणली तर ती स्वःअनुभवाच्या पातळीवर मर्यादीत स्वरूपात वाचकांच्या समोर येते. एका विशिष्ट पातळीवर, विशिष्ट विषय, आशयाला धरून एकच आशय पुढे येतो त्यावेळी त्या निर्मितीची व्यापकता स्थिरावते. मात्र सामाजिक अंगाने मी व स्वःची प्रतीमा सोडून आपण समाजाचा एक घटक या नात्याने लेखन केले तर त्या लेखनाचा पट  वैश्विक पातळीवर मोठा होतो व आपसूकच व्यापकता वाढते. कविता, ललित, कादंबरी, कथा व अनुवाद असे विविध साहित्यप्रकार हाताळताना माझा लेखनअनुभव अधिक समृध्द होत गेला. जाणिवा प्रगल्भ झाल्या व कसदार लेखन म्हणजे काय ? साहित्यनिर्मितीचे भान म्हणजे काय? आपण लिहितो म्हणजे नेमकं काय करतो ? वाचकाची भूक लक्षात घेतो का ? हे प्रश्न मनात उभे राहात असतानाच यांची उत्तरे शोधण्याची धडपड मला माझ्या लेखन प्रवासाच्या वाटेवर परत परत आणून सोडत होती.

साहित्य निर्मिती हा जितका किलिष्ट व अवघड विषय आहे तितकाच गंमतीशीर व सोपाही कारण कधी काय सुचेल लिहायला हे आपण सांगू शकत नाही. कधी कधी लिहायला बसल्यावर महिनोंमहिने काहीच सुचत नाही. नुसतंच मन भरकटत राहतं तर कधी कधी एकदा लेखनी उचलली की शेवटपर्यंत आपण लिहितच जातो व आपली साहित्य निर्मिती कधी पूर्णविरामापर्यंत पोहचते हे आपल्याला कळतही नाही.

खरंतर वाचन व आपल्या आजुबाजूचं वातावारण हे आपल्या साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका पार पाडत असतं. जितके आपले वाचन व जीवनअनुभव समृध्द तितकं आपलं लेखनही समृध्द व आशयघन होतं. आपल्या लेखन कक्षांचा विस्तार अधिक होतो. लेखन करताना मर्यादा येत नाहीत. वाचन हा लेखनाचा मुलभूत स्तोत्र आहे, दिशादर्शक असा मार्ग आहे. विविध विषयावरील लेखन करताना आधारभूत असे संदर्भ घेऊन आपण लेखनपूर्व अभ्यास केला तर आपले लेखन अधिक सदोष होते मात्र लेखन करताना आपली अभिव्यक्ती व लेखनशैली आपल्याला कायम पकडून ठेवता आली पाहिजे. तशीच्या तशी अभिव्यक्ती आपण वाचलेल्या लेखकांच्या प्रतीमा उचलून आपल्या लेखनातून उतरवणे योग्य नाही. एखाद्या लेखकाचे अनुकरण करणे म्हणजे त्याचे तसेच्या तसे लेखन उतरवून आपले लेखन आहे असे सांगणे नव्हे हे चूक आहे. तर त्या लेखकाची शैली, लिहिण्याचे तंत्र समजून घेऊन आपण आपल्या अनुभूतीनुसार लेखन करणे.

कविता:- आयुष्य हे सहजसुंदर जगणं आहे ! मात्र ते जगता यायला हवं. आणि हे जगणं उत्कट, संवेदनशील असेल तर आपोआपच मनात भाव फुलतात. खरंतर प्रत्येक कलाकृतीचा अर्थ लावायचा नसतो असं मला वाटतं, अर्थ शोधणं काही गैर ही नाही. पण त्याचबरोबर काही कलाकृतीतून मिळणारा आनंद हा आत्मिक असतो तो घेता आला पाहिजे. काही कलाकृतीचा अर्थ लावता येत नाही तंतोतंत, त्यातून विशेष काही वैचारिक मंथन होते असेही नाही. मात्र त्या कला निर्मितीतून व कला आस्वादातून जो आनंद मिळत असतो आपल्याला तो निरामय असतो. अगदी सहज, उत्कट, तरल अनुभूती हे त्या कलाकृतीचं वैशिष्टयै असतं. निसर्गाची रचना व त्या अनुषंगाने येणारी अनुभूती मला अशीच तरल, उत्कट व संवेदनशील प्रत्येक मानवी मनाला स्पर्शून जाणारी कलाकृती वाटते.

इंग्रजीतील प्रसिद्ध कवी वर्डस्वर्थ यांनी "भावनांचा उत्कट, सहजस्फुर्त आविष्कार म्हणजे कविता" अशी कवितेची व्याख्या केली आहे. अर्थात कवितेतच नव्हे; तर एकूणच साहित्य व कलेत भावना महत्त्वाच्या असतात हे अगदी खरे आहे. मात्र या भावनांना अभ्यासाची जोड जर मिळाली तर श्रेष्ठ कविता, श्रेष्ठ कलाकृती जन्माला आल्याशिवाय राहत नाही. कविता ही तंत्र मंत्र शिकून, विचार करून, अभ्यास करुन लिहिता येत नाही तर कविता ही सहज उत्सफुर्तपणे सुचली पाहिजे. कवितेच्या सर्जनशिलतेला जेव्हा तंत्र आणि मंत्राची जोड मिळते तेव्हा उत्तम काव्य निर्मितीचा आपल्याला आनंद घेता येतो. खरंतर आपल्याला एखादा, प्रसंग, घटना, भाव मनाला स्पर्शून जातो. एखादी व्यक्ती, तिचा स्वभाव मनात ठसतो तेव्हा मनात विचाराचं मंथन चालू होतं. जेव्हा आपली कल्पनाशक्ती सर्जनशिलतेचा तळ गाठते तेव्हा आपोआपच आरस्पानी कविता शब्दरुपाने कागदावर प्रतिंबिंबित होते. कविता ही कधी कागदावर केव्हा उतरेल हे मात्र सांगतां येत नाही. किती वेळात कविता लिहून होईल हेही सांगतां येत नाही. तसेच कधी सुचेल हे कुठलाही कवी सांगू शकत नाही. कधी कधी एखादी कविता अगदी दहा ते पंधरा मिनिटात लिहून होईल तर कधी कधी सहा सहा महिने कवितेतील ओळ पुढे सरकत नाही. 

आपली प्रत्येक कविता विषयानुरूप एका विशिष्ट भूमिकेतून, प्रतिमेतून, विषयातून आशयगर्भतेला स्पर्शून अवतरली पाहिजे. निसर्ग हा माझ्या कवितेचा प्रमुख स्तोत्र आहे. त्याअनुषंगाने माझ्या अलीकडील कवितासंग्रहातील प्रत्येक कवितेला एक वेगळी पार्श्वभूमी, भाव, आशय व गंध आहे. भावनांचे, प्रहराचे पदर उलगडत असताना कवितां ऋतूंचं बोट धरून पुढे पुढे सरकत जाते, कधी अजाण बालकासारखी तर कधी तारूण्युलभ भावनाने, आनंदाने प्रवास करत राहते. प्रत्येक ऋतूच्या गळ्यात गळा घालून पुढे जाताना ऋतूगंध मनात भरून कविता उत्तरोत्तर अधिकच फुलते. निसर्गाची अद्भुत किमया शब्दांतून कवितेत रंग भरते. कवितेत प्रेम, विरह, सुख, दु:ख, हे सगळे भाव निसर्गाच्या विविध छटांतून व्यक्त होताना, लिहिताना इतके तादात्म पावतात. प्रहराचे विविध पदर आणि मनातले आपले हळवे भाव, जसे जसे समोरच्या दृश्याशी एकरूप होत जातात तसं तसं मनऋतू मिलनाचा भाव शब्दांना फुटत जातो, तेव्हा ऋतूंचा पानाफुलांचा, झाडावेलींचा आगळावेगळा श्रृंगार बहरून येतो. मनझुल्यावर झुलताना मन पाखरू बनून आकाशात उडू लागतं. आभाळ निळं जांभळं गुलाबी रंगलेलं जेव्हा रंग घरभर पसरू लागतात तेव्हा आपोआपच एक एक रंग गडद होत जाताना संधीप्रकाशातून अंधाराकडे झुकणारी रात्र मनात घर करायला लागते. काळोखात उगवणाऱ्या चांदण्यां बोलू लागतात मनातलं तेव्हा चांदण्यांशी संवाद साधताना आपोआपच भावविभोर होऊन कागदावर टपोरं चांदणं होऊन उतरतात.

ऋतूचे स्वभाव जसे  बदलतात तसे आजुबाजूचे वातावरण ही बदलते. मी कविता लिहीत असताना निसर्गाशी एक अनोखं नातं जुळलं. प्रेमभाव, विरह, आठवणी, वेदना शब्दाशब्दातून व्यक्त होताना निसर्गाचं व मनाचं एक वेगळचं नातं शब्दांतून गुंफले जात होते व यातूनच अनेक प्रसंग डोळ्यांसमोर असताना मनात  भाव निर्माण होताना काव्यचित्र शब्दाद्वारे साकारत होते. केवळ निसर्गच नव्हे तर असे किती तरी आशय विषय सतत मनात रेंगाळत असताना भावतरंग जसं जसे फुलत गेले तसं तसे कविता अंतरंगात फुलत गेली आणि कविता हे जगणं कधी झालं कळले नाही. 

ललित :- माझी लेखनाला सुरवात कवितेतून झाली. सुरवातीला मी मनातल्या मनात अव्यक्त आठवणींचा गोफ विणायला लागले होते. सुरवातीला लिहायला आवडायचं म्हणून लिहीत होते. परंतु जेव्हा मी पद्य लेखनाकडून गद्यलेखनाकडे वळले आपसूकच मला माझी नवी वाट गवसली.  कवितेतून जसा निसर्ग झरत होता. तसेच या गद्यलेखनातून निसर्गाच्या छटा मी रेखाटू लागले. अगदी छोटेखानी, तरल, सौंदर्यपूर्ण असे लेखन लेखनीतून बहरू लागले. त्या लेखनाला एक लय आहे व ते सुंदर ललित आहे असे अनेकांनी सांगितले व तू उत्तम ललित लिहू शकते असा विश्वास दिला तेव्हा मी अधिक जोमाने या प्रकारातल्या लेखनाकडे वळले. ललितलेखन म्हणजे काय? ललितलेखनाची वैशिष्टयै काय हे जाणून घेतले.

तसं पाह्यला गेलं तर गद्य व पद्य यांतील धूसर रेषा म्हणजे ललितलेखन होय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता आपण ललित लेखनाची वैशिष्टयै पाहू, रंग गंधासह सजीव चित्र उभा करणं, अवतीभवतीचा परिसर, माणसं यांचं बारकाईने निरिक्षण करून आपल्या दृष्टीकोनातून तो अनुभव समृध्द करून सहज सोप्या, भाषेत लिहिताना, गोड रसाळ, मधुरभाषा, सौंदर्यपूर्ण, उपमा, अलंकार यांचा वापर करून भाषासौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न ललितलेखनात केला जातो. लेखनाचा छोटा आलेख पण आशय गहन असा आकृतीबंध असतो. आणि तो पूर्णपणे आपल्या अनुभवाच्या पातळींवर उतरलेला लेख असतो. त्याला वास्तवाची जोड असते. ललित लेखनाची भाषा ही लालित्यपूर्ण चटकदार खुसखुशीत असते. नर्म विनोदी प्रसंग वापरून तर कधी नेमकीच विधाने वापरून, आटोपशीर लेखनपध्दती ललितलेखनात अवलंबता येते, ललितात्मक लेख वाचताना त्यात आपल्याला लय, नाद, माधुर्य, काव्यात्मक स्पर्श  त्या लेखनाला जाणवतो. व्यवस्थित, नीटनेटकेपणा, अभिनव आशयाबरोबरच मांडणीचे नवनवीन प्रयोग करायला ललितबंधामधे वाव असतो. विविध विषय हाताळायला हा उत्तम गद्य प्रकार आहे.

खरंतर जेव्हा सुरुवातीला मी  लिहीत असताना मी ललित लिहित आहे हे माहित नव्हतं. मी सहज सुचेल ते लिहित होते. लिहित असताना कधी कधी आजोळच्या अंगणातला पिंपळ मनात सळसळायचा. कधी वाड्यातला झोपाळा खुणवायचा. पार्वतीआजीचं कपाळावरलं हिरव्या मेणात कोरून लावलेलं रुपायाएवढं कुंकू, दादाच्या खांद्यावरचं उपरणं, ताईआजीचं तिन्हीसांजेला ढाळजात पांढऱ्याशुभ्र कापसाच्या वाती वळणं, कबईने मायेने हातावर ठेवलेला लोण्याचा गोळा, कधी वडिलांच्या वडिलोपार्जित गावातला वाड्याचा फिरकीचा दरवाजा, गावातलं मारुतीचं मंदिर, काकूआजीच्या हातचा शेळीच्या दुधाचा कोरा करकरीत चहा, आप्पाआजोबांच्या बटव्यातला रुपया, धान्यानं भरलेल्या कणगी, उतरंडी मनात भरून राहिलेल्या. अशा मनात रूंजी घालणाऱ्या अनेक आठवणी कागदावर रित्या होताना एक वेगळाच आनंद देत होत्या.

जेव्हा जेव्हा एकांती कधी पहाटेला लिहायला बसायचे तेव्हा आजोळच्या वाड्यातला, गोठ्यातल्या गाई बैलांच्या गळ्यातला घुंगुरमाळांचा खुळखुळ आवाज मला ऐकू यायचा. तो नाद कानात रुणझुणत असताना शब्द कागदावर झरझर उतरायचे. कधी कधी भरदुपारचा एकांत अस्वस्थ करायचा.  अंगणातल्या सावल्या विसावताना मन बालपणीच्या आठवणींत रमायचं नि मनाचा हा विरंगुळा व त्या आठवणी कागदावर टिपाव्या असं वाटायचं. सांजवेळी सांजनिळाई मनगाभाऱ्यात दाटून यायची. आईची एखादी आठवण किंवा आजीचे शब्द आठवायचे.  तेव्हा मन आपसूकच भरून यायचं. शब्दांच्या पागोळ्या कागदावर टपटप टपटपायच्या. या पागोळ्या सर सर ओळींच्या नाजूक भावधाग्यात ओवायच्या. तेव्हा याच्या दर्वळानं मनगंध फुलायचा आणि खूप प्रसन्न, आनंदी वाटायचं.

एका छोट्याशा गावातून नवीनच लग्न होऊन मी आलेली. कोणाचीही ओळख नाही, काही नाही. सगळे नातेवाईक दूर राहणारे. निसर्गात रमणारं माझं मन. डोंगर वनराईत वसलेलं माझं माहेर एक छोटंसं गाव. माहेरच्या अंगणातला प्राजक्त, गुलमोहर, अबोली, गुलबाक्षी, हजारी मोगरा, जाई-जुई, चमेलीच्या वेलींशी असलेलं नातं. यांना सोडून मी मोठ्या शहरात राहायला आले. माहीत नव्हतं, की कसं असणार ते शहर, हे नवीन जग. नव्या नवलाईचे, प्रीतीचे अन् सासरच्या कौतुकाचे ते दिवस. तसं मुंबईत राहायला आले याचं आकर्षण होतंच.  पण या ब्लाॅक सिस्टिमच्या सिमेंटच्या संस्कृतीत घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या  माणसांमध्ये मन रमणं तसं मुश्किल होतं. पण एक गोष्ट अतिशय सुखावणारी होती. वर्षातला घामाघूम करणारा कडक उन्हाळा आणि ऑक्टोबरचं कडक ऊन सोडलं तर हिवाळा अन् पावसाळा. सतत चार महिने पडणाऱ्या या पावसानं मन मात्र जिंकलं. कारण खरा पाऊस अनुभवला म्हणण्यापेक्षा मनात भरला तो इथेच.
                   
अंगण नसलं तरी माझ्या दिवसाची सुरुवातच खिडकीत चिवचिवणाऱ्या पाखरांनी होऊ लागली. सातव्या माळ्यावरून किचनच्या खिडकीतून दिसणारं ते निळं आभाळ अन् उंच आकाशात भिरभिरणारे पाखरांचे थवे एकसारखे पाहण्यात मन गुंग होऊ लागलं. दूर रस्त्यावर उभी स्तब्ध हिरवी झाडं. खिडकीतून डोकावलं की दिसणारी कौलारू घरं व त्यावरील कबुतरं, साळुंक्यांची लगबग, रस्त्याच्या कडेने बहरलेली सोनगुलमोहरांची पिवळीधम्मक फुलं. हिरव्या अंगावर भरगच्च भरलेली झाडं ग्रीष्मात, भर उन्हातही मनाला गारवा देऊ लागली. रस्त्याच्या कडेने दुतर्फा फुललेली गुलमोहराची लालतांबडी केशरी फुलं मनाला सुखावू लागली. अन् मी एकटक पाहात राहू लागले ती झाडं फुलण्यापासून पानगळ होईपर्यंत बदलणारे झाडांचे, ढगांचे भाव. आभाळाचे निळे, जांभळे, गुलाबी बदलते रंग अन् त्यांच्या पसरणाऱ्या छटा. कधी काळोख, कधी पहाटेचं धुकं, तर भर दुपार रणरणती. कधी पहाटेचा सूर्योदय तर कधी सांज मावळतीच्या बदलणाऱ्या छटा, रात्रीचा चंद्र अन् चांदण्या लुकलुकणाऱ्या. अन् या खिडकीतल्या आकाशाशी मी मनातलं गुज बोलू लागले.

पहाट झाली अन् गार वारा वाहू लागला, की खिडकीतून मला दिसतात राघू मैनेच्या कवायती, आभाळाच्या अंगणात रंगलेल्या. राघूचं ते गोडगोड बोलणं, पंख पसरून सतत चिवचिवत घिरक्या घेणं, खिडकीतून डोकावणं. असं वाटायचं, की सकाळी सकाळी आपल्याशी गप्पा मारायलाच येऊन बसतात हे राघू. अन् पाहता पाहता राघू पाखरांची शाळाच भरायची. भास्कर गुरुजी कवायती शिकवणारे शिक्षक आणि हे राघू विद्यार्थी विविध कवायती करणारे पाहताना मोठी गंमत वाटायची. घराबाहेर बाजूलाच जांभळीची, आंब्याची झाडं. त्या झाडांवर पिकवलेली जांभळं अन् आंब्याचे पाड खायला गर्दी करणारी ही राघू पाखरं पाहिली, की मन आनंदाने चिवचिवायचं. येऊरची दूरवर पसरलेली डोंगररांग पावसाळ्यात व हिवाळ्यात दाट धुक्यात बुडालेली. नंतर पाऊस, धुकं जसजसं कमी होत जाई तसे भुरकट सोनेरी होत गेलेले डोंगर, वसंत ऋतूतली पानगळ, आंब्याला फुललेला सोनपिवळा मोहर, कोकिळचं कुहू ऽ कुहू ऽ कुहू ऽ कुहू ऽ गुंजन इथेच मनात ठसलं. पण कघी कधी चोवीस तास कोकिळेचा तोच तोच सूर नकोसा वाटायचा. तसं कधी कधी त्रास व्हायचा. पण कधी कोकिळ नाही गायला तर मी त्याला खिडकीतून शोधत राहायचे कुठे दिसतो का. कान टवकारून ऐकत राहायचे, एकटक पाहात राहायचे. 

दूर डोंगराच्या पाऊल वाटेवरचं वैशाखातल्या पळसाचं फुलणं अन् घरासमोरच्या वाटेवरच्या पिंपळाची शिशिरातली पानगळ.  ही सगळी निसर्गचित्र इथंच मनात घर करू लागली. चैत्र-वसंतात पिंपळाच्या अंगावर तांबूस पालवी फुटलेली मोहक. ती मनात सळसळू लागली. या पिंपळाच्या अंगाखांद्यावर खेळणारी चिऊपाखरं पाहिली, की आजोळच्या वाड्यातला पिंपळ आठवायचा आणि मनपावलं आजोळची वाट चालू लागायची कळायचंही नाही कधी  आजोळचं गाव फिरून यायची. आषाढातले ढग पाण्याने भरलेले अन् पौर्णिमेचं चांदणं यांचं अद्भुत दृश्य. आकाशात फुललेलं गुलाबी चांदणं मी इथेच अनुभवलं. बाल्कनीतल्या  छोट्याशा बागेत फुललेली फुलं. जास्वंद, मोगरा, बोन्सायची एक दोन झाडं. कबुतरांची गुटर्गु तर आजुबाजूला सतत असायची. या कबुतरांचं घरातल्या माळ्यावर येऊन बसणं, तर कधी बाल्कनीतल्या कुंड्यांमागे घरटं बांधणं तसं त्रासदायक पण छानही वाटायचं. मग एकच उद्योग. घरट्यातली कबुतरांची छोटी छोटी अंडी अन्  पिल्लांचं  उडेपर्यंत निरीक्षण करणे. पिल्लांच्या मानेवर चढलेले ते मोरपिशी  पिंगट रंग पाहायचं  कुतूहल असायचं. अजूनही आहे. कबुतराचं गुटर्गू करता करता मान लचकवत चालणं पाहायला खूप आवडायचं. टेरेसखालच्या माळ्यावर सोसायटीत फिरणाऱ्या मांजरीची गोड चार पाच पिल्लं पाहिली, की एक आगळाच आनंद  व्हायचा. कधी कधी  बिल्डिंगच्या खिडकीत येऊन बसलेल्या घुबडाचं पहाटेला एकसारखं आवाज करणं हा एक वेगळाच अनुभव होता माझ्यासाठी. सोसायटीच्या  आवारात मागच्या बगीच्यातला चाफा, प्राजक्त, मोगरा, गोकर्णीची वेल, सदाफुली, स्वस्तिक, गुलाब  व रातराणीची फुलं या सगळ्याशी एक जगावेगळंच नातं जुळलं व हळुहळू माझं मन रमायला लागलं.

अन् सोबत हा लिहिण्याचा छंद बहरला . निसर्गरम्य वातावरण. एक वेगळाच रंग, आनंद मिळाला. खिडकीतून दिसणारा सूर्योदय व  सूर्यास्त. हिरवी पोपटी मखमल पांघरलेला तो डोंगर, गर्द दाट धुक्याची मलमली चादर पांघरलेला. वाहते ढग. सांजसावल्यांचा अन् ऊनपावसाचा श्रावणातला खेळ. जवळच कधी फेरफटका मारण्यासाठी उपवनचा तलाव. रिमझिम पाऊस अन् उसळणाऱ्या लाटा, निसर्गरम्य येऊरचा परिसर व हिरवाई. बोरिवली राष्ट्रीय उद्यानाची रांग. या सर्व वातावरणात राहण्याचा आनंद काही औरच. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या इथला धबधबा. आजुबाजूचे बगीचे. हळुहळू मन रमायला लागलं इथल्या निसर्गात व हे सर्व अनुभवताना जुन्या आठवणी आणि समोरचा निसर्ग यांची सरमिसळ होत असताना, एक वेगळाच भावरंग चढायचा अंतरंगातल्या शब्दचित्रांना. अन् मग जुन्या आठवणी व डोळ्यांसमोर दिसणारा हा निसर्ग यांचं भाववर्णन आपसूकच कागदावर उतरलं.

ललित निबंध कसा सुचतो व फुलतो ? याला उत्तर दयायचं तर ती एक सौंदर्यपूर्ण सुंदर अनुभूती आहे. अलीकडील काळात बरेचसे लेखक ललितलेखनाकडे परत वळताना दिसत आहेत, खरंतर सुरूवातीला कविता लिहून झाल्यावर काही लेखक ललितलेखनाची वाट सहज पकडतात कारण ती अनुभवावर आधारीत म्हटलं तर सहज व सोपी अशी निर्मितीक्षम वाट आहे ज्यांचा विस्तार मर्यादीत व आलेखही उंच आहे जो वाचता क्षणी मनात ठसणारा असतो. परंतु जर का लेखकाने काही खोट्या लकबी व्यक्तित्वाच्या व अभिव्यक्तीच्या आपल्या लेखनात मांडल्या तर तो ललितलेखनाचा त्याचा प्रयत्न हस्यास्पद होऊन, फसू शकतो, म्हणून आजघडीचा वाचक हा अधिक सजग आहे हे लेखकाने ध्यानात ठेवले पाहिजे.  

ललितबंधात्मक असं लेखन  हे माझ्याकडून उत्सुफूर्तपणे घडलं. व आपण केलेलं हे आठवण पर, व्यक्तीनिष्ठ, निसर्गपर ललितलेखन हे पुस्तक रूपाने पुढं आलं पाहिजे हा विचार आला कारण आपलं सण, परंपरा, उत्सव साजरा करणं खूप कमी झालंय. जुन्या गोष्टी, वस्तू  नामशेष होत चालल्यायेत, जुनी मायेची माणसं ही खूप कमी झाली आहेत. हे सर्व जीवनभान जीवंत राह्यला हवं असं वाटलं आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहचायला हवं. यातून या ललितलेखांच्या संग्रहाची निर्मिती होईल या अनुषंगाने वाटचाल सुरू केली व लवकरच हा लेखसंग्रह 'मंतरलेली उन्हे' या नावारुपाला येत आहे.


कथा:- माझी कथा लेखनाची सुरवात व एकंदर प्रवास मजेदारच म्हणावा लागेल, कारण मुळचा कविता लेखनाचा पाया, ललितलेखनाची वाट व या अनुषंगाने दुसऱ्या बाजुने कळत-नकळत दीड दोन वर्ष होत गेलेलं कादंबरीचं लेखन हा माझ्यासाठी एक आनंददायी अनुभव होता. दोन-तीन वर्षाच्या कालावधीत  सातत्याने लेखन करत असताना  माझ्या अवतीभवतीचा परिसर व जुन्या आठवणींचा परीघ सोडायला तयारच नव्हते. कधी कधी अनावधानाने तर कधी कधी जाणिवपूर्वक लेखन करतानाही तोच तोचपणा लेखनात येत होता. तो टाळण्यासाठी मी थोड्यादिवस लेखणीला पूर्णविराम देण्याचे ठरवले व वाचनाला प्रारंभ केला. दरम्यानच्या काळात कथा वाचन-लेखन चालुच होतं. विविध कथाप्रकारांचा अभ्यास करताना नवनविन जाणिवा प्रगल्भ होत होत्या. मार्ग सापडत होता. कथाविश्वाचा अवकाश, त्याची व्याप्ती व प्रकार कळत होते. आपल्याच अनुभवाकडे त्रयस्थ वृत्तीने कसं पाहवं हे मी शिकत होते. एकच गोष्ट दहा पध्दतीने कशी सांगता येईल हे विविध कथालेखकांच्या कथा वाचताना ध्यानात येत होते. मात्र स्वःत्वाचा कोष तोडून बाह्य जगाकडे डोळसपणे पाहण्याची, स्विकारण्याची व तेच कथारुपाने कागदावर उतरवण्याचे कसब मात्र अजून गवसत नव्हते. कित्येक वेळा ठरवून लिहायला बसल्यावरही लिहायला जमत नव्हतं. तासनतास विचार करत राह्यचे. कधी कधी सगळं विसरायला व्हायचं. काय लिहावं काय लिहू नये कळायचं नाही. पण रोज थोडं थोडं जे सुचेल ते लिहित राह्यचे. कधी कथेचं शीर्षक तर कधी एखादं पात्र सापडायचं. कधी एखादा प्रसंग तर कधी कथेची सुरवात, शेवट आणि  असंच  लिहिता लिहिता या कथा संग्रहातील कथाबीजं मनात रूजली व अनुषंगाने या कथासंग्रहातील विविध पात्र गवसली. त्यांची जगण्याची दिशा, अनुभव, भाषा, प्रदेश, स्वभाव यांची सांगड घालताना. याचं जगणं कळू लागलं. आपलं जगणं कळू लागलं. कधी या पात्रांचा निरागसपणा तर कधी कठीण प्रसंगाच्या कचाट्यात  सापडलेली स्वतःची असाहय्यता, विवशता, त्यांच्या यश-अपयशाची व हरवलेलं जग गवसल्यावर चेहऱ्यावर उमटणाऱ्या विविध भाव भावनांची सुखद व दुःखद या दोंन्ही रंगानी ही भावचित्रे मी या कथाद्वारे शब्दचित्रीत करण्याचा प्रयत्न केला.
कथा का लिहावी वाटते. लिहिण्यामागची भूमिका खूप महत्वाची कथालेखनाचं तंत्र आपल्याला समजलंय आता चला कथा लिहुया म्हटल्याने कथा लिहिता येत नाही. कथा सुचण्याची प्रक्रिया खूप महत्वाची असते. अस्वस्थेतून येणारं कथा बीज हे नेहमी काहीतरी वेगळं मांडण्याचा प्रयत्न करतं. कथा लेखक हा संवेदनशील असायला हवा. कथा निर्मितीच्या प्रसव वेदना त्याला सहन कराव्या लागतात तेव्हाच त्याच्या काळजातून उत्कृष्ट कथेचा जन्म होतो. अवतीभवतीची माणसं, परिसर, त्यांचे प्रश्न, समस्या,  वाचता आले पाहिजे. कथा लेखक म्हणून निरीक्षण क्षमता व नजर चौकस असायला हवी. म्हणजे कथालेखकाला बारीकसारीक हालचालीसह सूक्ष्मतेच्या पातळीवर कथेत बारकावे मांडता येतात.तसं पाह्यलं तर कथा सुचणे व प्रत्यक्ष कागदावर उतरणे ही प्रक्रिया म्हटलं तर कठिण म्हटलं तर खूप सोपी आहे. कधी कधी एका बैठकीत कथा लिहून होते तर कधी कधी एखाद्या ठिकाणी कथा अडकली तर तीन चार महिने आपण त्यात अडकून पडतो. येथे कथालेखकाचा कसच लागतो. ती कथा पूर्ण होण्यासाठी संयम लागतो. कथा लेखनासाठी आवश्यक अशी बैठक लेखकाकडे हवीच. तरच त्या कथेचं विश्व तो उभारू शकतो. व त्याचे कथालेखन अनुभवातून प्रगल्भतेकडे वळतेकथा म्हणजे कुठल्याही घडलेल्या घटनेचा, आपण पाह्यलेल्या वा अनुभवलेल्या गोष्टींचा वृत्तांत नसतो. तर तो आपल्या मनात खोल रूजलेल्या कथा बीजाचा परिपाक असतो. खरीकथा अंतर्मुख करायला लावते. कथाअनुभव हा जीवनाशी भिडता असा पाहिजे

कादंबरी :- माझा कादंबरी लेखनाचा प्रवास व अनुभव माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट होती. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण आनंदाने करायची ठरवतो तेव्हा त्या गोष्टीचं ओझं वाटत नाही अथवा ती गोष्ट रटाळ व कंटाळवाणी वाटत नाही. खरंतर माझी 'गोष्ट एका वळणावरची' ही कादंबरी येणं हा योगायोगच आहे. मी सुरवातीला अगदी छोट्या छोट्या कथेच्या स्वरूपात फेसबुकवर क्रमशः एक सदर लिहित होते. अन् हे सदर पाहूनच मला दैं. संचार मधून कादंबरी नावाचं सदर क्रमशः लेखनासाठी मिळाले साधारणतः दिड एक वर्ष हे सदर मी लिहिलं माझे जवळ जवळ अठ्ठावीस ते तीस प्रकरणं लिहून झाली होती. साहजिकच वर्तमानपत्रात एखादी कादंबरी हे सदर लावायचं म्हटलं की अवघडच कारण एकतर एकसलगता व क्रमशः लिहायचे व त्यात शब्दमर्यादा यासर्व अटी तरी मी लिहित गेले. सुरवातीलाच कादंबरीचा पट मी अखलेला होता. नव्वदचा काळ होता. तरूण मुलगा व मुलगी, दोन कुटूंब, काॅलेज, गाव, परिसर, वातावरण सर्व आखणी मनात ठरवून विषयही अगदी मनात बिंबवला होता मैत्र व प्रेम हा आशय केंद्रबिंदू ठरवून या आशयाच्या आजुबाजूलाच मी ही कादंबरी लिहायची ठरवली होती. अगदी बालपणापासून असलेली निखळ मैत्री, त्यातील अल्लडभाव, निष्पाप मनं अन् त्यातून सहज उमलणारी मैत्री व फुलणारं प्रेम मग हो ना यात गुरफटणं व विरह, ओढ इ.भाव गुंफताना मनाचो अस्वस्थता टिपत पुढे जाणे. 

खरंतर हा माझा पहिलाच प्रयत्न होता. मी मला जमेल त्यापध्दतीने विषय आशय प्रसंग व पात्र यांच्या संघर्षाद्वारे कादंबरी लेखन करत होते. अगदी सहज मनात कुठलाही हेतू न ठेवता जसं सुचेल तसं मी लिहिलं. एक नवोदित लेखक म्हणून मला हे सर्व नवीन होते. कोणाचेही मार्गदर्शन वगैरे नव्हते. पण बरंचसं कळत होतं. निसर्गाची गोडी मुळातच असल्याने मी विषय, काल, प्रसंग व पात्राच्या भावानुरूप त्यात निसर्गभावाचे वर्णन जोडत गेले, म्हणण्यापेक्षा गुंफत गेले. निसर्ग हा माझ्या लेखनाचा मुख्य प्रेरणास्त्रोत व स्थायीभाव असल्याने सहजतेने ते भाव गुंफत गेले.  पात्र, घटना व संघर्ष पुढे सरकत होता. तसेतसे कादंबरी लेखन पुढे सरकत होते. कादंबरी लेखनाचा आवाका मोठा असल्याने लिहिताना विषय व्यापक व सामाजिक कसा होईल व सर्व स्तरातील व वयोगटातील वर्ग समोर ठेवून लेखन केले यात त्यानुसार वैविध्य ठेवून, संवादत्मकता, नाट्यता, सौंदर्यअनुभव, तसेच विविध प्रसंग उभे करताना त्यात कल्पकतेने विनोद तर कधी करूण प्रेमळ भावरंग भरत गेले. पात्रांचे स्वभाव ठरवून न घडवता ठळक न दाखवता त्यांच्या भावमुद्रेतून ते उभे केले.

हे सदर लिहिताना या लेखाचं पुस्तक वगैरे करायचंय असा विचारही माझ्या डोक्यात नव्हता. मी लिहित गेले. नंतर मला आम्ही या कादंबरी लेखनाचं पुस्तकरूपाने पुस्तक काढु ईच्छितो असा एक फोन मला आला. स्वतःहून आपलं पुस्तकं कोणीतरी काढतंय म्हटल्यांवर मग मीही तयार झाले अन् मग चालु झाला माझा खरा प्रवास. कादंबरी म्हणजे काय ? कादंबरी लेखन कसे करावे ? कादंबरी कशी लिहावी. आतापर्यंत अनेक साहित्यिकानी कसे कादंबरी लेखन केले आहे ? कादंबरी लेखनात भाषाशैली? निवेदनशैली ? नेमकं स्वरूप कसं असतं कादंबरीचं व कादंबरीचा घाट कसा असतो आणि लघुकादंबरी, दीर्घकादंबरी यातील फरक काय ? असे अनेक प्रश्न उभे राहीले मात्र जसे जसे संदर्भ वाचत गेले तसे तसे प्रश्नांची उत्तरं आपोआपच मिळाली. यासाठी पहिलं काही संदर्भ ग्रंथ व माहिती शोधली. तसं शाळा काॅलेजात असल्या पासूनच वाचनाची आवड असल्या कारणाने मी बऱ्याच कादंबऱ्याचं वाचन केलं होतं. मात्र आता परत बऱ्याच वर्षाच्या अंतराने लेखनाकडे वळल्याने परत एकदा वाचाव्याशा वाटणाऱ्या कादंबऱ्या वाचल्या. प्रत्येक कादंबरी पुन्हा नव्याने वाचताना नवीन धागे त्यात मिळत गेले व अनेक बारीकसारीक दुवे मला उमगले. खरंतर वाचन हाच तुमचं लेखन समृध्द करतो व तुम्हाला तुमची वाट दाखवतो. तुम्हाला आजुबाजूच्या परिस्थितीचं, जीवनाचं सजगभान हवंच पण त्याबरोबर तुम्हाला माणूस म्हणून जसे संवेदनशील मनाने समोरच्याचे भाव टिपता आले पाहिजेत तसेच तुम्हाला सजग दृष्टीने पुस्तक देखील वाचता आले पाहिजे. खरंतर एक वाचक रसिक म्हणून मीही पहिलं कादंबरी कथासंग्रह वाचायचे व नंतर पुढे अजून वाचायचे पण तेव्हा फक्त आनंद व विरंगुळा म्हणून वाचन करायचे मात्र अनुभवाने मला डोळसपणे पुस्तक वाचायची दृष्टी दिली. कुठल्या लेखकाने कसे पात्र, प्रसंग उभे केले आहे. कसा संघर्ष मांडला आहे. कुठल्या प्रकारात व कुठल्या विशिष्ट आशयाला अनुरूप लेखन केले आहे. ती राजकीय, सामाजिक, पौराणिक, ऐताहासिक वा इतर अंगानी जाणारी कादंबरी आहे. एकदंरच आढावा घेताना अभ्यासू वृत्ती व जिज्ञासा निर्माण झाली. मात्र जसा जसा अभ्यास व वाचन करत गेले. मागचं सपाट पुढचं पाठ अशी अवस्था झाली. निवेदन, भाषा, काळ, सुरवात, मध्य, शेवट अन् संघर्ष, गुंतागुंत अपरिहार्य शेवट यासगळ्या गोष्टी पुढे काय ? काहीच माहिती नसल्याने काय लिहिवं हे कित्येक महिने तर समजतच नव्हते. मग थोडावेळ जाऊ दिला. विचार केला. एक विशिष्ट असा शेवट करायचा ठरवला. त्या अनुषंगाने लेखन करत गेले व माझा कादंबरी लेखनाचा प्रवास पूर्ण झाला.

समारोप :- आपण ज्या परिस्थितीत वातावरणात वाढलो त्या संस्कृतीची विचारांची व निसर्गाची पाळमुळं खोल मनात रूजलेली आपल्या  साहित्यात आपल्याला त्याची प्रतिबिंब आढळतात. खरंतर अती सुखाचा क्षण व अतीव दुःखाचा क्षण हा आपल्या निर्मितीच्या पाठी असतो. प्रत्येकाची सृजनशीलता ही त्याच्या स्वभावावर व प्रकृतीवर अवलंबून असते. साहित्यनिर्मितीची प्रक्रिया कधी कधी सुखदायक तर कधी कधी मनाला थकवा आणणारी असते. मात्र आपल्या मनाप्रमाणे झालेल्या साहित्य कलाकृती निर्मितीचे समाधान हे सांगता न येणारे असतो. तो आत्मिक आनंद, ती अनुभूती मनाला प्रेरक व अतीशय प्रेरणादायी असते. त्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटते व सकारात्मक विचार करण्याची शक्ती मिळते. याउलट एखादी साहित्यनिर्मिती ही मनाजोगी झाली नाही तर मनाची अस्वस्थता व अस्थिरता वाढते व आपण नकारात्मकतेकडे झुकू शकतो. मात्र अशी नकारात्मक उर्जा आपल्या लेखनाला बाधक ठरू शकते. असे आपल्याला कधी वाटल्यास आपण आपले मन विचलीत होऊ न देता. आपण कुठे कमी पडत आहोत ते पाहून परत एकदा प्रयत्न केला तर नक्कीच अजून छान लिहू शकतो. त्यासाठी विषय, आशय व प्रकारानुसार पूरक वाचन केले तर मनातील गोंधळ बराच दूर होऊन आपण एक विशिष्ट वैचारिक बैठक तयार झाल्यामुळे अजून ताकदीचे लेखन करू शकतो. खरंतर एकिकडे उत्तम साहित्यनिर्मितीचा आनंद ही खूप समाधानाची बाब आहे मात्र हेच समाधान जेव्हा आता झालं एकदाचं या उदिष्टापर्यंत पोहचलं की मात्र हीच समाधानाची भूमिका आपल्या उद्दिष्टापासून व ध्येयापासून आपल्याला परावृत्त करण्याची शक्यता असते. म्हणून समाधानी राहवे पण अजून काही तरी या पेक्षा उत्तम करावे अजून शिकावे व लिहावे ही मनोभूमिका मात्र कायम आपल्या मनात  घोळत असावी म्हणजे ही अस्वस्थता आपल्याला साहित्यनिर्मितीच्या यशस्वी पायऱ्या चढण्यासाठी नेहमी प्रेरीत करते.

तनुजा ढेरे


Thursday, 6 May 2021


अचूक शब्दांत निसर्गाचं वर्णन आणि ओघवते लेखन यामुळे 'गोष्ट एका वळणावरची' ही कादंबरी वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली. दमदार मांडणी, चांगले कथा बीज आणि पुढे काय होणार याची उत्सुकता वाढवणारी ही कादंबरी आहे. या कादंबरीतील पात्रांच्या द्वारे लेखिकेने जे प्रेमभाव मांडले आहेत ते वाचकाच्या मनाची घालमेल वाढवितात. जयंता आणि मुक्ता यांची प्रेमकथा या कादंबरीतून उलगडत जाते. त्या दोंघाच्या मैत्रीत  सुगंधाचे येणे म्हणजे प्रेमाचा त्रिकोण होणार असे वाटत असतानाच उमेशचं आगमन कादंबरीला वेगळ्याच वाटेवर नेऊन सोडते. कादंबरीमध्ये प्रेमाची खरी खरी व्याख्याही समाजसुधारक सावंत सरांच्या माध्यमातून मांडली आहे ती आजच्या तरुणांना दिशा दर्शक आहे. आयुष्याच्या नाजूक वळणावर उभे असताना स्वप्नं पाहा, प्रेम करा पण प्रेमात उध्वस्त होवू नका. दिवसभर फिरणे, बोलणे आणि मजा करणे म्हणजे प्रेम नव्हे. प्रेम म्हणजे सहवासातून निर्माण होणारा स्नेह आणि अशाच एका वळणार सामाजिक कार्याचे वेड लागणे म्हणजे माणुसकीचे प्रेम. सावंत सरांचा हा संदेश खूप प्रेरणादायीच आहे जो या कादंबरीतून लेखिकेने मांडला आहे. मैत्रीतून प्रेम कसे फुलत जाते याची उत्तम मांडणी लेखिकेने केली आहे. लालित्य पूर्णरित्या या कादंबरीतील प्रसंग उभे केल्यामुळे ही कादंबरी जिवंत वाटते. निसर्गाचे लोभस वर्णन मनाला सुखावतानाच अधूनमधून पेरलेल्या कवितेच्या ओळी मनाला भावतात. पुस्तकाच्या सुरवातीलाच मनोगतातून लेखिकेने वाचकाशी साधलेला संवाद हा वाचकाच्या मनाचा पकड घेतो. सुरवातीला अगदी सहज पुढे सरकणारी कादंबरी मधल्याभागात रोंमाचक बनते व शेवटाकडे जाताना ती अधिकच गूढ बनते. जयंता, मुक्ता, सुगंधा, आनंदी, आनंदा, कुसुमताई, सुमनताई, रावसाहेब ईनामदार ही पात्रं तसेच सुगंधाच्या सावत्र आईची कथा व तिचे वडील नाना या सर्वांच्या पार्श्वभूमीवर सुगंधाचं जगणं व तिची असाहय्यता ही शेवटपर्यंत आपल्याला कादंबरी वाचायला उदयुक्त करते. एक एक कोडं उलगडत जावं तसं कादंबरी पुढे उलगडत जाते मात्र शेवट हा वाचकाच्या हातात देऊन लेखिका आपल्या मनाला आव्हान देते की शेवट हा आपल्या परीने ठरावा तो जसा तुम्ही ठरवाल तसा अर्थ त्यातून घ्या. यातच या कादंबरीचे यश आहे. अतिशय रोचक अशीही कादंबरी तुम्हाला वाचायला नक्की आवडेल.


-किरण सोनार